
डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
तंत्र ः नैसर्गिक साधनसंपत्तीचा नकाशा
मागील भागामध्ये शिवार फेरीची माहिती घेतली. शिवारफेरी करत असतानाच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती नोंदवणे गरजेचे असते. त्याचा अंतर्भाव गावनकाशामध्ये करून सर्वांना समजू शकेल, अशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीचाही नकाशा तयार करावा. म्हणून शिवारफेरीदरम्यान जलतज्ज्ञांचा समावेश असावा.
त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जल व्यवस्थापनासंदर्भातील माहितीचे व्यवस्थित संकलन करावे. गाव शिवारामध्ये उपलब्ध असणारे साठवण तलाव, पाझर तलाव, माती व सिमेंट नाला बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, शेततळी, क्षेत्रीय उपचार, त्यातील सलग समतल चर, बांधबंदिस्ती इ. उपचारांची माहिती घेता येते.
शिवारफेरी दरम्यान जलस्रोताची जल साठवणक्षमता व पुनर्भरणक्षमता या बाबीही लक्षात घ्याव्यात. कारण त्याचा उपयोग पुढे जलसंकल्प तयार करताना नक्कीच होतो. सर्वसाधारणपणे वाहून जाणाऱ्या एकूण पावसाच्या अपधावेपैकी ७० टक्के पाणी अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे नियोजित केली पाहिजे. उर्वरित ३० टक्के प्रवाह हा पुढील गावासाठी सोडून दिला जातो. गावातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त उतारावरील जमिनी वृक्ष लागवडीसाठी वापरता येतात. याशिवाय वृक्ष लागवडीमुळे जलस्रोतांची शाश्वतता अधिक टिकून राहते. राष्ट्रीय वन धोरणाच्या अन्वये गावातील एकूण जमिनीच्या ३३ टक्के क्षेत्रावर जंगलांची आवश्यकता आहे.
शिवार फेरीदरम्यान गावातील संपूर्ण क्षेत्राची माहिती घेतल्यानंतर उपलब्ध जंगलांची स्थिती गावकऱ्यांचे लक्षात येते. जंगल व्यवस्थापनाबद्दल काही उपक्रम निश्चित करता येतात. झाडांची संख्या व जैवविविधता जितकी वाढेल, तितका त्याचा फायदा सजीवांच्या जैवविविधतेला होतो.
हे सर्व वनसंबंधित घटक जलसंसाधनातही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे माहिती संकलित करताना सर्व नैसर्गिक साधन संपत्तीची नोंद घ्यावी. पण त्याच्या सर्व नोंदी नकाशात अंतर्भुत करून तो सार्वजनिक ठिकाणी रेखाटावा. त्यामुळे गावातील प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ही परिस्थिती राहते. एकूणच या सर्व प्रक्रियेतून लोकसहभाग वाढतो.
तंत्र ः हंगामाचे नियतकालिक
(Seasonality Index)
गावपरिसरातील लोकांच्या जीवनमानामध्ये वर्षातील विविध हंगामांमध्ये त्या त्या हवामान, पिके, कामे, सण, उत्सव व अन्य काही कारणांमुळे अनेक बदल होत असतात. तोच प्रकार नैसर्गिक पातळीवरही घडत असतो. त्यामुळे लोकांच्या आणि नैसर्गिक स्थितीच्या हंगामनिहाय बदलांचे नियतकालिक तयार करता येते.
विशेषतः हे तंत्र नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरते. अन्य तंत्राप्रमाणेच हे तंत्र सार्वजनिकरीत्या करावयाची कृती आहे. यासाठी आवश्यक असणारी माहिती स्थानिकांकडून घ्यावी लागेल. हंगामनिहाय होत असलेल्या बदलांची मांडणी तक्ता स्वरूपात करावी. आवश्यक तिथे तपासणी सूचीचा वापरही करावा. त्या बाबी सविस्तर प्रकल्प अहवालामध्येही नोंदवल्या जाव्यात.
त्यातील कोणत्या बाबींसाठी किती निधी वापरला जाणार आहे, हेही नोंदवावी. होणारा निधीचा वापरही नोंदवला जावा. प्रकल्पातील गावाची निवड केल्यानंतर साधारणपणे जून ते मे या कालावधीत गावांमधील होणारे बदल वेगवेगळ्या घटकांच्या आधारे तपासावेत. उदा. पीक पद्धती (खरीप, रब्बी, उन्हाळी, सहामाही बारमाही पिके इ.), पावसाचे प्रमाण, हंगामनिहाय पाण्याची बदलणारी गुणवत्ता, रोगराई, पाण्याची टंचाई असल्यास महिलांना करावी लागणारी वणवण, सण उत्सव, मजुरी (हंगामी/कायमस्वरूपी), उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तींची संख्या, महिला बचत गटाची संख्या, गावातून बाहेर जाणाऱ्या वस्तू / येणाऱ्या वस्तू, आर्थिक उलाढाल, महिला ग्रामसभा, जनावरांची संख्या, प्रक्रिया उद्योग इत्यादी. अशा अनेक गोष्टींची माहिती आपण संख्यात्मक व गुणात्मक पद्धतीने संकलित करू शकतो. शास्त्रशुद्ध संकलनासाठी स्थानिक ग्रामपंचायत, बचत गट, अंगणवाडी, जि. प. शाळा यांच्याकडून माहिती संकलित करता येते.
कोणत्याही विकासात्मक कार्यक्रमासाठी लोकसहभाग मिळवणे आवश्यक असते. लोकांनाच दूर ठेवले गेले, तर त्यांना हे प्रकल्प आपले वाटत नाहीत. त्याचा विपरीत परिणाम प्रकल्पाच्या यशावर होतो. तात्पुरते यश मिळाले तरी लोकसहभागाविना ते टिकत नसल्याने शाश्वत राहत नाही. (शेजारील तक्त्यांप्रमाणे प्रत्येक गावाचे हंगाम निहाय नियतकालिक तयार केल्यास गावामध्ये वर्षभरामध्ये होणाऱ्या घडामोडी लक्षात येतात. त्यानुसार गावातील नैसर्गिक नैसर्गिक साधनसंपत्तीच्या क्षमता व मर्यादा, समस्या व उपाययोजना याबाबत एकत्रित माहिती मिळते. ती आपल्याला पुढील नियोजनासाठी उपयोगी ठरू शकते.)
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे) - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
तडसर, (ता. कडेगाव, जि. सांगली) या गावचे हंगाम नियतकालिक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.