
मोनाली जोशी, डॉ. विजया पवार
Food Processing Industry:महिला उद्योजकांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग हा आत्मनिर्भरतेकडे नेणारा प्रभावी मार्ग आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध कच्च्या मालाचा वापर करून सरकारी योजनांच्या माध्यमातून महिलांनी प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. महिला बचत गट अन्न प्रक्रिया क्षेत्रात सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण आहेत.
या गटांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होतात. महिलांनी स्वतःचे उत्पादने तयार करून त्यांची विक्री केल्यास रोजगार निर्मिती होऊ शकते. यासाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेणाऱ्या महिलांसाठी विविध सरकारी योजना उपलब्ध आहेत.
पापड, लोणची, मसाले उद्योग :
- घराच्या स्वयंपाकघरातून प्रक्रिया उद्योगाची उभारणी करता येते.
- पापड, लोणचे आणि मसाल्यांना वर्षभर मागणी असते. त्यामुळे बाजारपेठ कायम उपलब्ध असते.
जॅम, ज्यूस, लोणची व्यवसाय :
- आरोग्यदृष्ट्या सुरक्षित उत्पादने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे.
- फळांवर प्रक्रिया करून मूल्य वाढवता येते. यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
ड्राय फ्रूट्स पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग :
- सुकामेव्याचे पॅकेजिंग व विक्रीतून चांगला नफा मिळतो. उद्योगासाठी फार मोठ्या जागेची गरज नाही.
डेअरी उत्पादने :
-दुधावर प्रक्रिया करून तयार केलेले उत्पादने (लोणी, चीज) विक्रीसाठी चांगले पर्याय आहेत.
- महिला गटास हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येतो.
पीठ गिरणी /धान्य प्रक्रिया :
- पीठ, डाळ, निर्मिती आणि विक्री हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे.
बेकरी उत्पादने :
-ब्रेड, बिस्किटे, केक हे नेहमी मागणी असलेले पदार्थ आहेत.लहान प्रमाणात सुरू करून हळूहळू व्यवसाय विस्तारता येतो.
हळद, आले, आणि हर्बल पदार्थ प्रक्रिया :
- औषधी वनस्पतींच्या प्रक्रियेतून उत्पादने तयार करता येतात. ग्रामीण, शहरी भागात मोठी मागणी आहे.
महिला गटांना संधी ः
- महिला बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू करता येतो.
- गटाच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देता येते. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि उद्योजकतेकडे प्रेरित करण्यासाठी महिला बचत गट अतिशय प्रभावी आहेत.
- महिला उद्योजकांसाठी अनेक योजना आहेत. उदा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना.
अन्न प्रक्रिया क्षेत्रातील भूमिका :
लघुउद्योगांची स्थापना :
- महिला बचत गटामार्फत स्थानिक पातळीवर लघू अन्न प्रक्रिया उद्योगांची सुरुवात करता येते. उदा. पापड, लोणची, मसाले, मिठाई,
बेकरी पदार्थ इत्यादींचे उत्पादन.
कच्च्या मालाचे रूपांतर :
- शेतीमाल, फळे, भाजीपाला यांसारख्या कच्च्या मालाचे रूपांतर करून मूल्यवर्धन केले जाते, ज्यामुळे त्या मालाची बाजारपेठेत जास्त किंमत मिळते.
उत्पादन गुणवत्ता सुधारणा :
-महिला गट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार उत्पादन तयार करतात, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो.
ब्रॅण्डची निर्मिती :
- काही महिला गटांनी आपले स्वतःचे ब्रँड तयार केले आहेत, ज्यामुळे त्यांची उत्पादने बाजारपेठेत ओळख मिळवतात.
स्थानिक रोजगार निर्मिती:
- अन्न प्रक्रिया उद्योगात महिला गट स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात.
महिला बचत गटांना मिळणारे फायदे ः
शासकीय आर्थिक साह्य :
- बचत गटांना अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी विविध शासकीय योजनांतर्गत आर्थिक साह्य दिले जाते.
प्रशिक्षण आणि कौशल्य विकास :
- महिलांना अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, उत्पादनाचे प्रमाणपत्र आणि बाजारपेठेतील मागणी याबाबत प्रशिक्षण दिले जाते.
विक्रीसाठी मार्केटिंग साह्य :
- राज्य सरकार व इतर संस्थांद्वारे महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रदर्शन, मेळावा आणि ई-मार्केटिंगसाठी साह्य मिळते.
सामूहिक पतपुरवठा :
- गटातील सदस्य एकत्रित कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणी करू शकतात.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना:
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (NREGA), स्वयंसिद्धा योजना, महालक्ष्मी महिला गट योजना.
शासकीय योजना ः
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही त्यांपैकी एक असून, याद्वारे महिला उद्योजकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रमाणे, महिला उद्यमिता योजनेअंतर्गत प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि विपणन क्षेत्रात मदत केली जाते. महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या डेअरी उद्योजकता विकास योजनेद्वारे दूध उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान दिले जाते.
स्वयंसाह्यता गटांसाठी विशेष योजना ः
महिला स्वयंसाह्यता गटांसाठी खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी अनेक योजना आहेत. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) अंतर्गत महिला स्वयंसाह्यता गटांना सवलतीच्या दरात कर्ज मिळते. यामुळे त्या महिलांनी एकत्र येऊन उद्योग सुरू करू शकतात. तसेच, खाद्य प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेद्वारे सूक्ष्म उद्योगांसाठी मदत केली जाते. महिलांना त्यांच्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग व मार्केटिंगसाठी प्रशिक्षण व आर्थिक साहाय्य दिले जाते.
योजनांसाठी कागदपत्रे आणि संपर्क ः
- महिला उद्योजकांसाठी अन्न प्रक्रिया क्षेत्रात विविध सरकारी योजना उपलब्ध आहेत. याचा उद्देश महिलांना आर्थिक साह्य, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देणे हा आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, बँका किंवा महा-ई-सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.
- उद्योग उभारणीसाठी ओळखपत्र, उद्योगाची योजना आणि इतर कागदपत्रे आवश्यक असतात. योजनांच्या अधिकृत संकेतस्थळांवर अर्ज करण्याची प्रक्रिया व तपशील उपलब्ध आहेत.
- महिलांनी स्थानिक स्तरावर आयोजित होणाऱ्या उद्योजकता शिबिरांमध्ये सहभागी होऊन अधिक माहिती मिळवावी.
उद्योगिनी योजना :
- ग्रामीण आणि मागासलेल्या भागातील महिला उद्योजकांना आर्थिक साह्य प्रदान करते. योजनेअंतर्गत, महिलांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते, ज्यावर ३० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. विशेषतः विधवा, निराधार आणि अपंग महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना :
- योजनेअंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान, जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत दिले जाते. अर्ज करण्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना :
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना शेतकरी आणि महिला उद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देते. योजनेअंतर्गत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नवीन प्रकल्प, जुन्या प्रकल्पांचे विस्तारीकरण, आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती यांना प्रोत्साहन दिले जाते.
महिला उद्यम विकास योजना :
- नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (NEDFi) सुरू केलेली ही योजना महिला उद्योजकांना आर्थिक साह्य, प्रशिक्षण, आणि विपणन साह्य प्रदान करते, ज्यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची वाढ साधता येते.
महिला उद्यम निधी योजना:
- पंजाब नॅशनल बँकेद्वारे चालवली जाणारी ही योजना महिला उद्योजकांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज प्रदान करते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायाची स्थापना किंवा विस्तार करण्यास मदत होते.
अर्ज करण्याची प्रक्रिया :
- प्रत्येक योजनेची अर्ज प्रक्रिया वेगवेगळी आहे.
- योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज फॉर्म डाउनलोड करा किंवा ऑनलाइन अर्ज भरावा.
- आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जागेचा करार, बँक स्टेटमेंट, उद्योग आधार, प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत.
- अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सादर करावा.
- संबंधित विभाग किंवा बँक तुमच्या अर्जाचे मूल्यांकन करून, आवश्यक कार्यवाही केली जाते.
संपर्क ः मोनाली जोशी, ७२१९८५७४६०
(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग,अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.