
Agricultural Business : शेतकऱ्यांसाठी वेगळे कायदे आणि साखर उद्योगासाठी वेगळे कायदे केल्यामुळे साखर उद्योगात बांडगुळांची वाढ झाली. कारखानदार हे खऱ्याखुऱ्या उद्योजकांचे विश्वस्त मंडळ असले पाहिजे. कारण त्यांचा पैसा या कारखान्यांत गुंतलेला नसतो. फक्त त्यांचे श्रम, बुद्धी कारखान्यांत गुंतलेली असते.
साखर कारखान्यांत जशी गुंतवणूक करावी लागते तशी ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये किमतीची गुंतवणूक करावी लागते. एक साखर कारखाना चालविण्यासाठी साधारणपणे १५ ते २० हजार एकरांवर ऊस लावावा लागतो. ऊस पिकणाऱ्या जमिनीची आजची किंमत सरासरी १० ते २० लाख रुपये प्रतिएकर आहे.
हिशेबासाठी आपण १५००० एकर × १५ लाख = २२५० कोटी दरवर्षी कायम स्वरूपी गुंतवणूक ऊस उत्पादकाला करावी लागते. एक एकर ऊस जोपासायला खर्च येतो जवळपास १ लाख रुपये प्रतिएकर. त्याचा हिशेब होतो १ लाख × १५ हजार एकर = १५० कोटी रुपये.
याचा सरळ हिशेब असा, की एक कारखाना चालविण्यासाठी १५ हजार एकरांत शेतकरी २२५० कोटी जमिनीच्या स्वरूपात गुंतवतात. शिवाय ऊस उत्पादन करण्यासाठी १५० कोटी रुपये गुंतवतात. एकूण २४०० कोटी रुपये शेतकरी केवळ ऊस उत्पादन करण्यासाठी आपल्या स्व-जोखमीवर खर्च करतात.
तिकडे कारखाने शेअर्स पोटी रक्कम जमा करतात. शेकडो कोटींची ठेव म्हणून जमा करतात. ही केवळ खुल्या बाजारात शेअर्स विक्री करून नोकरदार व्यापारी किंवा इतर व्यावसायिकांकडून घेतलेले नाहीत, तर ते शेअर्सही ऊस उत्पादकांकडूनच घेतलेले असतात. साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा असूनही हे भान कारखानदार शेतकऱ्याला येऊ देत नाहीत.
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा आणि मजबुरीचा गैर फायदा विश्वस्त मंडळाने आजपर्यंत घेतला आहे. आम्हीच खरे मालक म्हणून ‘मूळ शेअर होल्डर्स मालकाला डच्चू देण्याचे काम कारखानदारांनी केले आहे. खरे तर विश्वस्तांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करायला हवे होते. ते ही मंडळी करेनासे झाली आहेत म्हणून हे ऐतिहासिक भान शेतकरी उद्योजकाला १९ नोव्हेंबर २०२३ (बनसारोळा, ता. अंबाजोगाई) येथील ऊस परिषदेत देण्यात आले.
८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले, की तुमची गरिबी दैवामुळे नाही, धर्मामुळे नाही किंवा नैसर्गिक कोप होतो म्हणून नाही, तर सरकारचे धोरण शेती व्यवसायाच्या विरोधात आहे म्हणून आहे. चार दशकांनंतर ही परिषद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हीच खरे या कारखानदारीचे मालक आहात,
तुम्हीच खरे उद्योजकही आहात हे भान देत आहे. आणि येथेच शेतकरी आंदोलनाच्या विचाराला नवी वाट मिळण्याची सुरुवात होईल असे मला वाटते. ऊस उत्पादक वेगळा आणि ऊस कारखानदार वेगळा ही फाळणी केली आणि येथेच खऱ्या उद्योजकतेचा घात झाला. शेतकऱ्यांसाठी वेगळे कायदे आणि उद्योजकासाठी वेगळे कायदे करून खोट्या उद्योजकांशी हातमिळवणी करून शेती व्यवसाय
लुटण्याचे काम चालू आहे. शेतकऱ्याला किंवा ऊस शेतकऱ्यांना केवळ कष्ट करून ऊस उत्पादन करणारे साधन समजण्यात आले. तर कारखाना चालवणाऱ्या विश्वस्त मंडळालाच खरे उद्योजक समजण्यात आले. याचा दुष्परिणाम असा झाला की ऊस व्यावसायिक सतत नाडला गेला. ऊस उत्पादक आणि कारखाना यात परस्पर पूरकतेऐवजी मुजोरी, लबाडी, लाचारी इत्यादी दुरितांच्या गुणधर्मांचा जन्म झाला.
विपरीत आणि विकृत उद्योजकतेचा जन्म झाला. परस्परपूरकता निर्माण होण्याऐवजी बांडगूळ विरुद्ध सृजक असा संघर्ष निर्माण होऊन खरी उद्योजकता आणि खरा उद्योजक मारला गेला. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की शेतकरी हे केवळ राबणारे नसून तेच खरे उद्योजक आहेत.
म्हणूनच शेतकऱ्यांना तुम्हीच उद्योजक आहात हे औद्योगिक भान देणे अगत्याचे झाले आहे. त्या दिशेने अर्थकारणाची, तंत्रज्ञाची आणि राजकारणाची दिशा बदलणे आवश्यक झाले आहे. जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊन जवळपास ८६ टक्के शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत.
त्यांना औद्योगिकीकरणात सामील करून घेणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. शेतीचे इतके लहान तुकडे झाले आहेत, की त्याला कितीही भाव मिळाले, तर शेतकरी सन्मानाने जगू शकत नाही. यापुढे शेती कोणी करेल की नाही, अशी समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी हा या देशाच्या अर्थकारणात प्रामुख्याने दोन भूमिका घेत असतो.
तो एका बाजूला उत्पादन करत असतो तर दुसऱ्या बाजूला ग्राहक असतो. तो या व्यवस्थेत उत्पादक म्हणून यशस्वी झाला आहे. धान्याचे प्रचंड ढीग घालून त्याने ते सिद्ध केले आहे, परंतु तिथेही बाजारपेठेत त्याला पराभूत करण्यात येते आहे. ग्राहक म्हणून इतर ग्राहकांसारखा तोही सपशेल पराभूत होत असतो. सरकार प्रायोजित भांडवलशाही राज्यव्यवस्थेने त्याला दोन्ही बाजूंनी पराभूत केले आहे.
मग ती भांडवलशाही राज्यव्यवस्था लोकशाहीवादी असो, समाजसत्तावादी वा फुकटकल्याणकारी असो की हुकुमशाहीवादी असो, या तिन्ही प्रकारच्या राज्यव्यवस्थेने शेतकऱ्यांची आणि श्रमिकांची उत्पादक म्हणून असलेली उद्योजकता व ग्राहक म्हणून असलेली क्षमताही हिरावून घेतली आहे. तेव्हा ती उद्योजकता शेतकऱ्यांना आणि श्रमिकांना परत मिळवून किंवा प्राप्त करून द्यावयाची असेल, तर शेती उत्पादनावर जी प्रक्रिया केली जाते,
व ज्यामुळे व्हॅल्यू अॅडिशन होऊन त्या प्रक्रिया उद्योगाला नफा मिळतो त्या नफ्याचा वाटेकरी शेतकरी झाला पाहिजे. खऱ्याखुऱ्या उद्योजकतेचा उदय व्हावा असे वाटत असेल, तर उद्योगाच्या नफा व तोट्यात शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे तरच शेतकरी उद्योजक म्हणून पुढे येईल.
मात्र त्यासाठी त्याला प्रस्थापित कारखानदारीत व नव्याने उभ्या राहणाऱ्या शेतीपूरक उद्योगात किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांत त्याच्या जमीन या भांडवलासह सहभागी करून घेणे आवश्यक आहे. ज्याचे जेवढे योगदान तेवढे त्याला योगदानमूल्य मिळवून देणारा नव्या उद्योगाचा पाया घातला, तर त्या उद्योजकतेच्या नव्या युगाचा शेतकरी हा खरा खुरा उद्योजक असेल, नव्या युगाचा नायक असेल.
(लेखक कृषिमूल्य आयोग, महाराष्ट्राचे माजी सदस्य आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.