Mumbai News : शेतकऱ्यांना कर्जमाफी, ‘एमएसपी’शी समन्वय साधत भावांतर योजना, शेतकरी सन्मान योजनेत तीन हजारांची वाढ, पाण्याचा ताळेबंद, ४५ हजार गावांत पाणंद रस्ते, मका, बांबू आधारित इनेनॉल केंद्र आदी आश्वासनांचा पाऊस भाजपच्या जाहीरमान्यात पाडण्यात आला आहे.
बांद्रा येथील एका हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. हे संकल्पपत्र महायुतीचे असल्याचे सांगितले जात असले, तरी यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान देण्यात आलेले नाही. या संकल्पपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे संकल्पपत्र तयार केले आहे. यामध्ये १५ घटकांचा समावेश असून, कृषी व संलग्न क्षेत्रांचा विकास, अर्थव्यवस्था आणि उद्योग, शिक्षण, युवा आणि क्रीडा, आरोग्य, महिला सन्मान, सामाजिक न्याय, प्रशासन आणि सुव्यवस्था, पायाभूत सुविधा, शहरी विकास, ग्रामविकास, संस्कृती आणि पर्यटन, वन, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने, मुंबई महानगर प्रदेश आदींचा समावेश आहे.
संकल्पपत्राच्या प्रकाशनप्रसंगी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेते उपस्थित होते. जाहीरनाम्यात ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये महिना, पोलिस दलात २५ हजार महिलांची भरती, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मानमधून वर्षाला १२ हजारांवरून १५ हजार रुपये, किमान हमीभावाशी समन्वय साधत २० टक्क्यांपर्यंत भावांतर योजना, शेतीमालाला वाजवी भावासाठी नगदी पिकांसाठी दरवर्षी नव्याने लागवड आणि पणन योजना, जलयुक्त शिवार ३, मराठवाडा वॉटर ग्रीड, नार-पार-गिरणा आणि नळगंगा-वैनगंगा नदी जोडप्रकल्प, गावस्तरावर पाण्याचा ताळेबंद, मागेल त्याला शेततळे, सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहनासाठी अनुदानवाढ करून प्रतिथेंब प्रतिपीक योजनेस प्रोत्साहन आदी आश्वासने दिली आहेत.
‘खतांवरील जीएसटी अनुदान स्वरूपात परत करू’
सध्या खतांवरील जीएसटी हा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी खतांवरील सर्व राज्य वस्तू व सेवा कर अनुदानाच्या स्वरूपात परत करू, असे आश्वासन देण्यात आले आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापना करण्याचे आश्वासन आहे. महाराष्ट्र दुग्ध विकास मिशन सुरू करून २०३० पर्यंत दूध उत्पादन क्षमता ३०० लाख टनांपर्यंत वाढवून दूध प्रक्रिया उद्योग आणि विक्रीला चालना, राज्यात फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, गोवंश जातींचे संवर्धन आदी आश्वासने आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर
राज्यात सत्ता आल्यास महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावर अमित शहा यांनी सावध पवित्रा घेतला. ‘‘आम्ही निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जात आहोत. सध्या एकनाथ शिंदे महायुतीचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सहकारी पक्षांशी चर्चेने ठरवू,’’ असे ते म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.