
डॉ. विशाल गमे
गांडूळखताची निर्मिती करताना जागेची निवड, शेड, वाफे किंवा खड्ड्यांमध्ये योग्यपणे थर भरणे महत्त्वाचे ठरते. गांडूळखत तयार करण्यासाठी जागा निवडताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. गांडूळखत तयार करण्यासाठी योग्य पद्धतीने वाफे तयार करणे गरजेचे आहे. वाफा तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे.
१) गांडूळखत तयार करण्याची जागा पाण्याचा निचरा होणारी असावी. जवळ मोठी झाडे असू नयेत. गांडूळखत निर्मितीसाठी साधारणतः १० फूट लांब, ४ फूट रुंदीचा वाफा असावा. दोन वाफ्यामध्ये दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता ठेवावा. गांडूळ निर्मितीसाठी ८ ते ९ सेंमी उंच किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांनी भरावा.
त्यावर पाणी मारावे. दुसरा थर ५ ते ६ सेंमी जाडीचा चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडुळांना खाद्य म्हणून उपयोगी ठरते. या थरावर गांडूळ सोडावीत. गोमूत्र मिश्रीत पाणी शिंपडावे म्हणजे ओलावा टिकून राहील.
२) त्यानंतर शेण व लहान तुकडे केलेल्या काडीकचऱ्याचा १ फूट जाडीचा थर द्यावा. पुन्हा पाच इंच कचऱ्याचा थर द्यावा. ओले पोते किंवा गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे. त्याप्रमाणे या थरांमध्ये घरातील कचरा सांडपाणी तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुध्दा वापरता येतो.
३) शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रिय खत यांचे मिळून गांडूळखत करता येते. गांडूळ खत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतीने करता येते. अशा प्रकारे वाफा भरल्यास साधारण २ ते ३ महिन्यात उत्तम दर्जाचे गांडूळखत तयार होऊ शकते.
४) गांडूळखत तयार झाल्यावर हाताला भुसभुशीत व हलके लागते. गांडूळखत तयार झाल्याचे दिसून आल्यावर दोन दिवस पाणी मारणे बंद ठेवावे. वरचा थर कोरडा झाल्यावर गांडूळे खाली जातात. त्यानंतर उघड्या जागेवर गांडूळखताचे हलक्या हाताने ढीग करावे. उन्हामुळे गांडूळे तळाशी गेल्यावर गांडूळे व गांडूळखत वेगळे करता येतील. शक्यतो गांडूळखत वेगळे करताना कुदळी, फावडे, खुरपे यांचा वापर करू नये. जेणेकरून गांडुळांना इजा पोहोचणार नाही.
महत्त्वाचे मुद्दे ः
- गांडूळखत तयार करण्यासाठी योग्य जागेची निवड करावी.
- एका चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
- उंदीर, घूस, मुंग्या, बेडूक, गोम इत्यादी पासून गांडुळांचे रक्षण करावे.
- गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
- गांडूळे हाताळताना त्यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.
फायदे ः
- जमिनीची सुपीकता वाढते. पाणी धरून राहण्याची क्षमता सुधारते.
- गांडूळखतामध्ये साधारणतः २.५ ते ३ टक्के नत्र, १.५ ते २ टक्के स्फुरद व १.५ ते २ टक्के पालाश असतो. गांडूळ खतामधून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. जमिनीचा सामू उदासीन राखला जाऊ शकतो.
- पिकाची जोमदार व निरोगी वाढ होते. जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होऊन पिकांना मुख्य अन्नद्रव्यांचा त्वरित पुरवठा होतो. रासायनिक खतांचा वापर कमी होतो.
- गांडूळखतामुळे पिकाच्या उत्पन्न वाढीसोबतच, मालाची प्रत सुधारते तसेच बाजारभावही चांगला मिळू शकतो.
- डॉ. विशाल गमे,९४०३९२९६१७
(सहाय्यक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग,कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.