Pune News: पुणे जिल्ह्यात वातावरणातील बदल आणि अपेक्षित थंडीचा कडाका कमी झाल्यामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही भागांत गव्हाची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी ‘तांबेरा’ (रस्ट) रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात गहू पेरणी समाधानकारक झाली आहे. जिल्ह्यातील सरासरी ८८ हजार ३३७ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ७७ हजार ६ हेक्टरवर गहू पेरणी पूर्ण झाली असून, पेरणीचे प्रमाण सरासरीच्या ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पाण्याची उपलब्धता आणि हंगामाच्या सुरुवातीला अनुकूल हवामान असल्यामुळे शेतकऱ्यांचा गव्हाकडे कल वाढलेला दिसून आला..Wheat Crop Management: ढगाळ वातावरणात गहू पिकासाठी उपाययोजना .पुणे जिल्ह्यातील भोर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गहू लागवड झाली आहे. कालव्याचे पाणी, विहिरी आणि बोअरवेलद्वारे सिंचनाची सोय उपलब्ध असल्याने या भागांत गहू पिकाचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे रब्बी हंगामाबाबत सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण होते..चालू वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात थंडी चांगली जाणवली. मात्र, गव्हाच्या वाढीच्या महत्त्वाच्या कालावधीत वातावरणातील गारवा कमी राहिल्याने पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. उशिरा झालेल्या पेरण्यांमुळे गव्हाला आवश्यक असणारा थंडीचा कालावधी मिळाला नाही. .Wheat Sowing: खपली गहू पेरणी खानदेशात अल्प.परिणामी, गव्हाच्या लोंब्यांची लांबी कमी राहिली असून दाणेही पुरेसे पोसले गेलेले नाहीत. याशिवाय, अनेक भागांत तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने गहू पीक धोक्यात आले आहे. ऊस तुटल्यानंतर उशिराने गहू पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे..शेतकऱ्यांच्या मते, काही भागांत गव्हाची अवस्था समाधानकारक असून उतारादेखील चांगला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या भागांत पेरणी उशिरा झाली किंवा थंडीचा अभाव जाणवला, तिथे उत्पादनात लक्षणीय घट होणार आहे. सामान्यतः एकरी १५ ते १६ पोती उत्पन्न मिळते; मात्र यंदा हे उत्पादन एकरी ८ ते १० पोत्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे..उत्पादन घटीची भीतीकाही भागांत पीक चांगल्या स्थितीत असले तरी बहुतांश भागांत उत्पादन निम्म्याने घटण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. सततचे वातावरणीय बदल आणि पिकांवरील रोगांमुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून, उत्पन्नाचे गणित जुळवताना त्याची दमछाक होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे..माझ्याकडे एकूण २० एकर शेती असून त्यापैकी ७ ते ८ एकर क्षेत्रावर कांदा पीक आहे, तर एक एकरवर गहू आहे. सध्या दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने कांद्यावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वारंवार फवारण्या कराव्या लागत असून उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.भाऊसाहेब पळसकर, प्रगतीशील शेतकरी, करडे, ता. शिरूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.