Kolhapur Water News : शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाळा तोंडावर असतानाच शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे.
ऊस पिकाची वाढ खुंटली असून विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतामधील ऊस करपू लागला असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
तालुक्यात खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. मात्र दमदार वळीव झाला नसल्याने या कामातदेखील म्हणावी अशी गती दिसत नाही. यावर्षी उन्हाची तीव्रता चांगलीच आहे.
गतवर्षी वळीवाने चांगली हजेरी लावल्यामुळे खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेगाने सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र तसे चित्र दिसत नाही. तोंडावर आलेल्या पावसावरच शेतीचे चित्र अवलंबून आहे.
वळीव पावसाअभावी नांगरून टाकलेल्या शेतातील मातीचे ढेकळही विरले नाहीत. तरीदेखील पावसाच्या आशेवर पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
जमिनीची नांगरट, खुरटणी करणे, रोटर मारणे, शेणखत, जैविक खतांची मात्रा टाकण्याचे काम सध्या शेतामध्ये सुरू आहे. जूनच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज बांधून मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
शेतीच्या पाण्यावर उपसाबंदीचे संकट आल्यानंतर शेतकऱ्यांनी संघटितपणे याला विरोध दर्शवला होता. यानंतर ‘महावितरण’ने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी सकारात्मक भूमिका घेतली. गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनीची तहान वाढली आहे.
नदीच्या पाण्यावर अवलंबून पिकांना काही प्रमाणात पाणी मिळत असले तरी विहिरींवर अवलंबून शेतीतील पिके अडचणीत आली आहेत.
रोज दोन-तीन तास मोटर चालेल इतकाच पाणीसाठा विहिरींमध्ये शिल्लक आहे. उन्हाच्या तीव्रतेत पाण्याचे हे प्रमाण अत्यल्प मानले जात आहे. दुसरीकडे यावर्षी वळीव पावसाअभावी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.
परिणामी झऱ्यांच्या पाण्यावरच पिके तग धरून आहेत. पाच-सहा महिन्यांचा ऊसदेखील आज करपू लागला आहे. आणखी पंधरा दिवस अशी स्थिती राहिली तर ऊस पूर्णपणे करपणार आहे. त्यामुळे खोडवा उसाला दोन हजार रुपये दराप्रमाणे चाऱ्यासाठी विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
महिनाभरापासून पाण्याची टंचाई शेतकऱ्यांना जाणवत आहे. उसासह इतर पिकांनाही पाण्याअभावी धोका निर्माण झाला आहे. वळीव पावसाने दमदार हजेरी लावली असती तर विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पावसाळ्यापर्यंत पिके जगवता आली असती.
भाजीपाला पडतोय पिवळा
विहिरीवर अवलंबून असणाऱ्या भाजपाला पिकालादेखील धोका निर्माण झाला आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने वाढत्या उष्म्याने भाजीपाल्याच्या पानांचा रंग बदलू लागला आहे. पाण्यामुळे हिरवेगार असणारा भाजपाला पिवळा पडू लागला आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेले खर्चदेखील निघेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.