
Nashik News : जिल्हा बँकेतील तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामामुळे बँकेची ही दयनीय अवस्था झाली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्जवसुलीची रक्कम गेली कुठे, असा परखड सवाल उपस्थित करीत ठेवीदारांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी ठेवीदारांची भूमिका मांडली. ते म्हणाले, की २०१७ च्या कर्जमाफीतून बँकेला ७६० कोटी रुपये, तर २०१९ मध्ये ९२५ कोटी रुपये आणि कर्जवसुलीचे सुमारे ४०० कोटी रुपये असे एकूण दोन हजार कोटी रुपयांचे वाटप कसे झाले, याविषयी विचारणा केली. बँकेने यापूर्वीही ‘ओटीएस’ योजना आणली होती.
पण तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता नवीन योजनेला मिळेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या योजनांपेक्षा राज्य शासनाने थेट जिल्हा बँकेला मदत करावी. त्याशिवाय ही बँक चालणार नाही, असा प्रस्तावही त्यांनी मांडला. तसेच इंडियन सिक्युरिटी प्रेस सोसायटीचे उपाध्यक्ष जगदीश गोडसे यांनीही ठेवीदारांच्या हिताचा विचार करण्याचा आग्रह धरला.
‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या विविध शाखांमधील सहा कोटी रुपये जिल्हा बँकेच्या चालू आणि बचत खात्यात अडकले आहेत. त्या ठेवींमध्ये वर्ग करण्याची मागणी केली. त्याला विद्याधर अनास्कर यांनी त्वरित मान्यता दिली. माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी जिल्हा बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीमुळे बँक अडचणीत आल्याचा आरोप केला.
नोटाबंदीच्या काळात कमिशन घेऊन नोटा बदलून देण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार, मोठ्या थकबाकीदारांची वसुली केव्हा होणार, संचालक मंडळ आणि जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना चाप कधी बसणार, असा सवाल केला. सभेतील चर्चेत संपत कदम, धर्मा शेवाळे, संजय तुंगार, खंडू बोडके, प्रकाश शिंदे, राजू देसले, तानाजी गायधनी, विलास बोरसे, भालचंद्र पाटील आदींनी भाग घेतला.
ओसाड गावाच्या पाटिलकीवरून बाचाबाची
बँकेच्या सभेत शेतकऱ्यांनी मंत्री ॲड. कोकाटेंना त्यांच्या ‘ओसाड गावाची पाटिलकी’ या जुन्या विधानाची आठवण करून दिली. आज तुमच्या विधानाप्रमाणेच बँकेचीही अवस्था झाल्याचा टोला शेतकऱ्यांनी लगावला. मात्र, मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रत्युत्तर देताना म्हटले, की सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अडचणी दूर करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढेही प्रयत्न सुरू राहतील, असे सांगितले.
शेती कर्ज - १५४९ कोटी (८४.५५ टक्के)
बिगर शेती कर्ज - २५१ कोटी (१५.४५ टक्के)
एकूण - १८०० कोटी रुपये (८०.९८ टक्के)
बँकेची सद्यःस्थिती (आकडे कोटी रु.)
तपशील ३१ मार्च २०२४ ३१ मार्च २०२५
भागभांडवल २०७ २०९
ठेवी २०७७ २११२
कर्ज १८१२ १८००
संचित तोटा ८५२ ८५०
नेटवर्थ वजा ६३१ वजा ५९०
सीआरएआर वजा ६३.८२ टक्के वजा ६१.३४ टक्के
एनपीए ६९.७० टक्के ६८.६४ टक्के
व्याज येणे ५२२ ५३६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.