Women Entrepreneurship Development : संपदा प्रकल्पातून महिलांना मिळाली दिशा

Sampada Project : पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीने वेल्हे तालुक्यातील (जि. पुणे) नऊ गावांमधील महिलांसाठी संपदा प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रशिक्षण घेतले. यातून ग्रामीण भागातील, कमी शिकलेली महिला कोणता व्यवसाय करू शकते, याचा आराखडा तयार केला.
Sampada Project
Sampada ProjectAgrowon
Published on
Updated on

Entrepreneurship Development In Rural Areas : ग्रामीण भागात उद्योजकता विकास करायचा ठरवलं, की महिलांना ‘पूरक उद्योग म्हणून काय करावे?’ असा नेहमी प्रश्न पडतो. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीने वेल्हे तालुक्यातील (जि. पुणे) नऊ गावांमधील महिलांसाठी संपदा प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रशिक्षण घेतले.

यातून ग्रामीण भागातील, कमी शिकलेली महिला कोणता व्यवसाय करू शकते, याचा आराखडा तयार केला. विविध पूरक उद्योगांना सुरुवात करीत गेल्या तीन वर्षांत महिला बचत गटांनी दहा लाखांची उलाढाल केली आहे.

शेवया निर्मिती उद्योगाला चालना

सोंडे (ता. वेल्हे, जि. पुणे) गावातील सरपालेवाडीमधील समृद्धी महिला बचतगटातील शशिकला कोंढाळकर यांनी परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सदस्यांच्या सहकार्याने शेवई निर्मिती सुरू केली. साधारणपणे तीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीमधून हा व्यवसाय सुरू झाला. शेवई बनवून गावातच विकता येते तसेच लोकांकडून रवा घेऊन शेवई तयार करून देता येते.

पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकी वर्षभर उत्पादन करता येते. पूरक उद्योगाबाबत शशिकला कोंढाळकर म्हणाल्या, की गावामध्ये तीन वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनीने व्यवसाय प्रशिक्षणासाठी सायबेज कंपनीच्या सहकार्याने संपदा प्रकल्प राबविण्यास सुरवात केली.

Sampada Project
Women Empowerment : शेतीपूरक व्यवसायांसाठी पुढाकार घ्यावा : मोहिते

शेवई निर्मितीला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही परिसरातील उद्योगांना भेटी देऊन यंत्रणा, उत्पादन आणि विक्रीचे गणित समजावून घेतले. बचत गटांमुळे कर्ज मिळणे सोपे झाले. शेवई निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर गावातील महिलांकडून चांगली मागणी वाढू लागली. गटाचा उद्योग असला तरी कोणी कोणते काम करायचे हे सदस्यांमध्ये ठरले आहे.

शेवया निर्मितीचे काम करणाऱ्या महिलेला श्रमाचा मोबदला मिळतो आणि बाकी गटाचा नफा राहतो. या उद्योगातून प्रति दिन पन्नास किलो शेवयांची निर्मिती होते. साधारणपणे ८० ते ९० रुपये प्रति किलो होलसेल दराने गावशिवारात शेवई विक्रीतून चांगली उलाढाल होते, असा आत्मविश्वास गटातील महिलांना आला आहे.

कृषी, ग्राम पर्यटनाला चालना

संपदा प्रकल्पात सहभागी असलेल्या सोंडे (ता. वेल्हा, जि. पुणे) गावातील मुकाई माता महिला बचत गटातील सदस्यांनी गेल्या वर्षी कृषी व ग्राम पर्यटन व्यवसाय करायचे ठरले. कोणत्याही हंगामात ‘चला आमच्या शेतात!’ अशा सहलीचे नियोजन बचत गटाने केले. सकाळी चहा-नाश्‍ता, शेतावर भटकंती, दुपारी घरगुती जेवण, मग गाव फेरी असे स्वरूप ठेवले आहे.

गावातील फेरीमध्ये देऊळ, विहीर, शाळा,बालवाडी, हातपंप तसेच जुन्या पद्धतीचे घर दाखवले जाते. संध्याकाळी चहा घेऊन पर्यटक परत पुण्याला जातात. दिवसभराच्या उपक्रमासाठी प्रति पर्यटक ३५० रुपये दर गटाने ठरविला आहे. गेल्या वर्षभरात ‘शेतात फिरायला, पावटा भात खायला’ अशा सहलीसाठी पुण्यातून अनेक पर्यटक आले. पर्यटनाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल गावामध्ये सुरू झाली आहे.

आर्थिक उलाढालीस संधी

ग्राम, कृषी पर्यटन सहलीसाठी एका कुटुंबातील कमीत कमी चार जण येतात. गावशिवारात फिरस्ती बरोबरीने काही पर्यटक गटातील सदस्यांच्या शेतात हंगामानुसार भात लावणी, भाजीपाला रोप लागवड, फळांच्या तोडणीसाठी मदत करतात.

सदस्यांच्या कुटुंबामध्ये पर्यटकांच्या मागणीनुसार शाकाहारी, मांसाहारी जेवणाची सोय करण्यात येते. घरामध्ये किंवा शेतामधील डेरेदार झाडाखाली पर्यटक जेवतात, निसर्गाचा आनंद घेतात. गावामध्ये आलेले पर्यटक सदस्यांची शेती फिरतात तसेच पावटा, वांगी, तांदूळ विकत घेतात. कोणी पर्यटक बालवाडीतील मुलांना खाऊसाठी देणगी देतात.

Sampada Project
Women Empowerment : अल्पभूधारक महिला झाली शून्यातून प्रक्रिया उद्योजक

यातून बहुतेकदा दिवसभरात शेतकरी कुटंबाला जेवण, नाश्‍ता, शिवारफेरचा खर्च वजा जाता ६०० ते ७०० रुपये मिळतात. सहलीसाठी पर्यटकांचा मोठा गट असेल, तर बचत गटातील एका कुटुंबाऐवजी २ ते ३ कुटुंबांच्या घरी नाश्‍ता, जेवणाची सोय केली जाते किंवा गटातील चार सदस्या एकत्र येऊन जेवण बनवितात.

मोठ्या पर्यटकांच्या गटांसाठी गटातील एका सदस्यांकडे गावफेरीची जबाबदारी असते. कृषी पर्यटनातून सदस्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी गावामध्ये भाजीपाला विक्री होते. यंदाच्या वर्षी गावामध्ये पर्यटकांच्या ४५ सहली आल्या होत्या. यातून वर्षभरामध्ये सव्वा लाख रुपयांची उलाढाल झाली.

इंधन कांडी निर्मिती व्यवसाय

वेल्हे (जि.पुणे) गावातील दिघे आळी परिसरातील वाल्मीकी महिला बचत गटाने मागणी लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी इंधनकांडी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. यासाठी दहा लाख रुपये भांडवली गुंतवणूक केली.

या व्यवसायासाठी गटाने काडी कचऱ्याचा भुगा करणारे यंत्र आणि इंधन कांडी बनवणारे यंत्र खरेदी केले. इंधन कांडी उत्पादनासाठी शेड उभारली. दोन्ही यंत्रे चालविण्यासाठी बचत गटाच्या नावाने स्वतंत्र वीज जोडणी मिळाली आहे. ज्ञान प्रबोधिनी संस्थेने वेल्हे तालुक्यातील २०० कुटुंबांना प्रदूषणमुक्त पंखा असणाऱ्या आधुनिक चुली दिल्या आहेत.

या चुलीमध्ये गटाने तयार केलेली इंधन कांडी वापरली जाते. त्यामुळे इंधन कांडी वापरणारा गट आणि वर्षभरातील इंधन कांडीच्या उत्पादनाच्या खरेदीची हमी ज्ञान प्रबोधिनी संस्थेने दिल्यामुळे हा उद्योग यशस्वीरीत्या सुरू आहे. शेतातील वाळलेला पालापाचोळा, काड्या कचरा म्हणून पेटवले जाते, ते गोळा करून त्याची पावडर करून त्यापासून इंधन कांडी बनवली जाते.

याचबरोबरीने भाताचे तूस, गव्हाचा भुसा, उसाचे पाचट वापरले जाते. इंधन कांडीमुळे जळणासाठी लाकूडफाट्याची गरज कमी झाली. गटातर्फे इंधन कांडी निर्मितीचे हे पहिलेच वर्ष आहे. यंदाच्यावर्षी गटाने सहा टन इंधन कांडीचे उत्पादन करून साठ हजारांची उलाढाल केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com