डॉ. सुमंत पांडे
Rural Development : गाव आराखडा तयार करते वेळी गाव घटक ऐवजी पाणलोट घटक विचारात घेऊन कामाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पूर्ण एक दिवसाची शिवारफेरी करावी.
पाणलोट क्षेत्र व्यापक असेल तर आणि गाव वेगवेगळ्या पाडे, वाड्यांमध्ये विभक्त झाले असेल, तर एकापेक्षा अधिक टीम करून त्या त्या ठिकाणी भेट देऊन शिवारफेरी करणे उचित राहील.
शिवारफेरीच्या टीमचे प्रशिक्षण :
प्रत्येक टीमचे आधी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे सर्व साहित्य, माहिती, नकाशे इत्यादी सर्व सोबत घेऊन त्याचा वापर कसा करावा? लोकांशी चर्चा कशी करावी? चर्चेचे मुद्दे काय असावेत? उत्तरा दाखल मिळालेल्या मुद्द्यांची मांडणी कशी करावी? याबाबत या प्रशिक्षणामध्ये उल्लेख असावा.
शिवारफेरीचा उद्देश :
१) ग्रामविकासाचा उद्देश आधीच स्पष्ट झालेला असतो. जसे की दुष्काळ किंवा जलसंधारणाच्या कामासाठीचे नियोजन करण्यासाठीची शिवारफेरी, गाव पूरप्रवण असल्यास त्याचे उद्देश वेगळे असावेत. गावाच्या पायाभूत सुविधा आणि त्यांची वस्तुस्थिती जाणण्यासाठी शिवारफेरी, इतरही भिन्न उद्देश असू शकतात.
२) शिवारफेरीची पूर्वतयारी व्यवस्थित केल्यानंतर ज्या ऋतुमानात शिवारफेरी करत असाल त्या ऋतुमानाप्रमाणे तुम्हाला तुमचा पोशाख पेहराव आणि साधनांची उपलब्धता आवश्यक आहे. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात जर जाणारा असाल तर उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी, पिण्याचे पाणी, पायामध्ये बूट, इत्यादी.
जर पावसाळी नियोजन असेल, तर त्या वेळेस पावसापासून संरक्षण करणारे साहित्य इत्यादी आवश्यक असते. या साधनांची शिवारफेरीच्या पूर्वतयारीमध्ये गणना शक्यतो केली जात नाही, अथवा विचार केला जात नाही; परंतु सकस आणि निर्दोष पाहणीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
शिवारफेरीचे मुद्दे आराखड्यात समाविष्ट करा
१) जलयुक्त शिवार अभियानासाठी शिवारफेरी : या शिवारफेरीचा मूळ उद्देश पर्जन्यमान आणि अपधाव याचा अभ्यास करणे. गावामध्ये असलेल्या छोट्या, मोठ्या तलावांची, जलस्रोतांची, पाहणी करून त्यांच्या सद्यःस्थितीची नोंद करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, अस्तित्वात असलेल्या जुन्या तलावांची माहिती घेणे: शिवारफेरीच्या दरम्यान त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणलोट हा घटक मानून माथा ते पायथा अशी शिवारफेरीची रचना असते.
माथ्याकडील भागात पडलेला पाऊस तो कसा प्रवाहित होतो, यावर त्याचा अपधाव अडविणे आणि पाण्याची साठवणूक करणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्या प्रवाहावरच तलाव किंवा अन्य उपाय केले जातात. त्याचबरोबर माथा ते पायथा नियोजनात कोणते उपचार आवश्यक आहेत.
उदाहरणार्थ, सलग समतल सर, खोल सलग समतल सर, अनघड दगडी बांध, गॅबियन पद्धतीचे बांध, माती नाला बांध इत्यादी तत्सम उपचार करण्यासाठी योग्य जागा कोणती हे यामध्ये पाहणे अत्यंत गरजेचे ठरते.
नोंदी महत्त्वाच्या :
१) शिवारफेरीच्या दरम्यान नकाशावर एका विशिष्ट खुणेने नोंद दर्शवावी. त्याचप्रमाणे आपल्या मोबाईल वरून तेथील गुगल करंट लोकेशन ठेवावे. त्यासोबत वेगवेगळ्या प्रतलातून काढलेले फोटो आणि छोटे व्हिडिओ हे देखील नावासहित संरक्षित करून ठेवावेत.
२) शक्यता आहे की एका गावाला डोंगरच नाही अशा वेळेस काय करावे, याबाबत संभ्रम असतात. डोंगर नसलेल्या ठिकाणी प्रवाह असतात. त्यांच्या उताराकडचा भाग कोणता आणि तेथे अपधाव किती असेल हे काढता येते. या ठिकाणी उपचाराची पद्धती बदलते. जसे की मृद्संधारण व जलसंधारण. हे या ठिकाणचे प्रामुख्याने उपचार ठरतात.
त्याचप्रमाणे ओघळीचे उपचार हे या ठिकाणी प्राध्यान्यक्रमाचे असतात. या सर्व नोंदी शिवारफेरी करणाऱ्यांनी शक्यतो अचूकपणे लिहून ठेवणे गरजेचे आहे. त्यावर आधारित आराखडा करण्यासाठी याचा निश्चित उपयोग होतो.
एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, की निसर्गाशी संवाद साधून केलेली शिवारफेरी आणि नमुने हे आराखडे बिनचूक होण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्या आधारे केलेले उपचाराची नियोजन हे योग्य ठरते आणि त्याचा दीर्घकालीन लाभ निश्चित होतात.
सदस्यांची बैठक
१) शिवारफेरी पूर्ण झाल्यानंतर सर्व टीममधील सदस्य एकत्र येऊन बैठक घेतील. ही बैठक शक्यतो ग्राम पंचायत अथवा गावातील मंदिर, सार्वजनिक ठिकाण, समाज मंदिर, शाळा इत्यादी असावे.
२) शिवारफेरीच्या टीमने आपल्या सोबत आणलेले नकाशे नोंदी यांच्या व्यवस्थित मांडणी करून त्याची नोंद नकाशावर आणि नोंदवहीत व्यवस्थित घेणे गरजेचे आहे. या नोंदी ज्या वार्डातील असतील तेथील नागरिकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामध्ये त्यांचा विचार आणि सल्ला घेणे गरजेचे आहे.
३) सर्वांच्या चर्चेमध्ये तयार केलेला आराखडा ग्रामसभेसमोर मान्यतेसाठी ठेवावा. ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर अंमलबजावणी यंत्रणांनी प्राधान्याने त्यांच्या नियमित आर्थिक तरतुदीतून ही कामे पूर्ण करावीत.
४) विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कामांना त्यांच्या प्रचलित मार्गदर्शक सूचनानुसार तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी.
आधुनिक साधनांची उपयुक्तता
१) आज आपण महाराष्ट्र सुदूर संवेदन प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध झालेले नकाशे वापरतो आणि उपग्रहातून प्राप्त चित्राचा उपयोग करून जलनियोजन करतो. तथापि काही वर्षांपूर्वी सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी टोपोशीटनामक एक नकाशा होता.
जो सर्व्हे ऑफ इंडिया यांनी तयार केलेला आहे. संपूर्ण देशाची विभागणी या टोपोशीटद्वारे विविध प्रकारात केलेली आहे. या मधील प्रत्येक स्थानाची कंटूर लाइन असते आणि तेथे त्याची उंची दिलेली असते.
२) अभ्यासकाने शिवारफेरीच्या नोंदी घेत असताना किती उंचीवरून पाणी येईल त्याप्रमाणे तो अपधाव अडविण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपचार नेमके कुठे करावेत याच्या नोंदणी घेतल्या जातात. आजही टोपोशीट वापर अनेक ठिकाणी करतात. बऱ्याच ठिकाणी तो उपयुक्त ठरला आहे.
३) शिवारफेरीच्या दरम्यान ज्या टीमने फिरून माहिती घेतलेली आहे, ती सर्व एकत्रित करून ग्रामपंचायत क्षेत्राचा विशेषतः पाणलोट क्षेत्राचा संपूर्ण नकाशा एकत्रित करावा. त्यावर अद्ययावत नोंदी कराव्यात. त्यानुसारच उपचाराची पद्धती सांगणे गरजेचे आहे.
जल, मृद्संधारणावर द्या लक्ष ...
महाराष्ट्रामध्ये १९७२ चा दुष्काळ हा बऱ्याच अर्थाने मैलाचा दगड मानला जातो; म्हणजे १९७२ च्या दुष्काळाच्या पूर्वीची स्थिती आणि त्यानंतरची स्थिती असे सर्वसाधारणपणे तुलनात्मक चर्चा होत असते याचे कारणही तसेच आहे ७२ च्या दुष्काळामध्ये जो खूप भीषण होता आणि सर्वदूर होता. त्याचे परिणाम कृषी आणि उपजीविकेवर गंभीरपणे झाले.
तथापि या संकटातही संधी मानून रोजगार हमी योजनेसारखे योजना महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या. अशा योजनांच्या माध्यमातून गावोगावी ओघळीवर उपचार, छोटे तलाव बांध इत्यादी बांधण्यात आले. ते आजही यथास्थितीत आहेत.
१) गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे नुकसान झाले आहे, त्यामध्ये गाळ साचलेला आढळतो. त्याचबरोबर काही ठिकाणी तलावाच्या पायातून पाण्याची गळती होते. या सर्व बाबी शिवारफेरीमधील नोंदीमध्ये घ्याव्यात.
२) बहुतांश भागात सांडवे तुटलेले आहेत. त्यांची योग्य स्थिती नाही. त्यांची तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दुरुस्ती करून घ्यावी. कारण सांडवा हा त्या तलावाचा रक्षक असतो. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटी होते. अशा वेळेस मोठ्या प्रमाणावर वेगाने पाणी येते आणि सांडवे व्यवस्थित नसतील तर त्याचा दाब या तलावाच्या भिंतीवर होतो आणि काही वेळेस तो फुटण्याची शक्यता असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.