डॉ. मुकुंद शिंदेWatershed Development: महाराष्ट्रात अंदाजे २० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. उरलेल्या ८० टक्के जिरायती क्षेत्रातील पीक उत्पादनाचे यशापयश हे पूर्णतः पावसावर अवलंबून असते. अशा ठिकाणी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सिंचनासाठी ठिबक सिंचन हे तंत्रज्ञान वरदान ठरते. मूलस्थानी जलसंधारण तसेच शेततळे तयार करून गावातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागतो. थेंबे थेंबे तळे साचे आणि या साचलेल्या तळ्यातून ठिबकद्वारे पाणी देणे या तत्त्वावर काम करावे लागते. गावाचा कायापालट करण्याची ताकद या तंत्रज्ञानामध्ये आहे हे राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, मेंढवन आणि इतरही अनेक गावांनी पाणलोट क्षेत्र विकासातून दाखवून दिलेले आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यामध्ये तज्ज्ञ म्हणून कृषी अभियंत्यांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे. .कारण कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये या दोन्ही विषयांचा सुंदर मिलाप झालेला दिसतो. राहुरीच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मृद् व जलसंधारण अभियांत्रिकी आणि सिंचन व निचरा अभियांत्रिकी असे दोन विभाग मिळून पंधरा-वीस विषय विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. त्याच्यात ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि प्रोजेक्टची भर पडली तर मुलगा महाविद्यालयामधून बाहेर पडताना रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ठिबक सिंचनामध्ये बऱ्यापैकी तज्ज्ञ होतो. सहाजिकच या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची बीजे मुलांच्या मनात कॉलेजमध्येच रोवली जातात. यातीलच एक मुलगा म्हणजे संदीप जाधव.सांगली जिल्ह्यातील आलसुंड गावी १९७२ च्या दुष्काळात जन्मलेला संदीप. याला आयुष्यातील सुरुवातीचे धडे पुस्तकातून नाही, तर सार्वजनिक विहिरीतून मिळाले..Water Conservation: जलसंधारण विभागाची कामे मुदतीत पूर्ण करा.वडिलांसोबत पाण्याची भांडी वाहून नेताना कधी रात्री दोन वाजता विहिरीच्या तळाशी बसून लहानशा कपाने भांडी भरली. रोजगार हमी योजनेअंतर्गत ६० रुपयांची पहिली मजुरी मिळविण्यासाठी तो काका सोबत कामाला लागला. गावातील ओढ्यात बंधारा बांधण्यासाठी त्याच्या वडिलांनी खिशातून बाराशे रुपये देताना त्याने पाहिले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी विटा गाठले. उन्हाळ्याच्या सुट्टीत, जेव्हा इतर लोक आराम करत, तेव्हा तो म्हशींना चरायला नेत आणि शेतातील कामाच्या ओघात अवजड बैलांसोबत काम करत असे. संदीप बारावीला केंद्रात पहिला आला आणि अठरा वर्षे जे गाव त्याचे विश्व होते ते आता त्याला अपुरे पडू लागले. त्याच्या आईचे स्वप्न होते मुलाने डॉक्टर व्हावे, परंतु संदीपने राहुरीच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकला प्रवेश घेतला. कदाचित स्वतःच्या मातेच्या स्वप्नापेक्षा धरती मातेच्या स्वप्नाची पूर्ती करण्याच्या प्रवासाची ती सुरुवात असावी..१९९३ मध्ये विद्यापीठात विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जलसंधारण आणि वनीकरण क्षेत्रातील दिग्गज अण्णा हजारे आणि मोहन धारिया होते. त्यांच्या भाषणातून संदीप आणि बीटेकची काही मुले खूपच प्रभावित झाली. कार्यक्रम झाल्यानंतर ही मुले पाहुण्यांना भेटण्यासाठी व्हीआयपी गेस्ट हाउसला गेली. त्यांच्यासोबत चर्चा केली आणि ठरवले जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासामध्ये करिअर करायचे आणि राज्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवायचा. स्नेहसंमेलनातील प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून प्रभावित होऊन विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरण्याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे..Water Conservation: पाण्याचा थेंब न् थेंब वाचवा : जिल्हाधिकारी पुजार.राज्यातील ९२ च्या दुष्काळात मृद् व जलसंधारण विभागाची निर्मिती झाली. हा धोरणात्मक बदल संदीपच्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात एका महत्त्वाच्या वळणावर जुळून आला आणि वार्षिक स्नेहसंमेलनातील पाहुण्यांनी त्याच्या मनातील धग धग पेटवण्याचे काम केले. १९९३ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर लगेचच, तो इंडो-जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमात सामील झाला. तिथे त्याची भेट फादर बाखर यांच्याशी झाली, जे ५० वर्षांपासून ग्रामीण भारताच्या सेवेसाठी समर्पित असलेले एक महान व्यक्तिमत्त्व होते. पाणलोट विकास हेच त्यांचे ध्येय बनले. त्याला कल्पनाही नव्हती, की ही तर फक्त सुरुवात होती. नियतीची चाके फिरू लागली होती, त्याला त्याच गोष्टींकडे खेचत होती ज्यांची त्याने नेहमी स्वप्ने पाहिली होती..संदीपने मागील तीस वर्षात महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड राज्यांमध्ये शेकडो गावे टँकर मुक्त केली. तसेच आफ्रिकेतील टांझानिया, सोमालिया, केनिया, मलावी येथील देशात जलसंधारणाची कामे केली. अमीर खान यांनी ज्या वेळेस पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ राज्यात उभी करण्याचे ठरवले त्या वेळेस अमीर खान आणि त्याच्या टीमला जलसंधारणाचे धडे संदीपने दिले. .मृद् व जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन यातील ज्ञान आणि कौशल्यामुळे देशातील सर्व स्वयंसेवी संस्थांचे पाणलोट क्षेत्र विकासासाठी कृषी अभियंते ही निश्चितच पहिली पसंती आहे. १९७२ च्या दुष्काळात जन्मलेला संदीप आज देशात आणि परदेशात जलसंधारणामध्ये एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे.- डॉ. मुकुंद शिंदे, ९४०३६०५९७९(माजी विभाग प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि संचालक एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, नाशिक).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.