
डॉ. सुवर्णा बोबडे, शिल्पा जोशी
Minds : मागच्या लेखात आपण मन म्हणजे काय हे समजून घेतले. त्याची एक उजळणी करूया. आपण पाहिले – विज्ञानाच्या संकल्पनेत मन म्हणजे मेंदूच्या विशेष पेशी – मज्जा पेशी आणि त्यांचे कार्य. मेंदू ही राजधानी; जिथून मनावर नियंत्रण ठेवलं जातं.
मन कुठे असतं? तर मेंदूत सुरू होणाऱ्या मज्जा पेशींपासून सुरू होऊन पार हातापायांच्या बोटांपर्यंत. मनाची कार्ये दोन प्रकारची असतात- मूर्त (concrete) आणि अमूर्त (abstract).
मनाच्या अमूर्त कार्य करणाऱ्या संस्था म्हणजेच विचार, भावना, संवेदना, स्मृती, बुद्धी, प्रेरणा, तारतम्य, विवेक, जागृती.
आपलं मन म्हणजे समजा आपली बाइक आहे. ही बाइक जर नीट दिशेने चालायची तर काय
काय हवं? तर गाडीत पेट्रोल (इंधन) हवं. ते पेट्रोल जाळून ऊर्जा मिळण्यासाठी स्पार्क म्हणजे ठिणगी हवी. आणि नेमक्या हव्या त्या ठिकाणी गाडी नेणारा, गाडीला दिशा देणारा चालकदेखील हवा. आपल्याला फायद्याचे ठरेल असे वर्तन म्हणजे योग्य दिशेने गाडी जाणं. त्यासाठी मनाच्या बाइकला काय हवं? तर विचारांचे इंधन, भावनांचा स्पार्क आणि वर्तनाला दिशा द्यायला विवेक, तारतम्य यांचे भान.
मन म्हणजे आकृती २ मध्ये दिसतो आहे तसा एक त्रिकोण. या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू किंवा तीन टोकं म्हणजे मनाच्या मूलभूत संस्था, अर्थात आधारस्तंभ - विचार, भावना आणि वर्तन.
मन स्थिर राहायचं तर हा त्रिकोण समभुज राहायला हवा. कुठलेही एक टोक खेचले गेले, की या त्रिकोणाची एक बाजू ताणली जाते. कधी खूप त्रासदायक विचार सतावतात, म्हणजे विचारांचे टोक खेचले जाते. कधी तीव्र भावना त्रास देतात, तर कधी हानिकारक वर्तन होते.
अशी खेचाखेच होणे म्हणजे काय त्याची काही उदाहरणे बघूया. विचारांचे टोक ताणले जाते तेव्हा त्रासदायक विचार खूप तीव्रतेने किंवा खूप प्रमाणात जाणवतात. किंवा एखाद्या अप्रिय विषयाच्या विचारात मन अडकून राहतं.
एखाद्या कमी वयाच्या मित्राला अचानक हार्ट अटॅक आला असं ऐकलं आणि सतत, खूप तीव्रतेने मनात विचार येत राहिले, ‘‘मोहनला अचानकच हार्ट अटॅक आला, मला पण तसं काही झालं तर? काहीतरी असंच होणार माझं पण!’’ किंवा खूप एकांगी विचार जसा, की मी नेहेमी बरोबरच असते, माझं कधीच काही चुकता कामा नये.
एखाद्या प्रसंगात किंवा निर्णयासंबंधी तीव्र भावना जाणवणे आणि त्यामुळे मनाचे स्वास्थ्य कमी होणे, म्हणजे भावनांचे टोकं ताणले गेले. समजा तुम्ही ठरवता आहात की मुलाला शिकायला शहरात पाठवायचं, त्याला हवी ती पदवी तिथे घेता येणार आहे.
पैशांची सोय, मुलगा कसा जुळवून घेईल याबद्दल काही प्रमाणात काळजी वाटणे हे साहजिकच. मात्र ही काळजी किंवा तो दूर जाणार याचे दु:ख अतितीव्र प्रमाणात वाटणे, त्यामुळे निर्णय घ्यायला पुढे मागे होणे म्हणजे तीव्र भावनांचा अनुभव.
काही वेळा आपल्या वागण्यात किंवा कृतीत गडबड जाणवते, तणाव किंवा अस्थिरता येते. अशा अस्वस्थ वागण्यात कधी आपण घाईघाईत निर्णय घेतो, तर कधी एक निर्णय घेणे अशक्य होऊन बसते.
आपल्याला एखादी कृती हानिकारक आहे हे कळत असूनही आपले तसेच वर्तन घडत राहते! त्यातून बिडी-गुटखा-दारू अशी व्यसने, सतत मोबाइलचा वापर किंवा महत्त्वाची कामे पुढे ढकलत राहणे हे घडते आणि वर्तनाचे टोक ताणले आहे असं आपल्या लक्षात येतं.
मनाचे विकार, विसंवाद आणि विकास
मनाच्या त्रिकोणाच्या कुठल्याही टोकाची खेचाखेच झाली तर मन अस्थिर व्हायला सुरुवात होते. आपल्याला टेंशन किंवा तणाव जाणवतो, असे आपण म्हणतो तेव्हा ह्या तीनपैकी एक किंवा जास्त बाजूंची ताणाताणी होत असते आणि त्रिकोणाचा समतोल ढळतो.
समजा हा तणाव खूप जास्त असेल, अगदी एखादी बाजू फाटेपर्यंत – तर तो झाला मनोविकार (मनाचा आजार). विचारांच्या जाळ्यात गुरफटून काहीच काम न करता येणं या तीव्रतेचे विचार म्हणजे ही विकार स्थिती झाली.
ताण आजाराएवढा नाही मात्र तरीही त्रिकोणाच्या बाजू ताणल्या गेल्या आणि समतोल विस्कटला तर तो मानसिक विसंवाद. उदाहरणार्थ, कामाच्या जागी मतभेद किंवा पती-पत्नीमधले सतत वाद-मतभेद, त्यामुळे त्रासदायक भावना किंवा विचार येतात. ती व्यक्ती आपले काम करत राहते, पण जीवनात आनंद किंवा स्थैर्य वाटत नाही.
विसंवाद जास्त काळासाठी राहिला तर त्रिकोण फाटतो आणि त्याचे रूपांतर मानसिक विकारात व्हायला लागते.
स्वस्थ, सुदृढ मन हवे म्हणजेच मनोविकास साधायचा तर हा त्रिकोण स्थिर ठेवायचा. विचार-भावना-वर्तन यातील कुठल्याही टोकात निर्माण झालेला ताण वेळीच ओळखून तो कमी करणे म्हणजे मानसिक आरोग्याची जपणूक.
मनाचा त्रिकोण समजून घेऊन मनाची संकल्पना स्पष्ट व्हायला मदत झाली. मनाचे कार्य कसे चालते? मनाचे आणि शरीराचे नाते कसे असते? हे समजून घेण्यासाठी या मनाच्या आकृतीचे एक वर्किंग मॉडेल बनवूया. शरीर आणि मन अगदी घट्ट जोडले गेले आहेत. शरीर आणि मनाचे एकत्र मॉडेल काहीसे असे दिसेल – मनाच्या समतोल त्रिकोणाच्या पायावर पेलून धरलेले शरीर!
शरीराला त्रास असेल तर मनही त्रस्त होतं. (उदा. अंगात ताप असेल किंवा डोकं ठणकत असेल तर आपली खूप चिडचिड होत राहते.), मन त्रासात असेल तर शरीराची ऊर्जाही कमी होते (एखादी वाईट बातमी ऐकली की शरीरानेही गळून जायला होतं.). मन आणि शरीर दोन्ही गतिशील आहे. विचार बदलतात, भावना बदलते आणि त्यामुळे वर्तन / कृती बदलते. आणि ही प्रक्रिया अविरत चालू असते. म्हणजेच वरील आकृतीतील वर्तुळ गतिमान आहे आणि म्हणून शरीरही.
शरीराला ऊर्जा मिळते ती अन्नपोषणातून. मनाला लागणारी ऊर्जा तयार होते पूरक विचार आणि भावनांमधून. शरीर आणि मन जेव्हा एकतान होतात, तेव्हा शरीर ऊर्जा आणि मनाची ऊर्जा यांचा जणू गुणाकार होतो, काम करायला एक लय प्राप्त होते. असे एकतानतेने काम करताना वेगळाच आनंद अनुभवता येतो आणि कार्यक्षमता वाढते.
शरीराची वाढ दिसते, मोजता येते. मगाशी आपण विचार-भावना-वर्तन यांचे, शरीराशी जोडून येणारे गतिमान वर्तुळ पाहिले. हे वर्तुळ अधिक मोठे होत जाणे, विचारांचा-भावनांचा आणि उपयुक्त वर्तनाचा परीघ वाढत जाणे म्हणजेच मनाची वाढ आणि मनाचे शिक्षण! (आकृती ४)
पंढरीच्या वारीचा कधी अनुभव घेतला आहात? किंवा वारीचे व्हिडिओ पाहिले असतील? विठ्ठलाचे विचार, त्यातून भक्तीची, प्रेमाची भावना आणि या विचार-भावनांच्या ऊर्जेवर एक एक तालबद्ध पाऊल टाकणारे शरीर. हळूहळू पंढरी जवळ येत आहे त्यामुळे विचार आणि भावनेला मिळणारी ऊर्जा आणि सगळे वारकरी अगदी एकतान आणि एकरूप झाल्याची भावना वेगळी अनुभूती देते.
मनाचा त्रिकोण आणि मन-शरीर यांचे नाते आपण पाहिले. मानसिकता म्हणजे काय हे आपण पुढच्या भागात समजून घेऊ.
(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आणि मनोविकास प्रशिक्षक आहेत.)
ई-मेल - kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –https://www.youtube.com/watch?v=QoLI9H93bD8&list=PLz5sSV0u16F3u_hVtXNAwnmZmuRlg9WmN&index=5
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.