Agriculture Water Management : पाण्याचा ताळेबंद केलेला असल्यास त्यातून गाव आणि शिवाराच्या पाणी नियोजन व व्यवस्थापनाला एक दिशा मिळते. ताळेबंदामध्ये दिसत असलेली पाण्याची शिल्लक किंवा तूट यानुसार भविष्यातील उर्वरित महिन्यांचे नियोजन करायचे असते. आपल्याकडील पावसाची स्थिती आणि जमिनीखालील भूजलाच्या परिस्थितीचा विचार केल्यास बहुतांशी गावांमध्ये पाण्याची तूटच असण्याची शक्यता अधिक आहे.
तूट असलेल्या गावांमध्ये पिकांची व सिंचन पद्धतीची निवड अत्यंत विचारपूर्वक केली पाहिजे. म्हणजेच पीक पद्धतीमध्ये कमी पाणी लागणारी पिके निवडावीत. सिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरून पाणी वापरामध्ये वाया जाणारे पाणी वाचवणे, हेच महत्त्वाचे उपाय आहेत. आता शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झालेली असल्यामुळे बहुतांश शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाकडे वळलेले दिसतात.
जे अद्याप वळलेले नाहीत, ते सिंचन पद्धती बदलण्याची कार्यवाही तुलनेने सहजपणे करू शकतात. मात्र पीक पद्धती बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध किंवा हतबलता व्यक्त केली जाते. कारण पिकाची निवड ही पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा ही बाजारपेठेतील मागणी आणि चांगले उत्पन्न मिळण्याच्या निकषावर ठरते. बऱ्याच वेळा यापूर्वी न घेतलेल्या पिकाविषयी साशंकता असते, वा आपल्याला ते करणे जमेल का, याबद्दलचा आत्मविश्वास (विनाकारणच) नसतो.
यंदाचे अवर्षण आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरच नाही तर एकूणच आटत चाललेले भूजल, हवामान बदलामुळे वाढत चाललेली पावसाची अनियमितता अशा बाबींमुळे पाण्याचा वापर विचारपूर्वक करावा लागणार आहे. आपल्याकडे असलेल्या पाणी उपलब्धतेनुसारच पिकाची निवड करावी लागणार आहे. कमी पाण्यात येणाऱ्या व चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकाची निवड करण्याचा निकष लावला जाईल.
पण हे तितकेसे व्यवहारी नसेल. कारण केवळ उत्पन्नाचा आकडा पाहण्यापेक्षा ‘कमीत कमी उत्पादन खर्च आणि उत्तम नफा’ हाच निकष अधिक उपयुक्त ठरेल. त्यातही ‘निव्वळ नफा’ या बाबीकडे लक्ष ठेवावे लागेल. त्याच प्रमाणे त्या पिकासाठी किती महिने शेत अडकून राहते, याचाही विचार करावा लागेल. त्याच कालावधीत दोन किंवा तीन अन्य पिके घेतली असती तर किती उत्पन्न मिळाले असते, असा विचार करणे फायद्याचे ठरेल.
यासाठीच पिकाच्या जमा-खर्चाचा एक अंदाजे तक्ता दिला आहे. त्यात पिकांच्या उत्पादन खर्चाचे सर्व तपशील घेतानाच पिकाचे सरासरी उत्पादन, त्याचा आजचा असलेला बाजार भाव यावर आधारित गणित मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून निव्वळ नफा आणि दर महिन्याला मिळणारे सरासरी उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला आहे.
विविध पिकांचा जमाखर्च
तपशील सोयाबीन कापूस ऊस हरभरा गहू मका कांदा गवत बाजरी ज्वारी तूर
पीक कालावधी (महिने) ४ ५ १५ ४ ४ ४ ४ ४ ३ ३ ६
रोटावेटर (रुपये) १,६०० १,६०० १,६०० १,६०० १,६०० १,६०० १,६०० ० १,६०० १,६०० १,६००
नांगरणी (रुपये) २,००० २,००० २,००० २,००० २,००० २,००० २,००० ० २,००० २,००० २,०००
सरी पाडणे (रुपये) ५०० १,५०० १,५०० १,५०० ० १,२००
वाफे करणे (रुपये) ०
पेरणी (रुपये) १,२०० ६०० ५,००० १,२०० १,२०० १,२०० १२,००० ० १,२०० १,२०० १,६००
कोळपणी (रुपये) १,००० १,२०० १,२०० १,२०० ० १,००० १,००० १,०००
निंदणी/खुरपणी १ (रुपये) २,५०० १,५०० ३,००० २,५०० ३,००० ० २,००० २,००० २,०००
निंदणी/खुरपणी २ (रुपये) २,५०० २,५०० ०
माती लावणे (रुपये) ३,००० ४,००० १,५०० ०
फवारणी (रुपये) २,००० ६,००० २,००० १,००० २,००० ८,००० ० १,५०० ३,०००
कापणी (रुपये) ५,००० १०,००० ५,००० १२,००० ४,००० ४,५०० ४,५०० २,०००
मळणी (रुपये) २,००० १,५०० ३,००० ६,००० ० २,५०० २५०० ४,०००
बियाणे (रुपये) ३,५०० २,००० ६,००० १,५०० २,००० २,५०० ३,५०० ० ६०० ६०० ५००
खते (रुपये) १,५०० ५,००० १५,००० २,००० ३,००० ५,००० १०,००० ० ३,००० ३,००० ३,०००
घरापर्यंत वाहतूक (रुपये) ५०० २,००० ५०० १,००० २,००० ५,००० ० ५०० ५०० ५००
एकूण खर्च (रुपये) २२,८०० ३५,४०० ४०,६०० १८,५०० १८,५०० २५३०० ६१,१०० ० १८,९०० २०,४०० २२,४००
एकरी सरासरी उत्पादन
(किलो) १,२०० १,२०० ५०,००० ६०० १५०० ३००० १०,००० १५००
पेंढी १,५०० १,५०० १,०००
सरासरी दर प्रति
किलो (रुपये) ४८ ८० ३ ४० २५ २० १० १८ ३५ ६० १००
मिळणारी रक्कम (रुपये) ५७,६०० ९६,००० १,५०,००० २४,००० ३७,५०० ६०,००० १,००,००० २७,००० ५१,५०० ९,००,००० १,००,०००
नफा (रुपये) ३४,८०० ६०,६०० १,०९,४०० ५,५०० १,९०,००० ३४,७०० ३८,९०० २३,००० ३१,६०० ६९,६०० ७७,६००
महिन्याचे उत्पन्न (रुपये) ८,७०० १२,१२० ७,२९३ १,३७५ ४,७५० ८,६७५ ९,७२५ ५,७५० १०,५३३ २३,२०० १२,९००
टीप :
हा उत्पन्नाचा व नफ्याचा तक्ता तयार करताना या सर्व आकडेवारीचा संदर्भ नगर जिल्ह्यातील एका गावातील माहितीवर आधारित आहे. तेथील सरासरी उत्पादन आणि गेल्या काही आठवड्यांचे सरासरी बाजारभाव धरलेले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात खर्चाचे आकडेही वेगळे येऊ शकतात. त्यामुळे हा तक्ता संदर्भ किंवा मार्गदर्शक म्हणून घेऊन स्वतःच्या पिकाचा तक्ता तयार करावा.
या तक्त्यात पीक म्हणून गवत असा उल्लेख आहे. विशेषतः तो नदीकाठी, गाळपेर जमिनीत व डोंगर उतारावरील जागांमध्ये येणाऱ्या गवताचा आहे. अशा ठिकाणी येणारे गवत काढून टाकून अन्य पिके घेण्याचा लोकांचा आटापिटा असतो. त्यावर बराच अधिक खर्च करावा लागतो. त्याऐवजी गवत हेच उत्पन्नाचे साधन होऊ शकते. अर्थात, त्यातून अन्य पिकांपेक्षा उत्पन्न कमी मिळताना दिसत असले तरी निव्वळ नफा बऱ्यापैकी मिळतो. त्यातही हे गवत आपल्याच जनावरांसाठी वापरल्यास उत्पन्न व नफ्यात आणखी बरीच भर पडते.
आणखी बाब सर्वांनी लक्षात घ्यावी. ती म्हणजे ऊस पिकातून अधिक उत्पन्न आणि नफा दिसत असला तरी पिकाचा कालावधी १५ महिन्यांचा आहे. या पंधरा महिन्यांच्या काळात उसाच्या तुलनेत कमी पाणी लागणारी, अधिक उत्पन्न व नफा देणारी तीन पिके आपण घेऊ शकतो. या तक्त्यामध्ये भाजीपाला व फळपिके घेतलेली नाही. त्यांच्या दरातील चढ-उतार आणि दीर्घकाळ अडकणारी जमीन यामुळे प्रत्येक विभागातील गणिते वेगळी राहू शकतात. ती याच तक्त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर शेतकरी तयार करू शकतील असा विश्वास वाटतो.
या जमाखर्चात जमीन व पाणी यांच्या खर्चाचा विचार केलेला नाही. तो भांडवली खर्च आहे. तसेच पाणी व सिंचनाबाबतच्या खर्चात जिरायती शेती, विहिरीचे पाणी, पाटपाणी, ठिबक सिंचन या बाबी येत असल्याने खर्चाचा निश्चित आकडा घेता येत नाही. प्रत्येकाने आपल्यासाठी जी बाब लागू आहे, त्याप्रमाणे खर्च धरणे अपेक्षित आहे.
सतीश खाडे, ९८२३०३०२१८ (लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.