शेतकरी ः योगेश भाऊसाहेब निकम गाव ः वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक एकूण क्षेत्र ः २.५ एकर (स्वमालकीचे) काकडी लागवड ः अर्धा एकर (करार पद्धतीने लागवड).नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता. चांदवड) येथील योगेश निकम यांनी यावर्षी अर्धा एकर शेती करारावर घेत काकडी लागवड केली आहे. बाजारपेठेचा अभ्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत काकडी पिकातून उत्पादन घेऊन बाजार मिळविण्यासाठी नियोजन आखले आहे. केवळ पीक उत्पादनावर भर देता पीक व्यवस्थापन, बाजारपेठेचा अंदाज आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिला आहे. याशिवाय कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून जैविक पद्धतींचा अवलंब केला आहे. या माध्यमातून दर्जेदार काकडी उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. .Cucumber Farming: दर्जेदार काकडी उत्पादनासाठी प्रयत्न.योगेश यांचे वडील भाऊसाहेब पुंजाजी निकम हे प्रामुख्याने द्राक्ष व कांदा पीक घेत असायचे. पुढे त्यांची मुले नीलेश, योगेश व धाकटे गोकूळ तिघे भावंडे २००९ पासून शेतीमध्ये उतरले. निकम बंधूंचा शेतमाल वाहतूक व कृषिसंबंधित फवारणी सेवा देण्याचा व्यवसाय देखील आहे. गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष पिकाचे होणारे नुकसान, शेतमालाचे अस्थिर दर आदी बाबींमुळे अडचणी येत होत्या..या पार्श्वभूमीवर योगेश यांनी भाजीपाला पिकांची बाजारपेठेतील मागणी व मिळणारे दर यांची माहिती घेतली. त्यातून काकडीला बाजारात चांगली मागणी असल्याचे लक्षात आले. योग्य लागवड नियोजन, सुधारित वाणांची निवड आणि संतुलित अन्नद्रव्ये, सिंचन व्यवस्थापन केल्यास कमी कालावधीत अधिक उत्पादन घेता येत असल्याचे लक्षात आले. बाजारभावातील चढ-उतार लक्षात घेऊन यंदा रब्बी उन्हाळ कांदा पिकाला पर्याय देत वेलवर्गीय पिकात काकडीची निवड केली. द्राक्ष, कांदा आणि टोमॅटो या पारंपरिक पिकांसोबतच यावर्षी करारावर अर्धा एकर शेती घेत काकडी लागवड केली आहे..Cucumber Farming : वाळकीच्या शेतकऱ्यांना मिळतेय काकडीचे सुधारित लागवड तंत्र .मल्चिंगवर लागवडीला प्राधान्यलागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत केली. त्यानंतर साडेचार फुटांचे बेड (गादीवाफे) तयार केले.लागवड मल्चिंग पेपरवर करण्याचे नियोजित होते. तण नियंत्रण आणि ओलावा टिकवण्यासाठी २५ मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर लागवडीसाठी वापरला आहे. यामुळे तणनियंत्रणावरील खर्चात मोठी बचत झाली आहे..लागवडीसाठी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि रोगप्रतिकारक वाणांची लागवडीसाठी निवड केली. त्यानुसार रोपवाटिकामध्ये रोपांची आगाऊ मागणी नोंदविण्यात आली. लागवड नियोजनानुसार साधारण ८ डिसेंबरला रोपांची उपलब्धता करण्यात आली.साधारण दीड फूट अंतरावर एकेरी पद्धतीने रोपांची बेडवर लागवड केली.लागवडीनंतर १५ दिवसांनी वेलींची बांधणी केली. त्यामुळे वेलींना वाढण्यास वाव मिळतो. तसेच वेलींना आधार दिल्यामुळे फुलांवर आणि फळधारणेच्या अवस्थेत चांगले परिणाम दिसून आले आहेत. काकडीची वेल सुतळीने बांधून घेतल्याने फळे जमिनीला टेकून वाकडी होत नाहीत. त्यांना डाग पडत नाहीत. वेलींची वेळेवर बांधणी करून हवा खेळती राखल्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळविणे शक्य झाले आहे..Cucumber Farming : तंत्रज्ञानाचा वापरातून काकडीचे पीक फायदेशीर.काटेकोर सिंचनसंपूर्ण लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. सध्या दर दोन दिवसांनी १ तास ठिबकद्वारे सिंचन केले जात आहे. आगामी काळात वाढत्या तापमानानुसार सिंचन कालावधीत वाढ केली जाईल. फळधारणेच्या काळात पिकाची पाण्याची गरज वाढते. अनियमित पाणी दिल्यास काकडी ही वाकडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाईल. मल्चिंग पेपरवर लागवड केल्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत झाली असल्याचे श्री. निकम सांगतात..कीड-रोग नियंत्रणकाकडी पिकावर मुख्यतः पांढरी माशी आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या नियमितपणे घेण्यावर भर दिला जात आहे.याशिवाय वेलीची पाने पिवळी पडणे व शेंडा गोळा होणे अशा अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकाचे निरीक्षण करून विशेष खबरदारी म्हणून त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला जातो.काकडीमध्ये फळगळ आणि कुज रोखण्यासाठी नत्र खताचा संतुलित वापर करून पोटॅश मात्रा अधिक देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे फळगळ रोखली जाऊन काकडीचा दर्जा चांगला मिळण्यास मदत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे..Cucumber Farming : खरीप काकडीचे अधिक उत्पादन शक्य.उत्पादन आणि विक्रीलागवडीनंतर साधारणपणे ४५ दिवसांनी काकडी पिकात तोडे सुरु होण्याचे नियोजन होते. मात्र योग्य व्यवस्थापनामुळे साधारण ३५ ते ४० व्या दिवसापासूनच तोडणी सुरू झाली. सध्या दर चौथ्या दिवशी काकडीची तोडणी केली जात आहे. तोडणीनंतर हाताळणी व प्रतवारी करून एकसारख्या आकाराची काकडी विक्रीसाठी क्रेटमध्ये भरली जाते. त्यामुळे बाजारात चांगले दर मिळण्यास मदत होते, असा त्यांचा अनुभव आहे. सध्या मालाची गुणवत्ता चांगली असल्याने नाशिक येथील बाजारपेठेत उत्पादित काकडीला अपेक्षित दर मिळत असल्याचे योगेश निकम सांगतात..अन्नद्रव्ये व्यवस्थापनकाकडी लागवडीमध्ये सुरुवातीपासूनच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी लागवडीपूर्वी भर खते म्हणून १०:२६:२६ खताची मात्रा दिली. लागवडीनंतर वाढीच्या अवस्थेत ४ ते ५ दिवसांच्या अंतराने नियमितपणे शेणाची स्लरी आणि कुक्कुट स्लरी दिली. यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ जोमदार होण्यास मदत झाली. फूलधारणा आणि फळधारणेच्या अवस्थेत दर आठवड्याला ०:३७:३७, मॅग्नेशिअम सल्फेट आणि समुद्री शेवाळ यांचा वापर केला. वेलीच्या जोमदार वाढीसाठी ३ ते ४ वेळा ह्युमिक ॲसिडची आळवणी करण्यात आली आहे.- योगेश निकम ७५८८५५६७५५(शब्दांकन ः मुकुंद पिंगळे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.