Organic Farming : सेंद्रिय शेतीसाठी ‘तिचा’ ध्यास

सरकारी नोकरी सोडून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पासाठी वाटचाल
Organic Farming
Organic FarmingAgrowon

श्रद्धा चमके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः अतिशय बिकट परिस्थितीतही तिने मेरिटवर नर्सिंगची पदवी घेतली, मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळाली. पण मन नोकरीत रमत नव्हते. टाटा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटलसारख्या ठिकाणी नोकरी करीत असताना रासायनिक खतांमुळे (Chemical Fertilizers) लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर सेंद्रिय शेतीशी निगडित काही करावे असा निश्‍चय केला.

त्यातूनच तिला गांडूळ खतनिर्मिती (Vermicompost) प्रकल्पाची कल्पना सुचली. आणि मग सुरू झाला त्या दिशेने प्रवास. अनेक चढ-उतार आले. नोकरीदेखील सुटली. मात्र अवघ्या सहा-सात महिन्यांतच एक मनासारखा प्रकल्प उभा राहिला.

अवघ्या सहा ते सात महिन्यांतच तिचे वार्षिक उत्पन्न ३५ लाखांपर्यंत गेले आहे. स्वतःच्या व्यवसायाबरोबरच २८-२९ वर्षांची ही तरुणी आज इतरांना गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाचे प्रशिक्षणही देत आहे. कविता रामदास ढोबळे (लग्नानंतर काव्या राजेश दातखिळे) यांनी जून २०२२ मध्ये ‘कृषिकाव्या गांडूळ खत प्रकल्पा’ची निर्मिती केली.

मुंबईसारख्या शहरात ७० ते ८० हजारांची सरकारी नोकरी असताना, साचेबद्ध जीवन जगणे कविता यांना फारसे रुचले नाही.

शेतीशी निगडित काही तरी व्यवसाय सुरू करायचा म्हणून एकदा फिश फार्मिंगचा व्हिडिओ स्वतःच्या यू-ट्यूब चॅनेलवर टाकला आणि काही मिनिटांतच त्याला २१ हजार लाइक्स मिळाले.

Organic Farming
Organic Farming : सहकारी सोसायटी देईल सेंद्रिय शेतीला चालना

सोशल मीडियासारख्या या प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचे ठरवले. मग शेतीशी निगडित कोणता व्यवसाय करता येईल जो सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देणारा असेल असा विचार तिने केला. यातूनच कविता यांना गांडूळ खत निर्मितीची कल्पना सुचली.

त्यादृष्टीने कविता यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. पती राजेश दातखिळे यांनीही यासाठी प्रोत्साहन दिले. कविता यांनी जुन्नर तालुक्यातील दातखिळेवाडी येथे आपल्या सासरी हा व्यवसाय सुरू करायचे ठरवले.


सुरुवातीला अत्यंत कमी बजेटमध्ये गांडूळ खत प्रकल्पाला सुरुवात केली.

या वेळी नोकरी आणि व्यवसायाची नवी सुरुवात याचा मेळ घालताना अनेक अडचणी आल्या. नोकरीच्या ठिकाणी खूप सुट्ट्या झाल्या. त्यामुळे हॉस्पिटलने नोकरीवरून कमी केले; मात्र त्या परिस्थितीतही न डगमगता कविता यांनी या व्यवसायासाठी स्वतःला झोकून दिले.

कमी बजेटमध्ये सुरू केलेला व्यवसाय हळूहळू पाच गुंठे जमिनीवर शेड उभारून दहा बेडवर सुरू झाला. पहिल्यांदा पाच टन माल तयार झाला; मात्र तो घेण्यासाठी एकही शेतकरी तयार होत नव्हता. त्या वेळेस कविता यांनी स्वतःच्या यू-ट्यूब चॅनेलवरून गांडूळ खत प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ अपलोड केला आणि दुसऱ्या दिवशी पाच टन खताचा माल एका शेतकऱ्याने विकत घेतला.

त्यामुळे आपण कितीही माल तयार केला तरी तो विकू शकतो, असा आत्मविश्‍वास कविता यांना आला. त्यानंतर एका ट्रस्टमार्फत त्यांना तीन लाखांची एक मोठी ऑर्डर मिळाली. या ट्रस्टशी ७०० शेतकरी जोडले गेले असल्यामुळे कविता यांच्या प्रकल्पाची माहिती सर्वत्र झाली.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतीच्या अभ्यासासाठी संशोधक सिद्धगिरीत येतील

आज दातखिळेवाडी येथे पाच गुंठे जमिनीवर १६ बेड, तर जुन्नर शहरालगत एक एकर जमिनीवर दहा बेडवर काव्या गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरू आहे.

या कामात पती राजेश दातखिळे हेदेखील पूर्णवेळ मदत करतात. इंजिनिअर असतानाही वाढत्या व्यापामुळे त्यांनीही नोकरी सोडली आणि आज ते यासाठी पूर्णवेळ काम करतात.

या गांडूळ खत प्रकल्पाशिवाय व्यावसायिक दृष्टिकोनातून त्या युवकांना गांडूळ खत प्रकल्पाचे प्रशिक्षणही देतात. खत, कल्चर आणि व्हर्मिवॉश त्या शेतकऱ्यांना पुरवतात.

सहा ते सात महिन्यांतच त्यांचे मासिक उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत गेल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.गरिबीमुळे मी रात्रशाळेत शिकले. आई-वडिलांना मदत म्हणून आम्ही चारही बहिणी दिवसा काम करायचो. लग्न झाल्यावर माझ्या पतीने तुला जो व्यवसाय आवडेल तो कर असे सांगितले. यामुळे मला एक प्रकारे बळ मिळाले.

सरकारी नोकरी सोडून मी जेव्हा या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हाही माझे सासू-सासरे माझ्या पाठीशी होते. त्यांच्यामुळे आज मी इथवर पोहोचू शकले.

ध्येय उराशी बाळगले की स्वप्न पूर्ण होतात, हेच मला सर्व महिलांना सांगायचे आहे.
- कविता ढोबळे-दातखिळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com