Education System : तुमी मॅडम कशाला झाल्या कायनू?

कार्यालयानं तातडीनं मागितलेला सांख्यिकी माहितीचा अहवाल कोणत्या नमुन्यात द्यायचा, हे समजून घ्यायला शेजारच्या शाळेतल्या शिक्षिका आमच्याकडे आल्या होत्या. मुख्याध्यापक रजेवर होते म्हणून त्या माझ्या वर्गात आल्या.
Education System
Education SystemAgrowon

कार्यालयानं तातडीनं मागितलेला सांख्यिकी माहितीचा अहवाल कोणत्या नमुन्यात द्यायचा, हे समजून घ्यायला शेजारच्या शाळेतल्या शिक्षिका (Education System) आमच्याकडे आल्या होत्या. मुख्याध्यापक रजेवर होते म्हणून त्या माझ्या वर्गात आल्या. शिकवायचं सोडून त्यांच्यासोबत बोलू लागलो.

(सरकारी शाळेतल्या बहुसंख्य शिक्षकांना शिकवताना असे अनेक ‘स्पीड ब्रेकर’ येतात. असो.) माहिती बरीच किचकट होती. त्यांना समजावून सांगत होतो. आमची चर्चा सुरु झाली, तशी मुलांची आधी चुळबूळ आणि मग बडबड सुरु झाली. पुढं बडबडीचं रुपांतर ‘गोंधळा’त झालं. आमचा दोघांचाच आवाज एकमेकांना ऐकू येईना, इतका गोंगाट सुरु झाला. माझे एक सहकारी शिक्षक मिटींगला गेल्यानं आज दोन वर्ग एकत्र बसले होते. त्यामुळं नेहमीपेक्षा आजचा आवाज मोठा असला तरी मला सवयीचा होता. मात्र आवाज ऐकून त्या शिक्षिका मुलांवर चांगल्याच भडकल्या.

Education System
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

“ए अरे, किती बडबड करताय? जरा गप्प बसा...” त्या जवळजवळ ओरडल्याच. वर्गशिक्षक म्हणून मुलांवर मी शक्यतो असं ओरडत नाही. मुलांना हे नवीन होतं. ती गप्पगार झाली. हरहुन्नरी स्वभावाची वर्गातली राणी माझ्याजवळ आली. “ह्या कोणये ओ सर?” तिनं हळू आवाजात विचारलं. “त्या मॅडम आहेत. शाळेत मुलांना शिकवतात.” मी सांगितलं. “मॅडम असून पोरांवर एवढया कशा काय चिडात्याय?” त्यांच्यासमोरच राणीनं तिच्या नेहमीच्या बेधडक शैलीत विचारलं.

“दोन दोन शिक्षक वर्गात असताना, तुम्ही अख्खा वर्ग डोक्यावर घेतलाय. तरी बोलायचं नाही, मग तुमची पूजा करायची? काही शिस्तबिस्त आहे की नाही?” त्या तार स्वरात बोलल्या. पोरं कावरीबावरी झाली. राणी सहजासहजी गप्प बसणारी नव्हती. “जाऊ द्या हो मॅडम, बोलूनचालून पोरंचहेत. सुटीच्या दिशी आमच्यावाली आज्जी आमाला लई वैतागती.

ती म्हणती कित्ती बडबड करत्याय रे, तुमची तोंडं खापराची असती, तर कवाच फुटून गेली असती,” ती चाचरत चाचरत बोललीच. पुढं म्हणाली, “आमच्यावाले सर आमच्यावं कवाच जोऱ्यानं आरडती नाई. मारती बी नाई. तुमाला तं बडबड बी सोसत नाय. तुमी मॅडमच कशाला झाल्या कायनू?” राणी तिच्या नेहमीच्या अंदाजात बोलली आणि निष्पापपणे जागेवर जाऊन बसली.

Education System
Farmer Producer Company : अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना

चकित नजरेनं मॅडम माझ्याकडं बघू लागल्या. कारण उघड होतं, राणीचं बोलणं त्यांना आवडलेलं नसावं. त्यांचा चेहरा उतरलेला दिसत होता. मुळात शिक्षक असून, मुलांचं असंलं थेट बोलणं ‘ऐकून घ्यायची’ सवयच नसल्यानं त्यांना राग आला असावा. नितळ मनाच्या राणीच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती.

मी नजरेनंच त्यांना ‘हलकेच घ्या’, असं सुचवलं. आमचं बोलणं झालं. त्या घाईनं निघून गेल्या. दिवसभर शिकवताना ‘बॅक ऑफ द माईंड’ मी त्या प्रसंगावर विचार करत राहिलो. खरं तर त्या चांगलं काम करणाऱ्या, सुस्वभावी, मितभाषी शिक्षिका आहेत. कदाचित पर्यवेक्षकीय यंत्रणेनं अचानकपणे सांगितलेल्या प्रशासकीय कामाचा ताण त्यांच्या मनावर आला असावा.

राणी शाळेत आली तेव्हा अशी बोलघेवडी नव्हती बरं का. इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून तिसरीत ती आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आलेली. लाजरी-बुजरी. मुलांमध्ये न मिसळणारी. काहीशी अबोल. तिच्या मनाची कुलूपबंद कवाडं संवादाच्या किल्लीनं उघडून, तिला बोलतं करायला दोन-अडीच वर्षं लागली. आता पाचवी-सहावीत आल्यावर ती मुक्तपणे व्यक्त होतेय. तिच्या आजीमुळं ती अशी गोष्टीवेल्हाळ बनलीय. तिच्या अशा स्वभावानं शाळेतले शिक्षक आणि मुलांमध्ये ती विशेष प्रिय झालेली. तिला इथवर आणतानाचे प्रयत्न आठवले.

Education System
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

तिला शिकायचं होतं मराठी शाळेत. घरच्यांनी पाठवलं इंग्लिश शाळेत. तिला भाषेची भारीच अडचण यायची शिकताना. घर, परिसराची भाषा वेगळी. पाठ्यपुस्तकं आणि शाळेची भाषा निराळी. तिला काहीच नीट जमत नव्हतं. ‘तू काहीही शिकू शकणार नाही,’ असा शिक्का तिच्यावर मारला गेलेला! पालक आणि शिक्षक यांच्याकडून.

तिचा आत्मविश्वास खालावलेला. लघवीला जातानादेखील हात बांधून जायची तिकडची शिस्त,  टाय-बूट-सॉक्स, गणवेशात तिला गुदमरायला व्हायचं. शाळा आणि शिक्षण नकोसे वाटू लागलेले. ‘आपण कशाच्याच लायकीचेच उरलेलो नाहीत,’ या विचारानं तिच्या मनाच्या आभाळात मळभ दाटून आलेलं.

Education System
LPG Gas Rate Hike : दुष्काळात तेरावा महिना; एलपीजी सिलेंडर १०५ रुपयांनी महागला

तिला आणि तिच्यासारखीच लेबलं लावल्यानं आत्मविश्वास गमावून बसलेल्या आणखीन एका मुलाला न्यूनगंडातून बाहेर काढताना मुलं आणि शिक्षकांनी बरेच प्रयत्न केलेले. तिच्या घरी जाणं, कुटुंबीयांशी गप्पा, दुपारी तिच्यासोबत जेवणं, काही काम सांगायचं असल्यास मुद्दाम तिला सांगणं... नानाप्रकारे तिला सामावून घेत राहिलो. सतत बोलत राहिलो. हळूहळू मळभ दूर होऊ लागलं. हिरमुसन चाललेली एक कळी एकेका पाकळीनं उमलू लागली...

वर्गातला वर उल्लेख केलेला प्रसंग सांगायचा हेतू आपल्याला राणीच्या शैक्षणिक आयुष्याच्या ‘फ्लॅशबॅक’मध्ये नेणं हा नाहीचये मुळात. मुलांच्या सहवासात असणाऱ्या, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी मुलांना समजून घेणं कसं आवश्यक असतं, हे सांगण्यासाठीचं निमित्त आहे हा प्रसंग. त्याविषयी सविस्तर बोलूया.

Education System
Onion Cultivation : कांदा लागवड क्षेत्रात होतेय घट

माणसाला जे मिळतं तेच माणूस परत करतो म्हणतात. ‘पेराल तेच उगवतं’ म्हणतात ना अगदी तसं. शिक्षक विशिष्ट वातावरणात शिकलेले, वाढलेले असतात. काळानुसार शिकण्या-शिकवण्यापासून मुलांशी वागण्याच्या कितीतरी गोष्टी बदलत जातात.

शिक्षणात नवी संशोधनं होतात. नवे प्रवाह येतात. आधीचे बरेच संदर्भ मुळातून बदलत जातात. हे सारं निरंतर सुरु असतं. शिक्षणात याचं विशेष महत्त्व असतं. अनेकदा हे सारं समजून उमजून न घेताच बहुसंख्य पालक, शिक्षक मुलांसोबत वागतात. शैक्षणिक व्यवहार करत राहतात.

मुलांच्या मनातल्या कल्पना, भावना, प्रश्न,विचार, अभिप्राय, अनुभव, त्यांची मतं, म्हणणं, अपेक्षा, हरकती असं जे जे म्हणून मुलांना सांगायचं, व्यक्त व्हायचं असतं. ते मोठ्यांनी म्हणजे पालक, शिक्षक आदींनी उत्सुकतेनं, मनापासून ऐकावं असं मुलांना मनापासून वाटतं. आपलं म्हणणं ऐकून घेणारं माणूस आहे, अशी खात्री पटली तरच मुलं मनाची कवाडं किलकिली करतात, असा शिक्षक, पालक म्हणून अनुभव आहे.याउलट माझ्या आवडीनिवडींना इथं काहीच स्थान नाहीये, अशी भावना मुलांच्या मनाची पकड घेते; तेव्हा मुलं संबंधित व्यक्तीपासून मनानं हळूहळू दूर जातात.

भोवती नेहमी दिसणारं उदाहरण सांगतो म्हणजे मुद्दा लक्षात येईल. मोठी माणसं बोलतात तेव्हा लहान मुलांनी मध्येच बोलू नये, असा जणू अलिखित नियमच मोठ्यांनी करून ठेवलाय. समजा एखादं मूल येऊन मध्येच बोलू लागलं तर आधी त्याच्याचशी बोलावं मग आपल्या विषयाकडं यावं, हे शहाणपण किती पालकांपाशी आहे?

शिक्षक कार्यालयात बैठकीत बसले असतील, वर्गात काहीतरी माहितीचा अहवाल लिहित असतील आणि इतक्यात एखादं मूल लाडात येऊन काही सांगायला लागलं तर... काय प्रतिक्रिया असतात बरं? ऐकून घेणं सोडाच; अशा वेळी मुलांना झटकून टाकलं जातं. मुलं कोमेजून जातात. पुन्हा मनातलं उत्सुकतेनं सांगू बघत नाहीत. मुलांना किती गृहीत धरतो ना आपण!

सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना भरपूर अशैक्षणिक कामं करावी लागतात. या खर्डेघाशीचा शिक्षकांच्या मनावर प्रचंड ताण येतो. अलीकडं शिक्षकांना हरकाम्यासारखं वागवलं जातंय. या प्रशासकीय कामांमुळं येणाऱ्या मानसिक ताणांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. बरं या ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करायचं? हा आमच्या शिक्षक प्रशिक्षणाचा भाग नसतोच कधी. हा ताण व्यवस्थेनं बिचारेपण लादलेल्या शेवटच्या घटकावर म्हणजे मुलांवर निघतो. कारण मुलं ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात!

शाळा जर का मुलांसाठी असतील तर कोणत्याही परिस्थितीत मुलांना तिथं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे. असं किती शाळांतून होतंय? सेवापूर्व किंवा सेवांतर्गत प्रशिक्षणांतून शिक्षकांमध्ये अशा तऱ्हेची समज रुजवायला काही केलं जातं का? असे प्रश्न माझ्यासारख्याला साहजिकच पडतात. मुलांना या सगळ्याचा त्रास होतो. मुलं दुबळी असतात. त्यांना ‘आवाज’ नसतो.

Education System
Jalgaon Dairy Election : महाजन, पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल

विनातक्रार ती सोसत बसतात. आपल्यासाठी असलेल्या कायद्यांविषयी, हक्कांविषयी ती तेवढी जागरूक नसतात. मोठी माणसं त्यांना सतत नियंत्रणात ठेवतात. स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांना असलेल्या स्वातंत्र्याचा नेहमीच संकोच होतो. हेच बघा ना, सुटीचा दिवस असेल, आईला दुपारी वामकुक्षी घ्यायची असेल तर घरातल्या मुलांनी एकदम चिडीचूप बसायचं असतं. शाळेतही यापेक्षा वेगळं चित्र नसतं. ‘ऑफपिरियड’ असल्यास बदली आलेले शिक्षक काहीच शिकवत नसतील तरी विद्यार्थ्यांनी शब्दशः ध्यानस्थ ऋषीसारखं ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ बसून राहायचं असतं!

शाळेत साधारणपणे असं दिसतं की, विशिष्ट वाक्ये वापरून शिक्षक मुलांशी संवाद साधत असतात. ‘इकडं लक्ष द्या’,‘नीट ऐका, ‘लिहून घ्या,‘बडबड करू नका, शांत बसा’, ‘मी सांगतो/सांगते तेवढे करा, तुमचं डोकं चालवू नका!’, ‘घरचा अभ्यास आणला का?’, ‘काल कुठे गेला/गेली होतास/होतीस?’ अशी खास पठडीतली वाक्ये उच्चारत, प्रश्न विचारत शाळांच्या खोल्यांतून शिक्षकांचं विद्यार्थ्यांशी ‘हितगूज’ वगैरे सुरू असतं. मोकळाढाकळा संवाद असतोच कुठे तिकडं? मुलं अतिशय चलाख असतात. आपपरभावानं वागणारी माणसं मुलांना पटकन कळतात.

Education System
Crop Insurance : ‘आठ दिवसांत पीक विमा रक्कम जमा करा’

मुलांचं मन कल्पनेच्या पंखांनी गरुडभराऱ्या घेत असतं. जे जे बघितलंय, ऐकलंय, अनुभवलंय त्याविषयी विचारावं, बोलावं, लिहावं असं मुलांना मनातून वाटतं. एखादी वेदना ठसठसत असते. आनंदानं मन उचंबळून येतं. कधी भन्नाटकल्पना डोक्यात येते. आपुलकीचा शब्द-संवाद, जिव्हाळा नसेल तर मुलं हे सारं मनाच्या तळाशी दाबून ठेवतात.

शाळेत विद्यार्थी-शिक्षक आणि घरी पालक-मुलं यांच्या मनामनांत अदृश्य भिंती उभ्या असलेल्या दिसतात. मुलांच्या भावविश्वावर त्यामुळं भयंकर आघात होत राहतात. त्यातून अंतिमत: मुलांचं व्यक्तिमत्त्व खुरटतं. रचनावादी शिक्षण प्रणाली पुरस्कर्ता संशोधक जीन पियाजे यांचं संशोधन असं सांगत की, लहान मुलं जसा विचार करतात तसा विचार मोठी माणसं करत नाहीत. याकडे आपण गांभीर्यानं कधी बघणार आहोत?

मेंदू संशोधनातून पुढं आलेल्या विचारांनी जगभरातल्या शिक्षणाचे संदर्भ बदललेत. हे आधुनिक शिक्षणशास्रीय विचार सांगतात की, मेंदू हाच माणसाच्या शिक्षणात महत्त्वाचा अवयव असतो. हॉवर्ड गार्डनर या संशोधकानं मांडलेला बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धांत त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मेंदू संशोधनातून हेही पुढं आलंय की, जे मन दडपण, दहशत किंवा दबावाखाली असतं, भीतीग्रस्त असतं ते मन नवीन गोष्टी शिकायला, समजून घ्यायला उत्सूक नसतं.

भावनिक, मानसिकदृष्ट्या तयार नसतं. वर्गातली मुलं एकमेकांशी बोलतात, तेव्हा त्या बडबडण्यातूनही मुलं काहीतरी शिकतच असतात, ही समज शिक्षकांना देण्यात व्यवस्था कमी पडलीये. मुलांना मुक्तपणे व्यक्त होता यावं, असं भयमुक्त पर्यावरण घरानं, शाळेनं पुरवायला हवं. ते निर्माण करण्यात आम्ही कमी पडलोय. म्हणूनच तर त्या शेजारच्या शाळेतल्या शिक्षिका काहीही समजून न घेता मुलांवर भडकल्या.

Education System
Farmer : मोठे शेतकरी खरेच धनदांडगे आहेत का?

मुलांना ते आवडलं नाही. परंतु व्यक्त होण्याची मुभा असल्यानं राणीनं सर्वांच्या मनातल्या भावना मोकळेपणानं बोलून दाखवल्या. त्या सांगता याव्यात असं वातावरण असणं, इथं महत्त्वाचं आहे. जिथं मुलं आपली नापसंती, नाराजी, हरकती, आक्षेप, असहमती, व्यथा, वेदना, वंचना सांगू शकतील. डोक्यातल्या अफलातून कल्पना उत्फुल्लपणे सांगू शकतील.

सर्वच मुलांना असं उबदार पर्यावरण मिळायला हवं. शिकण्यासाठीची ती मुलभूत गरज आहेच, परंतु हा मुलांचा हक्कदेखील आहे! अन्यथा मुलं स्वत:ला कासवासारखं आक्रसून घेतात. हा शिकण्यातला मोठा अडथळा ठरतो. म्हणूनच मुलांशी मुलांच्या पातळीवर जाऊन, दोस्ताना करत त्यांच्या मनात प्रवेश करता यायला हवा.

ओघानं विषय निघालाच आहे, तर एक अत्यंत नमुनेदार प्रसंग सांगतो.

एका उन्हाळ्याच्या सुटीत वेगवेगळ्या गावांहून मामाच्या, मावशीच्या घरी आलेली मुलं आमच्या घराशेजारच्या पोर्चमध्ये शाळकरी वयातली मुलं खेळत होती. मराठी, इंग्रजी माध्यमाच्या निरनिराळ्या शाळांत शिकणारी ही मुलं होती. ती खेळताहेत तिथं बाजूलाच मी कार धुतोय. काम सुरु असलं तरी माझे कान मुलांमधल्या संवादाकडं आहेत. तो इंटरेस्टिंग आहे. नाटक नाटक खेळताहेत मुलं...

टणटण घंटा वाजते... परिपाठ संपतो. मुलं वर्गात येऊन बसतात. जरा वेळानं वर्गशिक्षिका वर्गात प्रवेशतात. मुलं गुड मॉर्निंग वगैरे म्हणतात. मॅडम वर्गात घुसल्या तेव्हा एक मूल उभं राहिलं नव्हतं. मॅडम त्याच्यावर भारी खवळल्यात. ‘असली नाटकं इथं खपवून घेतली जाणार नाहीत. ऐकलंस ना. नीट लक्षात ठेव.

आताच सांगून ठेवते! पुन्हा म्हणू नकोस सांगितलं नाही म्हणून. हं.’ मॅडमची दमबाजी वगैरे. आता मॅडम घरचा अभ्यास बघू लागतात. अभ्यास आणलाय त्यांना शाबासकी आणि आणला नाही, अशांना हातावर सपासप छड्या देतात. एक मुलगा छड्या घ्यायला नकार देतो.‘अभ्यास नाही आणला म्हणून आम्हाला आमचे सर कधीच मारत नाहीत,` असं त्याचं बचावादाखल म्हणणं आहे.

नाटक खेळातल्या शिक्षिका हे अमान्य करतात. ‘आमच्या शाळेतल्या मॅडम आम्हाला असंच मारतात. गुपचूप हात पुढं कर आन छडी घे’ असं दरडावतात! मुलगा गुमान छडी घेतो. मॅडम शिकवायला लागतात. थोडंसं बोलतात. फळ्यावर लिहायला वळतात. वर्गातल्या कोणाचा तरी आवाज येतो. झालं सारं बिघडतं.

मॅडमचा पारा भयंकर चढतो. त्या काहीबाही बोलू लागतात! इतक्यात घंटा वाजते. तास संपतो. जाताना त्या आठवणीनं गृहपाठ लिहून आणायची आज्ञा देतात. शाळा सुटते. मुलं जल्लोषात वर्ग/शाळेबाहेर पडतात. अनौपचारिक खेळ खेळताना अगदी उत्स्फूर्तपणे मुलांनी रचलेलं हे नाटक! मुलांचं मनमानस नेमकं काय म्हणतंय, याविषयी मोठ्यांच्या डोक्यात उजेड पडावा!

मुलांचं बेशिस्त असणं, नसणं किंवा आज्ञाधारक असणं किंवा नसणं हे आम्ही कशाच्या आधारे जोखतो? मुलांच्या ज्या कृतींनी, वागण्यानं मोठ्यांचा खास करून पालक, शिक्षक आणि नातेवाईकांचा अहंभाव सुखावतो त्या मोजपट्टीनं! कुटुंब आणि शाळा मोठी माणसं चालवतात. मोठ्यांनी घालून दिलेले नियम लहानांनी पाळायचे.

Education System
Tanpure Sugar Mill : राहुरीचा ‘तनपुरे कारखाना’ जिल्हा बँकेच्या ताब्यात

त्यांची शिस्त पाळायची, सूचनाबरहुकूम वागायचं. मोठ्यांच्या आज्ञा पाळणारी मुलं शहाणी, न पाळणारी वेडी! ‘गुड गर्ल’, ‘गुड बॉय’ कोणाला म्हणतो? आठवा बरं! सतत प्रश्न विचारणारी मुलं वात्रट, आचरट ठरवून मोकळे होतो आपण अनेकदा. घरच्यांच्या, शिक्षकांच्या तालावर नाचणारं मूल आज्ञाधारक. अशी मुलं घरात आणि शाळेतही सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतात! थोडक्यात काय तर लहानांनी मोठ्यांच्या तालावर नाचावं म्हणजे ते मुलांना शिस्तबद्ध, नम्र, आज्ञाधारक असल्याचं प्रमाणपत्र देतील!

जरा वेगळा, चिकित्सक विचार करणारी, बडबडी मुलं आम्ही दाबून, दडपून टाकतो. त्यांचं नीतिधैर्य खच्ची करतो. ते मग मनातल्या अभिनव कल्पनांचे भ्रूण आपणहून खुडून टाकतात. कल्पनेचे पंख कमजोर होत जातात. आज्ञापालन करता करता स्वतंत्र विचार हळूहळू मरत जातो. मोठी झाल्यावर त्यांनी उंच भराऱ्या घ्याव्यात असं पालक, शिक्षकांना वाटतं. खरं सांगायचं तर आम्हीच त्यांचे पंख ‘छाटलेले’ असतात अदृश्यपणे! आमच्या अज्ञानाच्या कात्रीनं!

मुलं अज्ञानी आहेत. आम्हीच जणू त्यांचे उद्धारकर्ते आहोत, असं आपल्या देशात पालक मानतात. बहुसंख्य पालक मुलांचे ‘कस्टोडीयन’ (Parent Custody) बनलेले दिसतात. जे पालक मुलांना झाडं वाढवावीत, अशा 'संवर्धन पद्धतीनं' वाढवताहेत, त्यातून मुलांचे बोन्साय होताहेत. वाढच खुरटून गेलेलीय.

शाळा आणि शिक्षकांचीही भूमिका यापेक्षा विशेष वेगळी नसते. मुलांचं सहज बोलणं पालक-शिक्षकांना नवी समज, नवे शहाणपण देणारं असतं. परंतु मुलांना काय कळतं, हा मोठ्यांच्या ठायी असलेला मोठा गैरसमज त्यांना अनेक गोष्टी समजून घेण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे.

Education System
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

शिक्षक म्हणून कार्यरत असताना मुलांचं बोलणं ‘फीडबॅकसाठी’ मला महत्त्वाचं वाटत आलंय. मुलांबरोबरच्या संवादाने शिक्षक म्हणून मला प्रचंड समृद्ध केलंय. मुलांना केवळ कान नसतात, तर तोंडदेखील असते. त्यांना अनेक गोष्टी सांगायच्या असतात, या मनोभूमिकेतून आम्ही बघतो. हे लक्षात घेऊन शाळेत गप्पांचा तास सुरु केलाय.

मुलं प्रश्न, शंका विचारतात. शक्कल लढवतात. समस्या जाणून घेताना उत्तरं शोधायचा प्रयत्न करतात. मुख्य म्हणजे चुका करायचं स्वातंत्र्य मुलांना हवं असतं. ते आम्ही देतो. ‘चुकणार ते मूल शिकणार’ यावरआमचा दृढ विश्वास आहे. ‘कोणत्याही मुलानं सांगितलेलं कोणतंही उत्तर पूर्णपणे चूक मानायचं नाही,’ असा ‘नियम’ आम्ही केलाय! मुलं मुक्तपणे व्यक्त होताहेत. कल्पनेच्या पंखांना बळ मिळतंय. काटेकोर वेळापत्रक, कठोर शिस्तीचं वातावरण मुलांवर लादत नाही. मुलांच्या आशाआकांक्षांचं प्रतिबिंब शालेय कामकाजात उमटलेलं असेल, याची काळजी घेतो.

To teach म्हणजे शिकवणं आणि to learn म्हणजे शिकणं. शिक्षकांनी मुलांना शिकवण्याच्या भूमिकेमधून शिकणं ही आनंददायी प्रक्रिया बनते. त्या दिशेनं जायला हवं. शिकणं नको, शेअरिंग व्हावं! शिक्षणात ‘देणारा’ आणि ‘घेणारा’ व्यवहारी भाव नको. यासाठी शिक्षकांचं मनमानस बदलायला हवंय. आवश्यक त्या व्यवस्थात्मक सुधारणा त्यासाठी केल्या पाहिजेत

Education System
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

मुलांच्या मनातले स्वतंत्र विचारांचे रसरशीत कोंब खुडून न टाकता ते जोपासायला, वाढवायला मदत केली पाहिजे. संशोधक, चिकित्सक वृत्ती यातून वाढीला लागेल. त्यातून शिक्षणाच्या कक्षा आपसूकच रुंदावत, विस्तारत जातील. मुलं अनेक अंगांनी विचार करू लागतील. संशोधनासाठी समाजात अशी संस्कृती रुजणं फार आवश्यक आहे असं वाटतं. असं झाल्यास आपल्या मुलांच्या दृष्टीनं स्वातंत्र्याचा नवा अध्याय सुरु झालेला असेल. त्या दिवसाची प्रतीक्षा आहे

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी ऐंशीच्या दशकात लिहून ठेवलंय. “मुलं-पालक आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्यात कठोर भिंती उभ्या आहेत. ज्या भिंतीमुळे आपण एकमेकांना दिसू शकत नाहीत. ओळखू शकत नाहीत. समजू शकत नाहीत.

त्या भिंतींना अशा संवादामुळे खिंडारं पडली नाहीत, तरी खिडक्या निश्चित निर्माण होतील, म्हणून संवाद हवा आहे मुलांच्या शिकण्यासाठी!” असं सुसंवादी पर्यावरण आपण मुलांना पुरवू शकलो तर काय बहार येईल नाही? पालक-शिक्षकांविषयी मुलांच्या मनातला आदरभाव आपसूकच दुणावेल! मग राणीच्या मनातला प्रश्न आपोआप निकाली निघेल...

(लेखक नगर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com