Rural Economy : हातावर पोट असलेल्या मजुरांची सुटका होईल का?

तेवढ्यात स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे, मध्यम वर्गीयांचे, सुशिक्षितांचे प्रमाण किती असू शकते याच अंदाज येत होता. वाटत होते की स्थानिक राजकीय नेतृत्वाने नेमके काय केले आहे?
Rural Economy : हातावर पोट असलेल्या मजुरांची सुटका होईल का?
Agrowon

गेल्या आठवड्यात (24 सप्टेंबर 2023 रोजी,) पाथर्डीतील आव्हाड कॉलेजमधील प्रमुख वक्ता असलेला कार्यक्रम संपल्यानंतर पुण्याला निघण्यासाठी उशीर झाला होता. कार्यक्रमाच्या आयोजकांनी एकाच्या मोटार सायकली बसवून मला बस स्टँडवर सोडण्यास सांगितले. साडेपाच वाजले होते. जुन्या बसस्टॅण्डवर आलो तर प्रचंड गर्दी होतीच. बसस्टॅण्डमध्ये येणारी प्रत्येक बस प्रचंड भरून येत होती. बराच वेळ बस स्थानकात उभा राहिलो होतो.

मला मनात वाटू लागले, की ऐवढी बस का बरं भरून येत असेल?. थोडंस विचार करत असताना लक्षात आले, पाथर्डी हा तालुक्याचा मोजकाच भाग वगळता पूर्ण तालुका दुष्काळी आणि कोरडवाहू आहे. या तालुक्यातून शहराकडे मोठे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे गाड्या भरून येतात. अर्थात शहरी मजूर, ऊसतोड मजूर पिढ्याना जन्म देऊन स्थलांतरीत करायला लावणाऱ्या अनेक तालुक्यापैकी पाथर्डी हा एक तालुका आहे. केवळ नावाला पश्चिम महाराष्ट्रात आहे. ग्रामीण भाग मागास आहेच. शिवाय शहराचे मागासलेपण ठासून भरलेले पाहण्यास मिळत होते. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय मागासलेपण काय असते हे समजून येत नाही हे मात्र खरे आहे असे वाटत होते.

बस स्थानकावर उभा राहिल्या-राहिल्या मनात वाटू लागले की एकही पाथर्डीहून अहमदनगरला बस नसेल का? पाथर्डीमधू सुटणारी बस देखील एकदम फुल्ल का भरत होती. शेवटी मी जुन्या बस स्टॅण्ड वरून नवीन बसस्टॅण्डला जाण्याचा निर्णय घेतला.... कारण जेथून बस सुटते, त्या ठिकाणी तरी जागा भेटेल असे वाटत होते. नवीन बसस्टँडला गेलो, तर तेथे बस उभाच होती. तीही भरलेली होती. बसमध्ये जावे की नाही असा विचार करत उभा राहिलो.

तेवढ्यात स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे, मध्यम वर्गीयांचे, सुशिक्षितांचे प्रमाण किती असू शकते याच अंदाज येत होता. वाटत होते की स्थानिक राजकीय नेतृत्वाने नेमके काय केले आहे?. येथील विकासाची गंगा उलटी का वाहत आहे? ऐवढे मोठे स्थलांतर का असावे?. एकंदर राजकीय इतिहास पाहता पाथर्डी तालुका हा दोन-तीन राजकीय घराण्याचे वर्चस्व असणारा तालुका आहे. वर्षानुवर्ष तेच तेच नेतृत्व तरीही विकास नाही. दुसरीकडे नवीन नेतृत्व पुढे येण्यास वाव नाही. आगदी कोंडमारा झालेला हा तालुका... आगदी मराठवाड्यातील तालुक्याप्रमाणे भकास वाटत होता.

Rural Economy : हातावर पोट असलेल्या मजुरांची सुटका होईल का?
Rural Story : गावाला गेला लेक

अचानक जागा झाल्यासारखा बसचे विचार मनात आले. मनात म्हणालो, आता आपल्याला नगरला उभा राहून जावे लागतंय. पण हिम्मत करून उभ्या असलेल्या बसमध्ये चढलो. बस फुल भरलेली असल्याने जागा कोठेही दिसत नव्हती. पण एका सीटवर लहान दोन -अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन एक ताई बसलेली होती.

मी म्हणालो, ताई, मला जागा देता का?. त्यांनी बाळाला मांडीवर घेऊन मला जागा दिली. थोडसं बर वाटले.

बाळ खिडकीतून बाहेर पहात होते. निसर्गाचा खूप आनंद घेत होते...त्यामुळे मी म्हणालो, बाळाला पण जागा द्या. मांडीवर नका घेऊ ताई.... बोबड्या भाषेत बाळ बडबड करत होते. नवल वाटत होते.... त्या ताई बरोबर माझा जवळजवळ 20 मिनिटे संवाद झाला नाही. दोघेही शांत बसलेले होतो. गाडी पाथर्डी शहराच्या बाहेर पडली... पण रस्त्याच्या कडेचा सर्व परिसर कोरडवाहू आणि दुष्काळीच.

गाडी फुल भरलेली असल्याने खूपच हळुवार चालत होती. त्यामुळे बाहेरचे सर्व शांतपणे न्याहाळता येत होतं. मी आतल्या बाजूने असल्याने खिडकीकडे आणि बाळाकडे सातत्याने बघत होतो. जसे जसे गाडी पुढे जात होती. तशी मी शेती- माती, पिके न्याहाळत होतो. पाऊस नसल्याने शेतातील सोयाबीनचा करपून धुरळा झालेला होता. इतरही पिके करपलेली दिसून येत होती. अनेक शेत पिवळी पडली होती. काही ठिकाणी तूर दिसून येत होती, तिचीही वाढ तजेलदार नव्हती. इतर पिकांचे विचार करायला नको. अधून-मधून पाणी दिलेली हिरवी पिके दिसत होती. पण पाऊस नसल्याने फुले शेंगा कमीच होत्या , 60 ते 70 टक्के उत्पादन कमी होईल अशा अवस्थेतील पिके होती.

शनिवारी (२३ सप्टेंबर २३२३ रोजी) मोठा पाऊस झाला होता, त्यामुळे गवताची वाळलेल्या मुळांना संजीवनी मिळाली होती. नवीन अंकुर गवतात फुटेल अशी आशा दिसत होती. संध्याकाळी होत आली होती. गाडी करंजी घाटात आली. थोडा अंधार होऊ लागला होता. त्यामुळे बाहेरचे कमी -कमी दिसू लागले होते. त्यामुळे बाहेर पाहणे कमी केलं होतं.

शेजारी बसलेल्या ताईला सहज विचारले, आपण पाथर्डीचे का? गाव कोणते? ताई म्हणाल्या,मी पाथर्डीचे नाही... मी येळंंब ता. शिरूर येथील आहे.

मी म्हणालो, येळंंब मला माहित आहे, मी पाथर्डीहून बीड ला जाताना रस्त्यात लागते. अनेकदा पाहिले आहे. तेथे रस्ता खूपच खराब आहे. मला गाडी चालवत येत नव्हती. आता रस्ता नीट झाला की पूर्वी सारखा आहे?.

ताई म्हणाल्या, "नाही अजूनही तसाच आहे. थोडंस काम चालू आहे. गेली पाच वर्षे झाली काम चालू आहे, पण अजूनही पूर्ण झालं नाही. सरकारी काम हाय किती दिवस चालेल काय माहीत".

आपले नाव काय? असे विचारले. त्यावर ताई म्हणाल्या जयश्री वनवे. येळंंबच्या शेजारीच माझे आजूळ आहे.

मी विचारले, ताई, कोठे चालला आहात? ताई सुरुवातीला धपकत म्हणाल्या, पुण्याला-वाघोलीला चाललो हाय. ताईच्या बोलण्यात मोकळेपणा येईल यासाठी मी छोट्या बाळाला बोललो. पुढील चार मिनिटे बाळाबरोबर गप्पा करत होतो... त्यावर बाळही मला प्रतिसाद देत होते.

मी म्हणालो, तुम्हाला तर बीड -पुणे पाथर्डी मार्गे गाडी आहे ना?.

त्यावर ताई म्हणाल्या "10 वाजता असते. आमच्या गावात गाडी थांबते. पण आज गाडीत खूपच गर्दी असल्याने बस थांबवली नाही. त्यामुळं मला दुपारीच पाथर्डीला यावे लागले. दुपारपासून बस मध्ये जागा मिळत नव्हती. पण या बसमध्ये जागा मिळाली. शहरातील अनेक लोक "लक्ष्मीच्या सणा"ला गावी आल्याने गर्दी झाली हाय".

मी ताईला म्हणालो, पुण्याला काय करता?

त्यावर ताई म्हणाली, काही आमचे किराणा दुकान आहे?.

मी म्हणालो, वाघोलीमध्ये कोठे आहे?. ताई म्हणाली : वाघेश्वरी मंदिराच्या मागच्या बाजूला आहे.

मी वाघोलीचा परिसर पाहिलेला असल्याने म्हणालो, "तो परिसर तर वाघोलीच्या बाहेर आहे. तेथे रहदारी फार कमी आहे. मग किराणा दुकान चालते का"? किमान पोटापाण्याचा प्रश्न भागेल ऐवढे पैसे येतात का?

ताई म्हणाल्या, "चालतं. पण कमी चालते. फारसा धंदा होत नाही. पण ठीक आहे. उसतोडण्यापेक्षा बर हाय". मी म्हणालो, "भाऊ काय करतात"?ताई म्हणाली : "तेच किराणा दुकान चालवतात".

"तुम्ही काय करता"?.असं मी विचारले. ताई म्हणाल्या , "मी जनरल स्टोरचे दुकान टाकले आहे. आम्ही दोघे नवरा -बायको दुकाने टाकली आहेत". दोघांची दुकाने असल्याने थोडाफार पैसे मिळतात.

मनात आले की आगदी काटावरचे जीवन जगत असल्याचे दिसून आले. चार पैसे बचत होतील असेही दिसून येत नव्हते.

मी म्हणालो, रोजंदारी केलेली चांगली की दुकान टाकलेले चांगले"?.

त्यावर ताई म्हणाल्या, दुकानाचे चांगले. कारण मनाचे मालक आहोत, रोजंदारी करायची म्हटले असते तर रोज कोणाची तोंड पहावी लागतात, कोण कसे मिळतं हे सांगता येत नाही. पैसेही कमी जास्त मिळतात. पहा ना. आमचे स्वतः चे दुकान असल्याने आम्ही सर्वजण गावी येऊन दोन दिस राहू शकलो. काल ते (नवरा) पुढे गेलं, आज मी चालले आहे".

मी म्हणालो, दुकानाची जागा स्वतःची आहे की भाड्याने घेतली आहे.

ताई म्हणाल्या: भाड्याने घेतली आहे. आता आम्ही चार वर्षे झाली दुकान टाकलेले. पाहिले आम्ही गावीच होतो. पण आता घरच भागत नाही. म्हणून पुण्यात आलो आहोत.

Rural Economy : हातावर पोट असलेल्या मजुरांची सुटका होईल का?
Rural Development : तयार करा गरिबीनिर्मूलन आराखडा

मी म्हणालो, किती भाडे आहे? त्यावर ताई म्हणाल्या , एका दुकानाला 8 हजार भाडे आहे. भाड्यात जास्त पैसे जातात. स्वतःचे दुकान असते तर भाड्याचे पैसे वाचले असते. पण जेमतेम पैसे हाती येतात. जास्त काही शिल्लक राहत नाहीत. पण हळूहळू होईल व्यवथित.

मी म्हणालो. नका काळजी करू. लवकरच त्या ठिकाणी तुमचे स्वतःचे घर आणि दुकानही होईल. सर्व हळूहळू होईन जाईल. पण ऊसतोडणी चा धंदा सोडून शहरात येईचा जो निर्णय घेतला आहे, तो मला योग्य निर्णय वाटतो.

मी म्हणालो: गावी असताना काय करत होतात?

ताई म्हणाल्या. काही नाही? शेती पाहत होतो, हंगाम सुरू झाला की सासू -सासरे ऊसतोडायला जात होते. पण माझं लग्न झाले, त्यावर दोन वर्षे घरच्यांनी ऊस तोडला. पण किती वर्षे ऊसतोडायचा असं विचार करून प्रथम ते (मालक) वागोलीला कामधंदा मिळतो का हे पाहण्यासाठी गावातील माणसंबरोबर आले. सुरुवातीला त्यांनी बिगारी कामे केली. पण त्यातून हाती काहीच राहिना... म्हणून किराणा दुकान टाकायचे ठरवले. त्यांनी किराणा दुकान टाकले की मी पण पुण्याला आले.

घरी कोण - कोण असतं ? असे विचारले. त्यावर ताई म्हणाल्या, घरी सासू-सासरे, छोटा धीर आणि त्यांची मंडळी (बायको) असे चार माणसे असतात. सहा एकर शेती हाय, उन्हाळ्यात पाणी नाही. खरीप आणि रब्बी अशी दोन पिके घेतो. पण पूर्ण कुटुंबाचे भगत नाही, म्हणून दोघांपैकी कोणीतरी बाहेर पडणे गरजेच होतं....

ह्याची (नवरा) पंधरावी झाली आहे, म्हणून आम्हीच बाहेर पडायचे ठरवलं....

मी म्हणालो, तुमचं शिक्षण किती झाले आहे? ताई म्हणाली: 12 वी झाली आहे.

मी म्हणालो, पुढे का शिक्षण घेतले नाही.

ताई म्हणाली: पुढे शिक्षणाची सोय नव्हती. आई -वडील ऊसतोडणी करतात. त्यांनी 12 वी झाली की लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यास विरोध करता येत नव्हता. म्हणून लग्न झाले आणि शिक्षण संपले. आता मुलांना खूप शिक्षण देईचे ठरवले आहे. पण पहा न दिवसेनदिवस शाळेच्या फी केती वाढत चालल्या आहेत. या बाळाला नर्सरीत टाकले आहे. त्याचे २५ हजार रुपये वर्षाला जातात. असेच चालू राहिले तर जेवढे आम्ही पैसे कामवतोल तेवढे पैसे शिक्षणावर खर्च होतील....

अशी चर्चा पुढे 20 ते 25 मिनिटे गावाकडील आणि पुण्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर चालू राहिली..... त्यातील अनेक खूपच महत्त्वाचे होते. तेही हळूहळू पुढे येतीलच.

ताईचे सर्व ऐकल्यावर, माझ्या मनात विचार आला की कोठेही गेलं तरीही सर्वसामान्यांना पोटा-पाण्याची सोय करणे दिवसेंदिवस खूपच कठीण होत चालले आहे...एकंदर स्थलांतरीत मजुरांच जगणं हे खूपच अनिश्चित झाले आहे .... हे हातावरील, श्रमावर- मेहनतीवर जगणाऱ्यांना व्यवस्थेत थोडंही स्थान नाही अशी असणारी व्यवस्था निर्माण केली गेली आहे. काहींही करा शहरांना स्वस्त आणि मुबलक जे मजूर हवं असतं ते असाच मिळवले जाते.....

तसेच पुढे ताईच्या बोलण्याचा मी खोलवर बराच विचार करत राहिलो. मला राजकीय व्यवस्था, अर्थ व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय नेतृत्वाचे चालवलेला अपवाद वगळता माजुरेपणा अशी अनेक बाबीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. नेमकी या हातावर पोट असलेल्या मजुरांची सुटका होईल का? की जन्म मजुरांच्या पोटी होऊन मजूर म्हणूनच मरण येणार असेल तर व्यवस्थेची वाटचाल नेमकी काय आहे? व्यवस्था नेमकी कोणासाठी आहे. ही व्यवस्था सर्वसामन्य केंद्रित कधी होऊ शकेल?. असे बरेच प्रश्न मला देखील पडले आहेत. या प्रश्नांचे उत्तर केव्हा मिळेल काय माहीत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com