Abddul Sattar : अब्दुल सत्तार नेमके आहेत तरी कोण? सत्तारांचा राजकीय प्रवास कसा राहिला?

टीईटी घोटाळा असो वा महिला खासदाराबद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो वा मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो सत्तार कायम वादाच्या केंद्रस्थानी असतात.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

कायम वादाच्या भोवऱ्यात गिरक्या घेणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abddul Sattar) पुन्हा एकदा वादग्रस्त प्रकरणांत अडकले  आहेत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड महोत्सवाला (Sillod Festival) आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली राज्यभरातून १५ कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे प्रकरण सभागृहात उपस्थित करून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

पण ही काही अब्दुल सत्तारांची अडचणीत येण्याची पहिली वेळ नाही. टीईटी घोटाळा असो वा महिला खासदाराबद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो वा मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो सत्तार कायम वादाच्या केंद्रस्थानी असतात. इतकंच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केल्याचे आरोप सत्तारांवर झाले. आणि जिल्हाधिकाऱ्यांना 'दारू पिता का ?' अशी विचारणाही सत्तारांनी गंमतीत म्हणा की निलाजरेपणे म्हणा  करून झाली आहे. त्यामुळे कृषीमंत्री सत्तार जणू वादाचं बिऱ्हाड घेऊनच वावरत असतात. याच सगळ्या पार्श्वभूमीवर सत्तारांची राजकीय कारकीर्द कशी राहिली तेच पाहूया. 

Abdul Sattar
Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत; गायरान जमीन खासगी वापरासाठी दिल्याचे प्रकरण शेकणार
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव-सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा विधानसभा मतदार संघ आहे. याच मतदार संघातून त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 

  • सत्तार यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली १९८४ च्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून. त्यानंतर १९९० साली सिल्लोड ग्रामपंचायतीचे स्वरूप बदलून नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला. त्यावेळी सत्तारांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली. आणि त्यातून सत्तारांनी मतदारसंघात जनाधार मिळवला. 

  • पुढे सत्तारांनी १९९४ साली अपक्ष आणि १९९९ साली कॉँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला.  त्यानंतर २००१ मध्ये सत्तारांची कॉँग्रेसकडून विधानपरिषदेवर वर्णी लागली. पुढे २००४ साली सिल्लोड मतदार संघातून कॉँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा फारच कमी मताने पराभव झाला. 

  • २००९ साली ते विधानसभा निवडणूक चांगल्या मताधिक्याने जिंकले. ही निवडणूक त्यांनी कॉँग्रेस पक्षाकडून लढवली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी ते कॉँग्रेसच्या मंत्रीमंडळातही अल्पकाळ मंत्री म्हणून राहिले. याकाळात त्यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा वरदहस्त राहिला. तर दुसरीकडे स्थानिक राजकारणात मतदार संघातील मोठे प्रस्थ असलेल्या प्रभाकर पालोदकरांच्या मदतीने मराठा-राजपूत-मुस्लिम मतदारांची सत्तारांनी मोट बांधली. 

  • स्थानिक निवडणुकीतही त्यांनी पकड मिळवली होती. त्यासाठी अनेकदा छुप्या तडजोडीही विरोधकांशी केल्याचे राजकीय जाणकार सांगतात. सत्तारांनी कॉँग्रेसमध्ये असूनही भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी वारंवार जुळवून घेतले. त्यामुळे २०१४ च्या मोदी लाटेतही सत्तारांनी आपला किल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळावलं. 

  • पुढे २०१९ सत्तारांना कॉँग्रेसने लोकसभेचे तिकीट नाकरले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. २०१९ ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली आणि विजयही मिळवला. पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात महसूल, ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची माळ पडली. 

Abdul Sattar
Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा
  • तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांमध्ये अब्दुल सत्तारांचा सक्रिय सहभाग राहिला. त्याचे त्यांना बक्षीस मिळाले. भाजप-शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कृषिमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून अब्दुल सत्तार यांनी आपली ओळख पक्की करत प्रभाव वाढवायला सुरूवात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com