
Mumbai News: नाफेडने हमीभावाने केलेल्या सोयाबीन खरेदीतील सावळ्या गोंधळावरून विधानसभेत विरोधकांनी पणन विभागावर जोरदार हल्लाबोल केला. खरेदी योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापारी आणि दलालांसाठी आहे, हेच कळत नाही, अशा शब्दांत विरोधकांनी नाफेडच्या खरेदी यंत्रणेचा समाचार घेतला.
नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांना अद्याप पैसे दिले नाहीत, ते किती दिवसांत देणार याची माहिती सभागृहाला द्या, अशी मागणी करत विरोधकांनी पणनमंत्री रावल यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रावल यांनी डीबीटीद्वारे पैसे दिले आहेत, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त झालेल्या विरोधकांनी गोंधळ घातला. बोलण्याची संधीच न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
उरळ (ता.बाळापूर, जि. अकोला) येथे सोयाबीन खरेदीत अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनीने शासनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची ६३ लाख ४४ हजार ९२४ रुपयांची फसवणूक केल्याचा मुद्दा दौलत दरोडा, चेतन तुपे, रणधीर सावरकर, नाना पटोले यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला.
यानुषंगाने राज्यातील खरेदी व्यवस्थेचे वाभाडे विरोधी सदस्यांसह सत्ताधारी सदस्यांनी काढले. सावरकर यांनी या कंपनीचा मालक मंत्रालयात दलाल म्हणून काम करतो. शिक्षण विभागात संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी तो वावरतो असा आरोप केला. या चर्चेत हेमंत ओगले, कैलास पाटील, रोहित पवार, नाना पटोले, भास्कर जाधव, अन्य सदस्यांनी भाग घेतला. ओगले यांनी ऑनलाइन पैसे मिळत नाहीत. त्यामुळे देयके थांबली आहेत. सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
‘अधिकृत खरेदीदारांनाच बांधावर खरेदीस अनुमती’बांधावरच्या खरेदीत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे त्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा शिवसेनेचे (उबाठा) आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. नाफेडने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली नाही. त्यामुळे कमी किमतीत विक्री करावी लागली. त्यामुळे बांधावर सोयाबीन विक्रीत फसवणूक झाली आहे. यावर सरकार काय करणार असा प्रश्न केला.
यावर पणनमंत्री रावल यांनी राज्यात पुरेशी खरेदी केंद्रे होती. तरीही काही ठिकाणी बांधावरील विक्री झाली आहे. नगदी पिकांमध्ये फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे यापुढे कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील अधिकृत खरेदीदारांनाच बांधावर खरेदी करण्यास अनुमती दिली जाईल, असेही ते म्हणाले.
भावांतराचे माहीत नाही : पणनमंत्री रावल
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोयाबीनच्या भावांतर योजनेबाबत विचारणा केली असता रावल यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. मात्र उपप्रश्न विचारत काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी भावांतराचा मुद्दा रेटला. यावर भावांतराबाबत माहीत नाही, असे सांगून मुद्दा निकाली काढला.
दरम्यान, रणधीर सावरकर यांनी अंदुरा कंपनीने प्रत्यक्षात १९ हजार ७२३ क्विंटल सोयाबीन खरेदी केले असून त्यापोटी गोदामाच्या १८ हजार ४२६ क्विंटलच्या पावत्या पणन कार्यालयात जमा केल्या आहेत. त्यामुळे १२०० क्विंटलचा फरक आल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.
दलालच तिजोरी लुटताहेत : पटोले
मंत्रालयात दलाल बसले आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने तिजोरी लुटली जात आहे. दलालांची घरे भरली जात आहेत, असा गंभीर आरोप आमदार नाना पटोले यांनी केला. हा आर्थिक विषय असल्याने पणनमंत्र्यांनी याचे उत्तर देऊ नये, अर्थमंत्र्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. काय व्यवस्था करणार हे आधी सांगा,’’ असा आग्रह श्री. पटोले यांनी धरला.
कृषी अन्वेषण शाखा, न्यायालय सुरू करा :मुनगंटीवार
नाना पटोले यांनी आर्थिक नुकसानीचा मुद्दा उपस्थित केल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घरचा आहेर देत सरकारी यंत्रणेचे वाभाडे काढले. धान खरेदीच्या खोट्या पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. जेव्हा उद्योजक किंवा अन्य लोकांची आर्थिक फसवणूक होते त्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा सुरू केली. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक न्यायालये सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. मग याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा तपास करण्यासाठी कृषी अन्वेषण शाखा सुरू करावी तसेच शेतकऱ्यांसंबंधी गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी कृषी न्यायालये स्थापन करावीत, अशी मागणी त्यांनी केली. यावर रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
विरोधकांचा सभात्याग
हमीभावाने खरेदी झालेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांना किती दिवसांत देणार याची माहिती सभागृहास द्यावी असा आग्रह विरोधकांनी केला. मात्र रावल यांनी ही सर्व प्रणाली ऑनलाइन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात, हाच मुद्दा लावून धरल्याने विरोधक आक्रमक झाले. तसेच उरळ (अकोला) येथील फसवणूक केलेला खरेदी केंद्राचा मालक सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार होती. मात्र, त्याने जामीन घेतला असे रावल यांनी सांगताच राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी, ‘त्याने जामीन कसा घेतला. याचा अर्थ सरकार आणि त्याच्यात साटेलोटे आहे,’ असा आरोप केला. विरोधक अधिक आक्रमक होत गोंधळास सुरुवात केली. मात्र अध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी सभात्याग केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.