
Jalna News : जालना जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळखल्या जात असलेल्या कडवंची परिसरातील द्राक्ष बागायतदारांसमोर यंदा बागा जगविण्यासाठी पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्थिती अनुकूल असली, तरी पाण्याअभावी यंदा अनेकांनी बागा सोडून देणेच पसंत केल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील कडवंची नंदापूर धारकल्याण पीरकल्याण आदी दहा ते बारा गावांत कमी-अधिक प्रमाणात द्राक्ष शेती गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. कडवंचीने तर शेततळ्याच्या पाण्यावर द्राक्ष शेतीचे मॉडेलच उभे केले. परंतु यंदा हवामान अनुकूल असले, तरी एकूण बागांपैकी ५० टक्केच बागा उत्पादन देतील अशी स्थिती असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
नंदापूर गावशिवारात सुमारे साडेतीनशे ते साडेचारशे एकर द्राक्ष बागा होत्या. तिथे यंदा मुश्किलीने ९० एकर बागाच शिल्लक असल्याची माहिती माजी सरपंच दत्तू चव्हाण यांनी दिली. त्यातही यंदाचा हंगाम कसाबसा काढून २५ ते ३० टक्के बागा त्यामधूनही कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. गतवर्षीच्या पावसाळ्यात आमच्या नंदापूर शिवारात ३५० मिलिमीटर पाऊस झाला होता.
यंदा पडलेला पाऊस ३७६ मिलिमीटर इतका असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. कडवंचीचे माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर म्हणाले, की विदर्भातील बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या भागापासून बदनापूरपर्यंत सुमारे पन्नासएक गावांत यंदा संपूर्ण पावसाळ्यात पाऊसच कमी पडला. परंतु जालना जिल्ह्यात काही भागांत झालेल्या जोरदार पावसाने आमच्याकडील कमी पावसाचा विषय दबला गेला.
‘कुज’चे संकट
यंदा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत शेतकऱ्यांनी छाटण्या केल्या. मध्यंतरी अवेळी आलेल्या थोड्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे घड कुजचे संकट आल्याचे कडवंची येथील द्राक्ष उत्पादक रवींद्र क्षीरसागर म्हणाले. वीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांना शेततळ्यात पाणी घेता आल्याचे ते म्हणाले. कडवंची परिसरातील काही बागा फुलोऱ्यात, काही पाणी उतरण्याच्या स्थितीत, काही नुकत्याच फुटण्याच्या स्थितीत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.