Banana Variety : केळीची जगातील पहिली जीएम जात विकसित

World's first GM Variety of Banana : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड तंत्रज्ञान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केळीची जगातील पहिली जनुकीय सुधारित (जीएम) जात विकसित करण्यात यश मिळविले आहे.
Banana Variety
Banana VarietyAgrowon
Published on
Updated on

Pune News : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड तंत्रज्ञान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केळीची जगातील पहिली जनुकीय सुधारित (जीएम) जात विकसित करण्यात यश मिळविले आहे. जगभरातील केळी उत्पादकांपुढे मोठे संकट ठरलेल्या पनामा रोगास उच्च प्रतिकारक्षम असलेल्या या जीएम जातीच्या व्‍यावसायिक प्रसारणाला ऑस्ट्रेलिया सरकारने संमती दर्शवीत तिच्या लागवडीचा मार्गही मोकळा केला आहे. यंदाच्या वर्षापासून आशियायी देशांतही जातीच्या चाचण्या सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

भारतासह आशियायी देशांपासून ते दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडातील देशही केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. पनामा (ट्रॉपिकल रेस फोर- टीआरफोर) हा जगभरातील केळी पिकातील महत्त्वाचा व नियंत्रणाचे कोणते ठोस उपाय नसणारा रोग आहे. केळी उत्पादकांना त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

हे गांभीर्य ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत केळी जैवतंत्रज्ञान संशोधन कार्यक्रम विभागातील शास्त्रज्ञांचे २० वर्षांहून अधिक काळ संशोधन सुरू होते.

अखेर संशोधन प्रकल्प प्रमुख जेम्स डेल यांच्या नेतृत्वाखाली केळीची जनुकीय सुधारित (जीएम) जात विकसित करण्यात त्यांना नुकतेच यश मिळाले आहे. क्यूसीएव्ही-४ असे या जातीचे नाव असून, या संशोधनात रॉब हार्डनिंग, डॉ. जीन व्हेस पॉल, डॉ. ॲन्थोनी जेम्स आणि जेन क्लायडॉन यांचे योगदान लाभले आहे.

Banana Variety
Banana Export : राज्यातून रोज ४० कंटेनर केळीची निर्यात

शास्त्रज्ञ डेल म्हणाले, की जैवअभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर होऊन विकसित झालेली ही केळीची जगातील पहिली जात आहे. ऑस्ट्रेलियासाठीही फळपिकांतील ती पहिली जीएम जात आहे. यात वन्य जातीच्या केळीतील ‘आरजीएटू’ हे जनुक कॅव्हेंडिश गटातील केळीच्या जातीत परावर्तित करण्यात आले आहे.

त्याद्वारे ही जात पनामा रोगाप्रति उच्च प्रतिकारक्षम झाली आहे. या संशोधनामुळे जगभरातील कॅव्हेंडिश गटातील केळी जातींचे संरक्षण होण्यास मदत मिळेल असे डेल म्हणाले. भारतासह जगातील प्रमुख केळी उत्पादक देशांमध्ये ग्रॅंड नैन या केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ही जातही कॅव्हेंडिश गटात येत असल्याने आशियायी देशांसाठीही हे संशोधन महत्त्वाचे ठरणारे आहे.

व्यावसायिक लागवडीस संमती

संबंधित संशोधन विद्यापीठापुरते मर्यादित न राहता ऑस्ट्रेलियन सरकारने या जातीच्या व्यावसायिक प्रसारणास हिरवा कंदील दाखवून लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड अन्न प्रमाणके (FSANZ) या शासकीय संयुक्त संस्थेनेही ही जात मानवी आहारासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.

मात्र संस्थेचा हा निर्णय मंजूर असल्याबाबत किंवा त्याचे पुनःअवलोकन करण्याची आवश्‍यकता या बाबत निर्णय घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशांतील राज्यांना ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

आशियायी देशांनाही संशोधनाचा लाभ

ऑस्ट्रेलियन सरकारने या जातीच्या प्रसारणाला संमती दिल्याच्या निर्णयाचे शास्त्रज्ञ डेल यांनी स्वागत केले आहे. अजून एक प्रक्षेत्र चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलियातील केळी उत्पादकांसाठी ती उपलब्ध होऊ शकेल असे डेल यांनी म्हटले आहे.

आशियायी देशांसाठी केळी पिकाचे महत्त्व लक्षात घेऊन तेथील शेतकऱ्यांनाही या जातीचा लाभ व्हावा यासाठी यंदाच्या वर्षापासून तेथे चाचण्या सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डेल म्हणाले.

Banana Variety
Banana Crop Insurance : केळी विम्याचे ३८५६ प्रस्ताव मंजूर

भारतासाठी महत्त्वाचे संशोधन

जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील उद्यान विद्यावेत्ता चंद्रशेखर पुजारी म्हणाले, की जगातील दोन तृतीयांश केळीच्या ज्या जाती पसंत केल्या जातात त्या कॅव्हेंडिश गटातील आहेत. ग्रॅंड नैन त्यातीलच जात आहे. या रोगावर प्रभावी बुरशीनाशके किंवा कोणताच ठोस नियंत्रण उपाय सध्या उपलब्ध नाही.

त्यामुळे काही छोट्या देशांना केळीची लागवड करणे थांबवावे लागले आहे. पारंपरिक पैदास कार्यक्रमातूनही रोगाला प्रतिकारक जात विकसित करण्याला खूप मर्यादा आहेत. ‘जीएम’ तंत्रज्ञान हाच त्यावर पर्याय आहे. त्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियात झालेले संशोधन महत्त्वाचे ठरणारे आहे. पनामा रोगाचा भारतातही प्रवेश झाला असून गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटकात तो आढळला आहे.

महाराष्ट्रात अद्याप त्याचा शिरकाव झालेला नाही. तथापि काही कंपन्या महाराष्ट्रात रोपे तयार करतात. परराज्यांत विक्री करतात. वाहतुकीच्या माध्यमातून रोगाच्या बुरशीचा सूक्ष्म कण जरी आपल्या राज्यात आला तरी त्याचा प्रसार व्हायला वेळ लागणार नाही. रशिया आपली केळी घेऊ लागली आहे. त्यातून निर्यातीचा एक दरवाजा खुला झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला दक्ष राहण्याची गरज आहे असेही पुजारी म्हणाले.

काय आहे पनामा रोग?

क्वीन्सलॅंड राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पनामा टीआर फोर हा बुरशीजन्य रोग असून त्याचा संसर्ग मातीतून होतो.

कोणत्याही यजमान पिकाशिवाय रोगाची बुरशी काही दशकांपर्यंत मातीत वास्तव्य करून राहू शकते. त्यामुळेच नियंत्रण अत्यंत कठीण. सद्यःस्थितीत कोणताही ठोस, प्रभावी उपाय नाही.

व्हिएतनाम, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, भारत, चीन, पाकिस्तान, जॉर्डन, ओमान, मोझांबिक आदी विविध देशांत रोगाचा प्रसार. ऑस्ट्रेलियातील ९० टक्के केळीचे उत्पादन क्विन्सलॅंड राज्यात. तेथील ९७ टक्के बागा कॅव्हेंडिश केळीच्या. तेथेही प्रादुर्भाव.

दूषित माती, पाणी यांच्या माध्यमातून रोपांची वाहतूक झाल्यास रोगाचा प्रसार मानव, जनावरे, वाहने, यंत्रे यांच्यामार्फत होण्याचा धोका.

रोगाचे चार वंश (races) पैकी चौथा वंश केळीच्या सर्व विशेषतः कॅव्हेंडिश गटातील जातींवर आक्रमण करणारा.

झाडांवर लक्षणे दृष्टीस पडत नाहीत तोपर्यंत रोगाचा अढळ समजून येण्याचा मार्ग नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com