
Sangli Weather Forecast : सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, जत तालुक्यात वळीव पावसाने झोडपून काढले. यामध्ये शिराळा तालुक्यातील एका शेतकरी महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. तर जत तालुक्यात शेतकऱ्यांचे डाळींब शेती पूर्णपणे भुईसपाट झाल्याने सांगली जिल्ह्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
शिराळा तालुक्यातील तडवळे येथे शेतात भांगलण करून परत येत असताना सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.२५) सायंकाळी घडली. या घटनेची माहिती सुनंदा पाटील यांचा पुतण्या सूरज पाटील यांच्याकडून शिराळा पोलिसांत माहिती देण्यात आली. सुनंदा पाटील यांच्यासोबत नंदा पाटील, शांताबाई पाटील याही होत्या परंतु यांना कोणतीही इजा झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिराळामध्ये सायंकाळी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला. सुनंदा घरी निघाल्या असता त्यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. यावेळी शेजारी असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तडवळे गावच्या पोलिस पाटील वैशाली पाटील यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी भेट दिली. तसेच ग्रामसेवक प्रभावती भोसले, सरपंच प्रियांका पाटील, तलाठी सुनील जावीर, ग्रामसेवक भोसले यांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अविनाश पाटील यांनी शवविच्छेदन केले.
चप्पल आणायला गेल्या अन् घात झाला
सुनंदा पाटील या इतर महिलांसोबत शेतातून निघाल्या होत्या परंतु काही अंतरावर गेल्यावर चप्पल राहिल्याचे लक्षात आल्याने त्या मागे आल्या. चप्पल आणण्यासाठी परत गेल्या जाऊन येत असताना अंगावर वीज पडली. यावेळी घटनास्थळी असलेल्या महिलांनी प्रत्यक्षदर्शी घटना पाहिल्याने त्यांचा थरकाप उडाला होता.
जत तालुक्यात द्राक्ष बागा, बेदाण्याचे नुकसान
जत तालुक्यात तिकोंडी, भिवगों, पांडोझरी, कोणवगी, संख, धुळकरवाडी, कोंतेव बोबलाद परिसरात वळवाचा तडाखा बसला. वादळी वारा आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागा उन्मळून पडल्या आहेत. तर रॅकमध्ये ठेवलेल्या बेदाण्यालाही फटका बसला आहे. दोन कोटींहून अधिक नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली. तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
या भागातील द्राक्ष उत्पादकांना फटका बसला आहे. काहीच्या बागा मुळासकट उन्मळून पडल्या. वाऱ्याने बागेतील घडांची मोठी गळती झाली. गारांमुळे चांगल्या फळांना दणका बसला. तिकोंडी येथील सिध्दाण्णा गोब्बी ५ एकर, भैराप्पा अमृततटटी ४ एकर, संतोष गोब्बी २ एकर, शिवानंद गोब्बी २ एकर, आप्पासो व्हनकंडे, उमेश व्हनकंडे यांची ५ एकर, सोमू गोब्बी २ एकर, भरमू गोब्बी १ एकर पांडोझरी येथील पुजारी यांची २ एकर यासह रॅकवरील बेदाण्याला फटका बसला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.