Diwali Celebration : दिवाळीच्या कपड्यांनी शिकवलेलं शहाणपण

गोधन खेळवण्याच्या दिवशी त्यातलच एक पिस्ता कलरचं शर्ट सहज घालून बघितलं,जरा ढगळ होतं पण छान दिसत होतं म्हणून तसच घालून गेलो.
Diwali Celebration
Diwali CelebrationAgrowon

लेखक- पुनीत मातकर

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी गोधन खेळवतात.म्हणजे गोधनातील सर्व गायींना सजवून मिरवणूक काढतात. गोधन राखणारे गुराखी बांधव शक्यतो गोवारी व कोलाम समाजाचे असतात. शिंगांना मोरपंख बांधून गळ्यात घुंगरमाळा घालून या गायींना मारूती मंदिराला प्रदक्षिणा घालून मग जंगलात चरायला नेतात.वर्षभराचे धान्य,पैसे,कपडे यादिवशी गुराखी बांधवांना मिळतात. गायींच्या कळपामागे सारी लहान मुले दिवाळीला घेतलेले नवे कपडे घालून फिरतात..डफाच्या तालावर नाचतात. फटाके उडवतात.

खरंतर मला कळत्या वयापासून कुठल्याही आवाजी गोष्टी आवडत नाही अगदी माणसंसुद्धा. दिवाळीत भूचक्र, झाड,फुलझडी ही त्यातल्या त्यात छान वाटतात.तर सांगायचं हे होतं की दिवाळीला नवे कपडे हा प्रकार आपल्यासाठी नाहीच असं अकाली समजूतदार मनावर आम्ही भावंडांनी कोरून घेतलं होतं. माझ्यापेक्षा मोठी एक बहीण आत्याकडे काही वर्ष शिकायला होती. एका दिवाळीत थोडफार सामान घेऊन ती सुटीत घरी आली. आत्याने आतेभावांचे छोटे झालेले कपडे माझ्यासाठी पाठवले होते घरी घालायला म्हणून. नवे कपडे पाठवू शकण्याइतपत आत्याची परिस्थिती नक्कीच होती तरीही. बाबा फार दुखावले पण काही बोलले नाही. हे कपडे घालू नको बस एवढच सांगितलं.

गोधन खेळवण्याच्या दिवशी त्यातलच एक पिस्ता कलरचं शर्ट सहज घालून बघितलं,जरा ढगळ होतं पण छान दिसत होतं म्हणून तसच घालून गेलो.मजुरदारांची सारी मुलं देखील नवे कपडे घालून होती. मनातलं अवघडलेपण लपवत मी त्यांच्यात मिसळून गेलो. साईजवरून कुणाच्याही लक्षात येत होतं ते माझं नसावं. एक दोन जणांनी खिजवण्याच्या सुरात मुद्दाम विचारलंही. मात्र बस स्टँडवरून गायीमागे जातांना नेमकं बाबांनी बघितलं आणि घरी परतल्यावर प्रचंड ओरडले ते माझ्यावर. त्यांच्या डोळ्यात कधीही न दिसलेलं पाणी तरळलं. आईनं डोळ्याला पदर लावला. एवढं काय आक्रीत झालं मला कळेना. मी स्तब्ध झालो अन् लगेच शर्ट बदलला मग बाबांच्या सांगण्यावरून ते सगळे कपडे नागोरावकडे देऊन आलो.

काळाच्या ओघात हळूहळू बाबांच्या डोळ्यातील तेव्हाच्या पाण्याचा अर्थ उमगत राहिला. त्यांच्या स्वाभिमानी मनाच्या वेदना कळून आल्या. समज येत गेली तसं कपड्यांचं अप्रूप संपलं. आहे त्यात आनंदी रहायचा मंत्र भावंडांनी आत्मसात केला. अनेक लग्नात कार्यक्रमात मी शाळेचाच युनिफॉर्म नीट धुऊन प्रेस करून घातलाय. अनेक घरातून अशी अनेक मुलं अकाली समजूतदार होतात.

आता वाटतं नकळत्या वयातलं अजाणतेपणं खूप निरागस गोड असतं ते कुणाचं हरवू नये. आपल्या लेकरांना बऱ्यापैकी कपडे अन् सणासुदीला गोडधोड खाऊ घालता येण्याइतकं तरी बळ प्रत्येक बापाला या निसर्गानं द्यावं. त्याच्या प्रामाणिक कष्टाला यश द्यावं. बालपणातले बरेच ओरखडे आयुष्यभर पिच्छा पुरवतात. आज वाट्टेल ते आणि हवे तसे कपडे घेण्याची ऐपत असतांना मी फार ब्रँडच्यामागे धावत नाही. ढिगभर कपडे असतांनाही त्याचं प्रदर्शन करावसं वाटत नाही. कपडे फोकस होतील असं राहात नाही.

घालतांना कंफर्टेबल वाटतील आणि आपल्याला खुलून दिसतील एवढीच किमान काळजी घेतो. उपजतच रंगांची समज असल्याने कधी काही चुकत नाही. भेट देतांनाही खूपदा मला कपडे हा आवडता पर्याय वाटतो. आज इंडो वेस्टर्न, वेस्टर्न,एथनिक,फॉर्मल,कॕज्युअल सर्व काही कपाटात आहे... बस्स बालपण तेवढं हरवलय झटकन बदलून टाकलेल्या पिस्ता कलरच्या शर्टसह....!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com