Monsoon Rain : राज्यातील २८ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

Rain Update : राज्यातील धरणांतील पाणीसाठा ७१७.१३ टीएमसी एवढा झाला आहे. त्यामुळे सध्या २८ धरणांतून पाण्याचा विसर्ग नदी, कालव्यांना सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहे.
Gosekhurd Dam
Gosekhurd DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस धुमाकूळ घालत असल्यामुळे धरणांत पाण्याची वेगाने आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत खांड घाटमाथ्यांवर सर्वाधिक ३११ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील धरणांत मागील चोवीस तासांमध्ये नव्याने तब्बल ४०.८३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. राज्यातील धरणांतील पाणीसाठा ७१७.१३ टीएमसी एवढा झाला आहे. त्यामुळे सध्या २८ धरणांतून पाण्याचा विसर्ग नदी, कालव्यांना सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहे.

मध्य महाराष्ट्रात जोर कायम :

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. तर शुक्रवारी (ता. २६) दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पश्चिम पट्यात हलक्या सरी बरसत होत्या. तर घाटमाथ्यांवर पावसाची संततधार सुरूच होती. दहा घाटमाथ्यांवर २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, नगर आणि कोल्हापूर नाशिक भागातील धरणांत वेगाने आवक सुरू आहे.

त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील राधानगरी हे धरण शंभर टक्के भरले. तर कण्हेर, तारळी, कोयना, कासारी, तुळशी, दूधगंगा, पाटगाव या धरणांतील पाणीसाठा ७० टक्केहून अधिक झाला आहे. तर भीमा खोऱ्यातील कळमोडी, खडकवासला, वीर, वडीवळे ही धरणेही जवळपास भरली असून उर्वरित धरणांतील काही धरणांत ८० टक्के पाणीसाठा झाला आहे.

त्यामुळे पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने उजनी धरणांची पाणीपातळी उणेमधून अधिकतेकडे सरकली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांत नव्याने ४४.१५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे ११ धरणांतील पाणीपातळी ही ८० टक्केहून अधिक झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. उर्वरित धरणांतील पाणी पातळी ५० टक्केहून अधिक झाली असून मुठा, पवना, आरळा, भीमा, इंद्रायणी, कानंदी, नीरा, मीना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Gosekhurd Dam
Kolhapur Satara Dam Water : राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला; कोयना, काळम्मावाडी धरणाची जाणून घ्या स्थिती

कोकणात जोरदार :

मागील काही दिवसांपासून कोकणात पडत असलेला पावसाचा जोर अजूनही कायम आहे. अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकणातील नद्या ओसंडून वाहत आहे.

तर काही नद्यांनी पाणीपातळी ओलांडली आहे. कोकणातील सर्वच धरणे ही भरत आली असून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येऊ लागला आहे. तर सततच्या पावसामुळे कोकणात भात रोपांचे नुकसान होत असून दुबार लागवडीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर काही ठिकाणी लवकर लागवड केलेली भात रोपांची वाढ जोमदार आहे.

मराठवाडा, विदर्भात हलक्या सरी :

मराठवाडा आणि विदर्भात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. कासंसूर मंडलात १०३ मिलिमीटर पाऊस पडला. तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या तर बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. कमी झालेल्या पावसामुळे ओढे, नाल्यातील पाण्याची पातळी काहीशी घटली असली तरी धरणांत पाण्याची आवक सुरूच आहे.

त्यातच गोसी खुर्द, इटियाडोह, बाघ शिरपूर, इरई, निम्न वर्धा, बेंबळा या धरणांतील पाणीसाठा बऱ्यापैकी वाढल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोसी खुर्द धरणांतून सर्वाधिक पाण्याचा विसर्ग सोडला आहे. त्यातच होत असलेल्या पावसामुळे पिकांचे काही पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातही ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी अधूनमधून सरी कोसळत आहे.

Gosekhurd Dam
Almatti Dam Water : आलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा, ६० क्युसेक्सने विसर्ग

...या घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस

घाटमाथा --- पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये
खांड --- ३११
दावडी --- ३०७
ताम्हिणी --- २८४
लोणावळा --- २४४
शिरगाव -- २५४
शिरोटा --- २२०
आंबोणे --- २५७
डुंगरवाडी --- २६२
खोपोली -- २२१
भिरा --- २३०

येथे पडला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस : विसरवाडी २६८, कार्ला २१४, नवापूर २२४, नवागाव २०७.

शुक्रवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : ठाणे ८८, मुंब्रा ८८, पनवेल १०२, पवयंजे १३८, मोराबी १३८, कर्जत १२९, नेरळ १२१, कडाव ११३, कळंब ९३, कशेले ११३, चौक १२९, खोपोली ११३, पाली १२३, जांभूळपाडा १३७, महाड ११७, बिरवडी १४५, करंजवडी १३६, नाटे ९४, खारवली ११९, तुडली ९४, पोलादपूर, कोंडवी, वाकण १०४, चिपळूण ११७, मार्गताम्हाणे ९४, रामपूर १०५, सावर्डे, असुर्डे १३०, कळकवणे ९१, दापोली १२७, दाभोळ ९८, वाकवली ११४, पालगड १४१, वेळवी १२७, खेड ११४, शिर्शी १०८, आंबवली, कुळवंडी १०३, भरणे १३५, दाभीळ १०८, मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे ९९.८, रत्नागिरी १७५, खेडशी १३२, फसोप १७५, कोतवडे, मालगुंड १०८, तरवल १४४, पाली १५३, कडवी १०१, माखजन ९३, फणसवणे १०१, आंगवली, कोंडगाव १३०, देवळे १३४, देवरुख, तुळसानी १६१, तेर्ये १०१, सौंदळ १११, पाचल १००, लांजा, भांबेड १२८, पुनस १४२, विलवडे १२८, कांचगड ९०, मनवर ९०, खोडला १४६.

मध्य महाराष्ट्र : सुरगाणा १३२, उंबरठाणा १३२, कोहोर, करंजाळी ८६, दहादेवडी १४६, चिंचपाडा १९६, खांडबारा १६१, पौड, घोटावडे, माले, मुठे १११, निगुडघर १३७, वडगाव मावळ, तळेगाव १०५, काले १११, खडकाळा १०९, लोणावळा १५३, शिवणे १०९, वेल्हा १२३, पानशेत १४४, विंझर ९९, वाडा, कुडे ९२, पाईट १०५, आंबेगाव ९४, परळी १२२, मेढा ९८, बामणोली ११४, केळघर १४७, करहर १००, पसरणी ९८, महाबळेश्‍वर १९३, तापोळा १२३, लामज १७६, कोकरूड ९५, शिराळा ९२, मांगले १०५, सागाव ८५, चरण ११८, कोडोली १०५, बाजार ११९, करंजफेन ९६, सरूड ९४, मलकापूर १८३, आंबा १९१, राधानगरी १३४, कसबा १३४, सांगरूळ १३२, इस्पूर्ली ९४.

विदर्भ : येवळी ४२, ब्राह्मणी ४५, घोट ५२, अहेरी ५६, आलापल्ली ५१, पेरमिली ५२, एटापल्ली ७२, कासंसूर १०३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com