Forecast by Meteorological Department : हवामान विभागाचा रोजचा अंदाज शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

Dr. Krishnanand Hosalikar : माॅन्सून देशात दाखल झाला आहे. हवामान विभागाने यंदाच्या हंगामात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा दीर्घकालीन अंदाज दिला. तसेच जूनमध्येही पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पण तरीही जून महिन्यातील पाऊस, पावसाचा खंड आणि वितरण याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्‍न आहेत. यासंदर्भात पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख डाॅ. कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी साधलेला संवाद.
Dr. Krishnanand Hosalika
Dr. Krishnanand HosalikaAgrowon

हवामान विभागाने नुकताच मॉन्सूनचा अंदाज जाहीर केला. परंतु तरीही अशी चर्चा आहे, की जून महिन्यात पाऊस कमीच राहील. यात कितपत तथ्य आहे?

- भारतीय हवामान विभागाने संपूर्ण देशात जून महिन्यात चांगला पाऊस राहील, असा अंदाज दिला. त्यातही मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचे पूर्वानुमान हवामान विभागाने दिले आहेत. पण त्यामानाने उत्तरेच्या भागात आणि ईशान्येकडील भागात जून महिन्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी दिसते. त्याची काही कारणे आहेत. माॅन्सून एकदा केरळमध्ये दाखल होऊन उत्तरेकडे सरकत जातो. मॉन्सून उत्तरेचा भाग व्यापण्यामध्ये जून महिना जातो. माॅन्सूनची दिल्लीत पोहोचण्याची सरासरी तारीख ३० जून आहे. त्याच्यापुढे राजस्थान आणि इतर भागात पोहोचण्यासाठी माॅन्सूनला आणखी वेळ लागतो. माॅन्सूनचा प्रवास लांब पल्ल्याचा आहे. त्यामुळे आपल्याला उत्तरेच्या भागात आणि पश्‍चिम भागात जून महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आणि मध्य भारतात तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक दिसते.

हवामान विभागाने जून महिन्यात देशात ९२ ते १०८ टक्के पावसाचा अंदाज दिला. सरासरी अंदाजात एवढा फरक का?

- सरासरी पाऊस म्हणजे ९४ ते १०४ टक्के पाऊस असतो. ही आकडेवारी देशाच्या पातळीवर असते. आपण जेवढे छोट्या भूभागाकडे जाऊ तेवढी पावसातील तफावत वाढत जाते. हवामान विभागाने जून महिन्यातील पावसाचा हा अंदाज भौगोलिक प्रदेशनिहाय दिला आहे. म्हणजेच मध्य भारत, दक्षिण भारत, ईशान्य भारत, उत्तर भारत अशा भागांसाठी तो आहे. त्यामुळे अंदाजात एवढा फरक दिसतो. याहून जर आपण आणखी राज्यातील विभागांचा विचार केला तर हा फरक आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जेवढा भूभाग कमी होणार तेवढी अंदाजातील त्रुटी वाढण्याची शक्यता निर्माण होणार.

Dr. Krishnanand Hosalika
Interview with Dr. Krushnanand Hosalikar : राज्यात मे, जूनमध्येही उष्णतेच्या लाटांचा अंदाज

राज्यात विभागनिहाय पाऊस कसा राहील, याविषयी सांगता येईल का?

- देशाचा पावसाचा जो अंदाज दिला त्याची अचूकता राज्यपातळीवर जास्त असते. ज्या वेळी आपण छोट्या भूभागावर जातो म्हणजेच विभागपातळीवर जातो तेव्हा त्यातील त्रुटी वाढत जाते. पण हवामान विभाग राज्याच्या विभागनिहाय अंदाज देत असते. पुढच्या काळातही असा अंदाज शेतकऱ्यांना मिळेल. पण जून महिन्यात पावसाचे वितरण चांगले राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज दिला. मग आता शेतकऱ्यांनी निश्‍चिंत राहावं का?

- शेतकरी आणि इतर घटकांनी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकूण माॅन्सून हंगामाचा कालावधी चार महिन्यांचा असतो. दीर्घकालीन पूर्वानुमान धोरकर्त्यांसाठी जास्त फायद्याचे असते. शेतकऱ्यांनी केवळ दीर्घकालीन अंदाजाकडे पाहू नये. हवामान विभाग जसा दीर्घकालीन अंदाज देत असते त्याप्रमाणेच रोजचा अंदाजही देत असते. पुढच्या ५ ते ७ दिवसांचा अंदाज दिला जातो. तसेच दर गुरुवारी पुढच्या ४ आठवड्यांमध्ये काय होऊ शकते, याचा अंदाज आम्ही देत असतो. ही माहिती शेतकऱ्यांच्यासाठी खूप कामाची आहे. शेतकऱ्यांनी या रोजच्या आणि महिन्याच्या अंदाजाकडे बारकाईने लक्ष द्यावं. तसेच दीर्घकालीन अंदाज जे दर महिन्याच्या शेवटी येतात त्याकडेही पाहावं. यातून शेतकऱ्यांना पाऊस आणि पावसातील खंड याबद्दलचा अंदाज येईल.

जून महिन्यात पावसात खंड पडू शकतो का?

- जून महिन्यात पावसामध्ये खंड पडेल, असा कुठलाही अंदाज सध्या तरी हवामान विभागाकडे नाही. आपण जर मागील ५० वर्षांतील माॅन्सूनच्या पावसाची आकडेवारी पाहिली तर पावसातील खंड जुलैच्या उत्तरार्धात किंवा ऑगस्टमध्ये असण्याची शक्यता असते. पण कधी कधी पावसाचे प्रमाण काही ठिकाणी कमी किंवा जास्त असतो. पण याला पावसाचा खंड म्हणता येणार नाही. त्याला पावसाचे असमान वितरण असे म्हणता येईल.

शेतकऱ्यांनी पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

- अनेकदा शेतकरी पहिला पाऊस पडला की पेरणी सुरू करतात. पण प्रत्येक ठिकाणी किती पाऊस झाल्यावर पेरणी करावी, याचे काही निकष आहेत. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष ठेवावं. यासाठी हवामान विभाग कृषी विद्यापीठांना पावसाविषयी अंदाज कळवतं आणि ही कृषी विद्यापीठे त्यानुसार शेतीसल्ल्याविषयी माहिती कृषी विभागाला देतात. कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवतो. उदा. पेरणीसाठी ओल पुरेशी आहे की नाही, हा मुद्दा महत्त्वाचा असतो. ओल पुरेशी असेल तर कृषी विभाग शेतकऱ्यांना सांगतं की आता पेरणी सुरू करायला हरकत नाही.

Dr. Krishnanand Hosalika
#Shorts : बनावट हवामान तज्ज्ञाला डॉ. होसाळीकरांचं खुलं आव्हान! | Dr. K.S Hosalikar | ॲग्रोवन

माॅन्सूनला पोषक ‘ला- निना’ आणि ‘आयओडी’ उत्तरार्धात धन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पावसात खंड पडेल असे सांगितले जाते. यात कितपत तथ्य आहे?

- आपण जर जून ते सप्टेंबर या माॅन्सून काळाचा विचार केला आणि पावसाची आकडेवारी पाहिली तर जुलै महिना जास्त पाऊस देणारा असतो. म्हणजेच जुलै महिन्यात जास्त पाऊस होतो. त्यामुळे त्याकडे सर्वांचेच लक्ष असते. ऑगस्ट महिन्यात त्यापेक्षा कमी पाऊस पडतो. तर जून महिन्यात पावसात चढ- उतार दिसून येतो. कारण माॅन्सूनचा प्रवास जूनमध्ये सुरू असतो. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टच्या पावसाकडे लक्ष असते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार ‘एल-निनो’ सध्या तटस्थ आहे.

सर्वसाधारणतः जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान ‘ला- निना’ निर्माण होण्याची शक्यता ७० टक्के आहे. काही माॅडेल जून, जुलैमध्येही तो निर्माण होण्याचे दाखवतात पण त्याची शक्यता कमी आहे. आयओडीही सध्या तटस्थ असून तोही धन होण्याची शक्यता आहे. या दोन्हींकडे हवामान विभागाचे लक्ष आहे. याची माहिती शेतकऱ्यांना हवामान विभाग देत राहील. पावसाचे प्रमाण केवळ ला- निना, एल- निनो किंवा आयओडीवर अवलंबून नाही. हे दुरस्थ घटक आहेत. काही घटक स्थानिक असतात, तेही पावसावर परिणाम करत असतात. जसे की एमजीओ हा एक घटक आहे. मोसमी वारे, त्यांची तीव्रता, बाष्पाचे प्रमाण, जमीन आणि समुद्राच्या तापमानातील फरक, कमी दाबाचे क्षेत्रांचे प्रमाण, त्यांची तीव्रता अशा वेगवेगळ्या घटकांवर पाऊस अवलंबून असतो.

राज्यात माॅन्सून कधी येऊ शकतो?
- या प्रश्‍नाच्या उत्तराची सगळ्यांना उत्सुकता असते. पण सध्या तरी हवामान विभागाने याविषयी अंदाज दिलेला नाही. पण माॅन्सून दाखल होण्याचे काही निकष आहेत. आपल्याकडे माॅन्सून वेगवेगळ्या भागात कधी दाखल होतो याची मागच्या अनेक वर्षांची आकडेवारी आहे. महाराष्ट्रात माॅन्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ५ ते ७ जून आहे. पण याच तारखेला माॅन्सून येईल, असे सांगता येत नाही. हवामान विभाग रोज माॅन्सूनच्या वाटचालीची माहिती देत असते.

खरिपाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे?

- हवामान विभागाने दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज दिला आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहेच. शिवाय शेतकऱ्यांनी रोजच्या अंदाजाकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. पेरणी करताना घाई नको. कृषी विभागाच्या सल्ल्याकडे लक्ष द्यावे. आपण शेती मशागतीची कामे उरकून घ्यावीत. माॅन्सूनच्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती येत असते. ती शेतकऱ्यांनी पडताळून बघितली पाहिजे. कारण अनेकदा ही माहिती वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर नसते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असा अनुभव आहे. हवामानाच्या अंदाजासाठी हवामान विभागाच्या माहितीकडेच लक्ष द्यावे. हवामान विभाग रोज अंदाज देत असते. आपल्याला नक्कीच काही ना काही शंका असतात. यासाठी आपण स्थानिक हवामान केंद्राशी संपर्क साधू शकता. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे हवामान केंद्रे आहेत. या केंद्रांशी आपण संपर्क साधू शकता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com