हवामानाचा अंदाजClimate Change Impact: मागील काही दिवसांत देशाच्या बहुतांश सर्व भागांत पाऊस पडल्याची नोंद झाली. फक्त राजस्थानचा दक्षिणी भाग, गुजरात व महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पाऊस झाला नाही. जिथे पाऊस झाला, तिथे तापमान थोडे खालावले. उष्णतेच्या लाटेपासून थोडा बचाव झाला. सर्व द्राक्ष विभागांमध्ये पाऊस जरी झाला नसला तरी तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले होते. उद्या शुक्रवार (ता. ८) नंतर वातावरण बदलण्याचे व काही द्राक्ष विभागात हलक्या पावसाचे संकेत काही मॉडेल्सनी दिले होते. .मात्र मागील काही दिवसांत वातावरणात झालेल्या बदलामुळे आता महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात येत्या आठवड्यात पावसाची फारशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांतच सर्वच द्राक्ष विभागांतील तापमान पुन्हा ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता दिसते. असे तापमान वाढलेल्या ठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण बदलून हलका पाऊस होण्याची शक्यताही बऱ्याच ठिकाणी असेल. असा हलका पाऊस गुरुवार- शुक्रवार (ता. ७ - ८) सोलापूर, धाराशिव, बार्शी, पंढरपूर व तासगावच्या आजूबाजूस होण्याची शक्यता आहे. .Grape Orchard Management: वातावरणानुसार द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना.शनिवारी (ता. ९) बारामती, फलटण भागांत हलक्या पावसाची शक्यता दिसते. असा पाऊस झालाच तर त्या भागातील तापमान ४० अंशांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या ओझर व आजूबाजूच्या परिसरात पूर्वी अशा पावसाची शक्यता सांगितली होती. मात्र आता पाऊस न होता शुक्रवार- शनिवारी (ता. ८ - ९) अधूनमधून फक्त ढगाळ वातावरण राहू शकते..पुढील आठवड्यात बुधवार ते सोमवार (ता. १३ ते १८) या काळात पुन्हा महाराष्ट्रात विशेषतः सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाचे वातावरण होण्याची शक्यता काही मॉडेल्स दाखवत आहेत. या वेळीही सुरुवातीला नाशिक भागात एक दिवस हलक्या पावसाची शक्यता असून, पुढील काही दिवस सांगली, सोलापूर व पुणे परिसरातील बऱ्याच भागात पावसाची शक्यता दर्शवली जात आहे..करपा, केवडा रोगाची शक्यता नाहीसध्याच्या परिस्थितीत मोठ्या पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान ४० अंश किंवा त्याहूनही जास्त व सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही, अशा वातावरणात द्राक्ष पिकावरील कोणताही रोग कार्यरत नसतो. त्या अर्थी सध्या रोग नियंत्रणासाठी फवारणीची फारशी आवश्यकता नाही. परंतु १०-११ तारखेनंतर वातावरणात वेगाने बदल अपेक्षित आहेत. दुपारचे तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहिले तरी सूर्यास्तानंतर तापमान वेगाने कमी होऊ शकते..त्याला समुद्रावरून बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांची जोड मिळू शकते. वातावरणाची माहिती दर्शविणाऱ्या अंदाजाच्या नकाशावर पाहिल्यास ११ तारखेनंतर रात्रीची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत वाढताना दिसते. रात्रीचे तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान बराच काळ राहणार असल्याचे दिसते. या वातावरणात जिवाणूजन्य करपा रोग पानांवर येऊ शकतो. १३ तारखेनंतर खरोखर पाऊस झाल्यास तापमान अजून खाली जाऊन सापेक्ष आर्द्रता अजून वाढेल. पावसाने किंवा सकाळचे दव पडल्याने कॅनॉपी ओली झाल्याच्या परिस्थितीमध्ये बुरशीजन्य करपासुद्धा वाढू शकतो. .Grape Orchard Management : नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची पूर्वतयारी.हे अंदाज असले तरी आपल्या छाटलेल्या बागेत ही स्थिती आहे का, हे पाहण्यासाठी संध्याकाळी ८ वाजल्यानंतर फिरून खात्री करून घ्यावी. कारण सकाळी ९ वाजल्यानंतर तापमान वेगाने वाढून काही वेळेतच ते ४० अंशाची पातळी गाठते व सापेक्ष आर्द्रताही २५ टक्क्यांपर्यंत खाली जाते. बागेत वातावरण करपा रोगास पोषक असले तरच प्रतिबंधात्मक फवारणी घेणे फायद्याचे होऊ शकते. छाटणी झालेल्या सर्वच बागांमध्ये सध्या कोवळी व वाढत्या वयातील पाने आहेत. अशा पानांवर ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी टाळावी, असे या पूर्वीच्या लेखातून मी सुचविले होते. कारण सबकेन तयार होण्याआधी ताम्रयुक्त बुरशीनाशक काडीत तयार होणाऱ्या घडाला धोकादायक होऊ शकते. त्या ऐवजी या परिस्थितीत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिडचे फॉर्म्यूलेशन २ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास बागेतील जिवाणूजन्य व बुरशीजन्य करपा रोगाचा धोका कमी होईल..सध्या केवडा रोगाचा धोका अजिबात नाही. परंतु पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड फवारल्यास पानांची केवडा रोगाच्या विरुद्ध आंतरिक प्रतिकारशक्ती वाढून ती दीर्घकाळ राहते. पुढे पाऊस लवकर व जास्त झाल्यास केवडा रोगाचा धोका वाढू शकतो. मात्र पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड फवारलेल्या बागेत केवडा रोग लवकर येत नाही..सबकेन व त्यानंतरच्या बागांसाठी...बागेमध्ये सबकेन करण्यासाठी पहिली पिंचिंग झालेली आहे. त्यानंतर अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे ८ -९ तारखेस हलका पाऊस झाला तर पावसाच्या पाण्यामुळे जमीन भिजल्यास वेलींना पाण्याचा ताण देणे शक्य होणार नाही. त्यामुळे घड निर्मितीला अडथळा होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आजपासूनच बागेत पाणी कमी केल्यास पावसाच्या पाण्याने जमीन जास्त ओली होणार नाही. मात्र दुदैवाने जास्त पाऊस होऊन बाग जास्त ओली झाल्यास घड निर्मितीमध्ये अडथळा होईल..पाऊस हलका झाल्यास एक- दोन दिवसांत हलका पाण्याचा ताण देणे शक्य होईल. त्याच बरोबर सध्याचे उष्ण तापमान आणि उपलब्ध असलेला भरपूर सूर्यप्रकाश घड बनण्याच्या प्रक्रियेला मदतच करेल. बरेच शेतकरी या उष्ण तापमानाबाबत अनेक शंका व्यक्त करताना दिसत आहेत. उदा. सध्याचे उष्ण तापमान घड निर्मितीच्या प्रक्रियेला अडथळा करेल का? तर या पूर्वी सोलापूर भागातील बागांमध्ये ४० अंशांपेक्षाही अधिक तापमानात चांगले घड मिळाल्याचे आम्ही पाहिले आहे. .त्या अनुभवावरून तरी सध्याचे तापमान घडनिर्मितीला धोकादायक आहे असे म्हणता येणार नाही. तापमान फारच वाढले तर कोवळ्या पानांना व काड्यांना कायटोटोसॅन अथवा सिलिसिलिक ॲसिड फवारून सुरक्षित करता येईल. परंतु सध्या त्याची जरुरी वाटत नाही. सबकेन करण्याची प्रक्रिया ज्या बागेत अजून सुरू झालेली नाही, त्यांनी १८ मेपर्यंत थांबणे शक्य आहे का, याचा विचार करावा. घड निर्मितीसाठी पहिला शेंडा मारल्यानंतर सर्वसाधारणपणे १० ते १५ दिवस पाऊस विरहित असावेत. हे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार अशी स्थिती १८ तारखेनंतर तो मिळेल असे वाटते..मागील वर्षी पूर्वमॉन्सून पाऊस जास्त झाला व त्या पाठोपाठ मॉन्सून लवकर सुरू झाला. त्यामुळे सबकेन तयार होण्याच्या काळात अत्यावश्यक असलेला पाण्याचा ताण बागेतील जमीन ओली राहिल्यामुळे देणे शक्य झाले नव्हते. परिणामी, बऱ्याच बागा फेल गेल्या. या वर्षी सबकेन बनविण्याच्या वेळेस पाऊस आल्यास काय काळजी घेता येईल, यावर आपण सातत्याने चर्चा करत आहोत. येथे सांगितलेले विचार हे फक्त थॉमसन सीडलेस, शरद सीडलेस आणि त्यापासूनच्या म्युटेशन्समधून तयार झालेल्या वाणांना लागू पडतील. त्यामुळे त्याकडे शिफारस न पाहता बागेमध्ये घडनिर्मिती नक्की करण्यासाठी कोणती रणनीती अवलंबायची, यासाठी आधारभूत म्हणून पाहता येईल. त्याला आपल्या स्वतःच्या अनुभवाची जोड देऊन योग्य रणनीती राबविता येईल..पाण्याचा काटेकोर वापर आवश्यकसंपूर्ण भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील मोठ्या धरणातील आजचा पाण्याचा साठा मे महिन्यातील मागील काही वर्षाच्या सरासरी साठ्यापेक्षा २५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याची बातमी आली आहे. या वर्षी एल निनो च्या पार्श्वभूमीवर मॉन्सूनचा पाऊस सरासरीच्या फक्त ९२ टक्के होणार, भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे. .याचा विचार करता द्राक्ष बागायतदारांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने जरुरीइतकाच व विचारपूर्वक वापर करावा. पाण्याचा काटेकोर व हवामानानुसार वापर करण्यासाठी सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या आयओटी सेन्सरआधारित प्रणाली उपलब्ध आहेत. ज्यांना शक्य आहे, त्यांनी त्याचा जरूर वापर करावा, असे वाटते.- डॉ. एस. डी. सावंत ९३७१००८६४९ (लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे निवृत्त संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.