Waqf Board : कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचा इशारा

farmers' land in Karnataka : सध्या वक्फ बोर्ड प्रकरण चांगलेच गाजत असून यावर संसद समिती निर्णय घेत आहे. याचदरम्यान कर्नाटकात वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा केल्याचं प्रकरण समोर आले आहे. यावरून शेतकऱ्यांनी आंदोलन करत आत्महत्येचा इशारा दिला आहे.
Waqf Board
Waqf BoardAgrowon
Published on
Updated on

Pune News : वक्फ बोर्ड प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले असून वक्फ बोर्डमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ बोर्ड विधेयक ८ ऑगस्ट २०२४ संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले आहे. सध्या यावर बैठका सुरू आहेत. याचदरम्यान कर्नाटकातील विजयपुरा येथील शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचं नवं प्रकरण समोर आले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून शेतकऱ्यांनी आंदोलन करत आत्महत्येचा इशारा दिला आहे.

याबाबत द न्यू इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, कर्नाटकातील विजयपुरा येथील शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डाने याबाबत शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. यानंतर राज्य पातळीपासून केंद्रापर्यंत राजकीय खळबळ उडाली आहे. विजयपुरा जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील होनवाडा गावातील १२०० एकर जमिनीवर शाह अमिनोद्दीन दर्ग्याने आपला हक्क सांगितला आहे. यानंतर स्थानिक तहसीलदार यांनी जमीन मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवली असून याबाबत उत्तर देण्याचे आवाहन केले होते. यानंतर गावातील शेतकऱ्यांनी याबाबत स्थानिक आमदार आणि काँग्रेस सरकारमधील मंत्री एम.बी.पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. तर "कोणत्याही शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन वक्फ बोर्डला मालमत्ता म्हणून दिली जाणार नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (ता.२६) दिले आहे.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, १२०० एकर पैकी फक्त ११ एकर ही वक्फची मालमत्ता आहे. यामध्ये १० एकर आणि १४ गुंठे पसरलेल्या दफनभूमीचा समावेश आहे. उर्वरित २४ गुंठ्यांवर ईदगाह, मशीद आणि इतर संरचना आहेत. स्थानिक तहसीलदार आणि जिल्हा आयुक्तांनी पुष्टी केल्यानुसार इतर सर्व जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. याबाबत वक्फने १९७४, १९७८ आणि २०१६ मध्ये राजपत्र अधिसूचना जारी केली आहे.

Waqf Board
Waqf Institutions : वक्फ संस्थांचाही अर्थसंकल्प सादर होणार

शाह अमिनोद्दीन दर्ग्याशी निगडित जमिनीशी हे प्रकरण आहे. तर सर्व जमीन दर्ग्याला देण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तहसीलदारांनी नोटीस पाठवून जुन्या सरकारी नोंदींचा दाखला देत या जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे गृहनिर्माण, वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण विभागाचे मंत्री जमीर अहमद खान यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच वक्फ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत वक्फ जमिनीवरील 'अतिक्रमण'वर चर्चा झाली. या चर्चेनंतरच अधिकाऱ्यांनी १२०० एकर संदर्भातील शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या.

तसेच या नोटीसमध्ये सदर जमीन शाह अमिनोद्दीन दर्ग्याच्या मालकीची असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आम्ही पिढ्यानपिढ्या या जमिनींचे मालक आहोत. तर हा दर्गा शतकोत्तर जुना नाही. सुमारे ४१ शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या असून त्यांना मालकी हक्काची कागदपत्रे देण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस १९७४ च्या राजपत्रातील घोषणेवर आधारित असल्याचा वक्फ बोर्डाचा दावा आहे.

Waqf Board
इनाम, वक्फ बोर्डाच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा ः किसान सभा

हा वाद उफाळल्यानंतर मंत्री एम.बी.पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याचबरोबर वक्फ बोर्डाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, ही जमीन राज्य सरकारने वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली आहे आणि ती राजपत्रित करण्यात आली होती. मात्र, काही शेतकऱ्यांना चुकून नोटिसा पाठवण्यात आल्या. पण, जर शेतकऱ्यांकडे जमिनीच्या वैध नोंदी असतील तर त्या जमिनीशी आमचा काहाही संबंध नाही. त्या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्याच राहतील. त्यात कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

यावरून भाजपने काँग्रेस सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. एका विशिष्ट धर्माला खूश करण्यासाठी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला देण्याचा घाट घालत असल्याचा आरोप भाजप नेते तथा खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे. मात्र यावरून काँग्रेसने उत्तर देताना, या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासवृन मंत्री पाटील यांनी आधिच दिल्याचे म्हटले आहे. याचप्रश्नावरून शेतकऱ्यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचीही भेट घेतली होती.

आम्ही आत्महत्या करू : शेतकऱ्यांचा इशारा

दरम्यान या नोटीसनंतर शेतकरी तणावाखाली आले असून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. होनवाडा येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या रक्षणासाठी लढण्याची तयारी दाखवली आहे. तर न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. तर शेतकरी प्रभू गौडा यांनी सरकार शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप केला आहे.

वक्फ बोर्ड शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारसोबत कट रचत आहे. बोर्डाने आधीच ४, १० आणि ५ एकर जमीन बळकावली आहे. आता १२०० एकर जमीन ताब्यात घेण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही. हा अन्याय शेतकरी सहन करू शकत नाहीत. आता शेतकऱ्यांची एक इंचही जमीन हिसकावून घेतली, तर आम्ही सर्वजण जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर आत्महत्या करू असा इशारा ४१ नोटीसधारक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com