Women Discriminations : स्त्रियास्त्रियांमध्ये भेद कशासाठी ?

Indian Tradition : काळाबरोबर आपण आपल्या आयुष्यात अनेक बदल करत असतो. परंपरादेखील आपण अधिक कालसुसंगत करायला हव्यात. हळदीकुंकू समारंभात प्रत्येक बाईला सहभागी करून घेता येईल, अशा रीतीने आपण त्यात बदल करायला हवेत.
Women Discrimination
Women Discrimination Agrowon
Published on
Updated on

मुक्ता दाभोलकर

संक्रांतीनंतर हवेत हळूहळू उकाडा जाणवू लागतो. सूर्यप्रकाश बराच वेळ रेंगाळतो, रात्र लहान होते. ऋतूतील हा बदल आपण एकमेकांना तिळगूळ देऊन साजरा करतो. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ यात थोडा बदल करत हल्ली काही जण म्हणतात, ‘तीळगुळ घ्या आणि आपले राजकीय पक्ष वेगळे असले तरी बोला’ किंवा तीळगुळ घ्या आणि खरे बोला’ किंवा ‘तिळगुळ घ्या आणि न घाबरता बोला’ किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील एक स्नेही म्हणतात, की ‘तिळगुळ घ्या आणि विवेकाने बोला.’

संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम चालतात. महिलांना घराबाहेर पडण्याची संधी मिळावी, थोडी मजा करता यावी यासाठी या प्रथा पडल्या असं अनेक जण म्हणतात. लहान गावात तर या दिवसांत छानदार साड्या नेसून ठिकठिकाणच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या उत्साही महिलांचे जथ्थेच्या जथ्थे दिसतात.

पण हळदीकुंकू, त्यानिमित्ताने मिळणारे वाण आणि आनंद फक्त सौभाग्यवती म्हणजे ज्यांचा नवरा जिवंत आहे अशा महिलांनाच लुटता येतो. हे मला फार दुःखदायक वाटते. महिलांना घराबाहेर पडण्याची संधी मिळावी, थोडी मजा करता यावी हा जर या कार्यक्रमामागचा हेतू आहे असे आपण म्हणत असू तर विधवा महिलांना पण तो आनंद मिळायला नको का? खरे तर जोडीदार गमावलेल्या व्यक्तीला अशा सणांची जास्त गरज नाही का? मग स्त्रियांच्यात हा जातीभेद कशासाठी?

Women Discrimination
Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाले तर आदल्या वर्षीपर्यंत हळदीकुंकू समारंभांना सोबत जाणाऱ्या मैत्रिणी, शेजारणी तिला बोलवायला येत नाहीत. अशावेळी काय वाटत असेल तिला? पती निधनानंतर आपल्याच माणसांनी हळदीकुंकू किंवा इतर शुभ कार्यातून वगळणे मनाला किती चरचरून भाजून जाते याबद्दल अनेकींनी सांगितलेले अनुभव मी ऐकले आहेत. तुम्हीही ऐकले असतील. या अनुभवांतून अक्षरशः एकही विधवा सुटत नाही.

नुकतीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलाखत यू-ट्यूबवर बघितली. हिंदी, मराठी मालिका, नाटक, चित्रपट इ. सर्व ठिकाणी आपल्या कलागुणांमुळे यशस्वी झालेल्या या अभिनेत्रीला एकदा अमुक ठिकाणी विशेष उपस्थिती म्हणून तुला हळदीकुंकवाला जायचंय असं आदल्या दिवशी सांगितलं गेलं. ती छान तयार होऊन गेली. तेव्हा ती विधवा आहे हे ध्यानात येऊन ‘तू आली नाहीस तरी चालेल’ असं सांगण्यात आलं.

१८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध लिहिणाऱ्‍या ताराबाई शिंदे त्या दीर्घ निबंधात एका ठिकाणी म्हणतात, की ‘... स्त्री जात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून, तळतळून गेले.’ मला वाटते, की आपल्या विधवा मैत्रिणींना मिळणाऱ्या या वेगळेपणाच्या वागणुकीमुळे आपले मन पण असे खळबळून, तळतळून जायला हवे. इंग्रजी भाषेत ‘एम्पथी’ असा एक सुंदर शब्द आहे. सिंपथी किंवा सहानुभूतीपेक्षा हा शब्द वेगळा आहे.

दुसऱ्‍याच्या दुःखाबद्दल वाटते ती दया किंवा सहानुभूती म्हणजे सिंपथी. पण आपण त्या दुःखी व्यक्तीच्या जागी आहोत अशी भावना मनात येऊन आपण दुसऱ्‍याचे दुःख मनोमन अनुभवणे म्हणजे एम्पथी. वैधव्यामुळे हळदीकुंकवाच्या समारंभातून वगळलेल्या आपल्या मैत्रिणीबद्दल किंवा शेजारणीबद्दल अशी एम्पथी आपल्याला वाटते का? एम्पथी सोडा ‘जात्यातले आणि सुपातले’ ही व्यवहारातील समज तर प्रत्येकाने मनात कायम जागी ठेवायला हवी, असं आपल्याला वाटतं का?

Women Discrimination
Women Empowerment : सनद - महिलांचे जीवनमान सुधारण्याची

हे लिहिताना मला विद्याताई बाळ यांची आठवण येतेय. विद्याताई या स्त्रीवादी चळवळीतील एक संपादक, कार्यकर्त्या होत्या. ३० जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्या म्हणत, ‘हळदीकुंकवात कोण सौभाग्यवती, कोण विधवा, कोण परित्यक्ता, कोण टाकलेली, कोण अविवाहित असे भेद केले जातात. त्याला माझा विरोध आहे. त्यातही अविवाहितांमध्ये दोन प्रकारच्या स्त्रिया मोडतात. ज्यांना स्वखुशीने लग्न करायचं नाही अशा आणि ज्यांना लग्न करायचं आहे पण अजून झालं नाही अशा. या सर्वांना हळदीकुंकू परंपरा नाकारते.’

काळाबरोबर आपण आपल्या आयुष्यात अनेक बदल करत असतो. परंपरादेखील आपण अधिक कालसुसंगत करायला हव्यात. हळदीकुंकू समारंभात प्रत्येक बाईला सहभागी करून घेता येईल अशा रीतीने आपण त्यात बदल करायला हवेत. आपल्या घरच्या किंवा महिला मंडळाच्या हळदीकुंकवापासून सुरुवात करता येईल. हळदीकुंकू समारंभ हे नाव वापरल्याने विधवा महिला येत नसतील तर आपण त्याला ‘तिळगूळ समारंभ’ असे छानसे नाव देऊ शकू. तुम्ही असे करत असाल तर मला जरूर कळवा.

(लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन, पंचायत राज प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)

९४२३२९७९६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com