Woman Farmer Producer Companies : राज्यात महिलांनी स्थापन केल्या ३११ शेतकरी उत्पादक कंपन्या

कंपन्यांमध्ये ४७ टक्के महिला भागधारक, तर ४० टक्के महिला संचालक
Farmer producer companies
Farmer producer companiesAgrowon

संदीप नवले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः महिला उत्पादक शेतकऱ्यांचे (Woman Farmer producer) संघटन करून तंत्रज्ञान विषयी माहिती पोहोचविणे, नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती व कौशल्य वाढविणे, त्याचबरोबर उत्पन्न वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुढाकार घेऊ लागल्या आहेत.

मागील दोन वर्षांपासून राज्यातील महिलांनी एकत्रित येऊन तब्बल ३११ शेतकरी उत्पादक कंपन्या (Woman Farmer producer companies) स्थापन केल्या आहेत.

त्या माध्यमातून तब्बल ६० हजार २०८ महिला एकत्र आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ३०४ महिला संचालक पदाचा कारभार पाहत असून, या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक सक्षमतेकडे पाऊले टाकली आहेत.


महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २०११ मध्ये तीन टप्प्यांत शेतकरी कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शासनाने बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पामध्ये (स्मार्ट) विशेष धोरण आखले आहे.

‘राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि कृषी उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेशक मूल्यसाखळ्या विकसित करणे’ हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्या या प्रकल्पाच्या प्रमुख लाभार्थी असून, यात महिलांच्या सहभाग अधिक आहे. त्याअंतर्गत महिलांनी एकत्रित येऊन महिला उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत.

Farmer producer companies
Womens Farmer Producer Company : महिला शेतकरी कंपनीने रुजविला आत्मविश्‍वास

प्रकल्पांतर्गत एकूण एक हजार कंपन्यांच्या उद्दिष्टापैकी किमान ४०० कंपन्या या महिलाभिमुख असणार आहेत. सद्यःस्थितीमध्ये एकूण ३११ महिला उत्पादक कंपन्या तयार झाल्या असून, त्यांची कंपनी कायद्यान्वये नोंदणी झालेली आहे. या महिलांच्या कंपन्या स्मार्ट प्रकल्पात भागीदारी उपप्रकल्प व बाजार वाढ संपर्क उपप्रकल्पात सहभागी होणार आहेत.

सद्यःस्थितीत यापैकी ६९ महिलांच्या कंपन्या या भागीदारी उपप्रकल्पात सहभागी झाल्या आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील महिलांनी पुढाकार घेतला आहे. या महिलांनी शेतीमालाच्या प्रक्रियेचे प्रकल्प राबविले आहेत. त्यांना अनुदानापोटी आर्थिक मदत केली जात आहे.

त्यामुळे महिला स्वावलंबी होऊ लागल्या आहेत. त्याअंतर्गत महिलांना कृषी विभागांतर्गत विविध अभ्यास दौरे, खरेदीदार विक्री संमेलने, जिल्हा कृषी महोत्सव, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रात्यक्षिके, बाजाराभिमुख प्रात्यक्षिके इत्यादी घटकांच्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी करण्याचे काम सुरू असून, तंत्रज्ञान व शेतीमालाच्या विक्रीची साखळी तयार केली जात आहे.


Farmer producer companies
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक कंपन्या

जिल्हानिहाय महिला शेतकरी कंपन्या, कंसात सहभागी महिला : नागपूर १० (२०७४), भंडारा ९ (१५८९), गोंदिया ९ (२८८९), वर्धा ९ (२१९२), चंद्रपूर १० (१४९५), गडचिरोली ५ (११०४), अकोला ८ (२३४४), अमरावती १२ (१५५५), यवतमाळ १३ (४४८४), वाशीम ११ (११२६), बुलडाणा ८ (१७४०), छत्रपती संभाजीनगर ८ (२१६०), जालना ६ (१२००), बीड ८ (१२७८), परभणी ९ (२७००), हिंगोली ९ (९८३), नांदेड ६ (२७२५), लातूर ७ (१०३५), धाराशिव ११ (११२५), धुळे ८ (७०८), नंदुरबार ९ (२५५४), नाशिक ११ (१९७५), जळगाव १५ (२१५०), नगर १५ (२१५०), रायगड ५ (५५१), ठाणे ४ (१५०), पालघर ८ (१८६९), सिंधुदुर्ग १० (२०१३), रत्नागिरी ११ (२४२८), सातारा ८ (१३३५), कोल्हापूर १५ (८०५), पुणे १३ (२८८०), सांगली ४ (१०२६), सोलापूर ७ (८२).

...या उद्योगात उतरल्या कंपन्या
- डाळ मिल
- स्वच्छता प्रतवारी व वर्गवारी केंद्र
- गोदाम सेवा
- हळद प्रक्रिया
- भाजीपाला प्रक्रिया
- शेळीपालन
- तांदूळ प्रक्रिया
- खाद्य तेल निर्मिती
- फळ प्रक्रिया
- प्रकल्पांतर्गत ‘स्मार्ट कॉटन’ या उपप्रकल्पात सहभाग
- चिंच प्रक्रिया
- मसाले उत्पादने
- काजू प्रक्रिया
- नाचणी प्रक्रिया


जमीन मालकी आणि कृषी व्यवसाय यात महिलांचे स्थान त्यांच्या श्रमांच्या प्रमाणात नाही. हे चित्र बदलणे आवश्यक आहे.

आधुनिक बाजार प्रणालीत स्त्रियांची भागीदारी वाढवणे, कृषी प्रक्रिया, उद्योजकता यात स्त्रियांचा आत्मविश्‍वास वाढणे यातून खेड्यापाड्यातील स्त्रियांचे सक्षमीकरण शक्य आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्त्रियांचा सहभाग वाढण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत.
- कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे


महिला होताहेत सक्षम
- शेतीमालाला अधिक दर मिळविण्याचा उद्देश.
- प्रकल्पामध्ये संमिश्र शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये ३० टक्के महिला भागधारक व २० टक्के महिला संचालक ठेवण्याचे उद्दिष्ट.
- महिला उत्पादकांना कृषी व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहित करणे.
- विविध विषयांवर क्षमता बांधणी करण्यावर विशेष भर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com