

Research for farmers : कृषी शास्त्रज्ञ म्हणून शेतकऱ्यांसाठी मी आयुष्यभर संशोधन केलं. शेतकऱ्यांसाठी लिहावं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं, अशी खूप इच्छा असायची. पण मी काही सरकारी संस्थेत नव्हतो. त्यामुळे माझे लेख अनेक माध्यमांमध्ये नाकारले जायचे. दोन दशकांपूर्वी मराठीत एक सरकारी मासिक खूप वाचले जायचे. तेथे मी माझे लेख दिले; परंतु तेथून नकारघंटा यायची. दूरदर्शनवरील शेतीविषयक कार्यक्रमदेखील तेव्हा खूप चर्चेत होता.
परंतु मी सरकारी संस्थेत नसल्याचे सांगून तेथेही मला डावलण्यात आले. हे इतकं सांगायचं कारण म्हणजे ‘ॲग्रोवन’कडून स्वतःहून लेखनासाठी प्रस्ताव आला, तेव्हा मला खूप आनंद झाला. माध्यमांच्या परिघाबाहेर असलेल्या अनेकांना अशी लेखनाची संधी या वृत्तपत्राने दिली. त्यात आमच्यासारख्या बिगरसरकारी संस्थांमधील शास्त्रज्ञापासून ते गावशिवारातील सामान्य शेतकऱ्याचा समावेश आहे.
राज्यातील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत माझे लिखाण केवळ त्यामुळेच पोहोचू शकले. गेल्या काही दिवसांत या वृत्तपत्रात माझे २० लेख प्रकाशित करण्यात आले. प्रत्येक लेखात शेतकऱ्याला नवी व उपयुक्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असे. पारंपरिक कृषी विद्यापीठांच्या चाकोरीबाहेरचे माझे संशोधन आहे. त्यातील अनेक मुद्दे शेतकऱ्यांच्या कधीही वाचनात आलेले नव्हते.
त्यामुळे मला आठवतेय, की लेख प्रसिद्ध होताच सलग दोन दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मला संपर्क करीत असत. ते भरभरून बोलत. नवी माहिती देत. आपल्या शंकांचे निरसन करून घेत. आपला शेतकरी किती कष्टानं, जिद्दीनं शेती करतो, नव्या माहितीसाठी किती आसुसलेला असतो, हे मला लक्षात आले. असा अनुभव यापूर्वी मला कधीही आलेला नव्हता.
माझ्या आजारपणामुळे आता लेखमाला थांबलेली आहे. तरीही शेतकऱ्यांचा संपर्क सुरूच असतो. मीदेखील आजारपणात असतानाही पुढचे कोणते मुद्दे शेतकऱ्यांपर्यंत जायला हवेत, याबाबत मनात लेखाची जुळवाजुळव करीत असतो. आपला शेतकरी अतिशय मेहनती आहे. तो कोणत्याही पिकाचे उत्पादन घेण्यास सक्षम आहे. त्याला शेतीच्या तांत्रिक अंगाची तसेच बाजारपेठेतील ताज्या, अद्ययावत माहितीची गरज होती.
परंतु त्याचा कोणताही स्रोत महाराष्ट्रात उपलब्ध नव्हता. मला वाटते, की ॲग्रोवनने ती उणीव भरून काढली आहे. कृषी विपणनाच्या समस्येवर सहकारी व्यवस्थाच शेतकऱ्यांना खूप आधार देऊ शकते, असे माझे ठाम मत आहे. ऊस, दूध यांसारख्या नाशिवंत शेतीमालात सहकार व्यवस्था शेतकऱ्यांना उपयोगाची ठरल्याचे मी एका लेखात नमूद केले होते. या उलट जे नाशिवंत नाही ते शेतकऱ्यांकडून ताब्यात घेत त्याची साठवण करीत नफा कमाविण्याकडे व्यापारी कसे यशस्वी ठरत आहेत, हेदेखील मी दाखवून दिले होते.
त्या मुद्द्यांचे वाचकांनी भरभरून स्वागत केले होते. अर्थात, माझा प्रत्येक लेख शेतकऱ्यांना भावला. ८७ व्या वर्षी मी माझ्या लेखनातून शेतकऱ्यांना त्यांच्या हिताचं देतोय, याचं समाधान खूप मोठं आहे. मी नुसतं लिहीत नाही तर जोडीला संशोधनदेखील करीत असतो. ओडिशामधील संशोधन प्रक्षेत्रांना भेटी देण्याचे माझे काम अलीकडेपर्यंत सुरू होते. ही ऊर्जा मला शेतकऱ्यांपासून मिळते. अर्थात, अचानक आजारपण आल्यामुळे तूर्त संशोधन थांबले आहे. परंतु ते लेखन व संशोधन पुन्हा लवकरच सुरू करेन. कारण त्यातून मला नवी उमेद मिळत असते.
एक अविस्मरणीय प्रसंग नमूद करतो. नाशिक भागातील दोन शेतकरी ॲग्रोवनमधील माझे लेख नियमित वाचत होते. त्यांना माझे मुद्दे खूप आवडायचे. एकदा ते चक्क पुण्यात माझ्या घरी आले. त्यांनी श्रीफळ, शाल देत माझा सत्कार केला, पेढे भरवले. तुमच्यासारख्या शास्त्रज्ञाला सरकारने सर्वांत मोठा पुरस्कार द्यायला हवा, अशी एक प्रामाणिक भावना त्यांनी बोलून दाखवली. पुरस्कारासाठी मी कधी जगलो नाही. शेतकरी असे घरी येतात आणि माझा सत्कार करतात, यापेक्षा दुसरा मोठा पुरस्कार कोणता असू शकतो?
(शब्दांकन : मनोज कापडे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.