
Ratnagiri News : कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करीत असणाऱ्या प्रत्येकाला दापोली कृषी विद्यापीठ व तुम्हा सर्वांची साथ मिळावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी चिपळूण येथे व्यक्त केली. वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
वाशिष्ठी डेअरीतर्फे चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात ‘कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन, कृषी महोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले.
त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव अतिशय आनंददायी असून शेतकऱ्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न होत आहे. पशुसंवर्धन व दुग्ध क्षेत्रात ते जे काम करीत आहेत, ती एक प्रकारची क्रांती आहे. आपण केंद्रीय कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी देशात धान्य आयात करावे लागत होते.
मात्र, नंतर देशातील शेती फायदेशीर कशी होईल, या दृष्टिने धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामध्ये कृषी क्षेत्रात आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करून शेतकऱ्यांचे हित जोपासून देश कृषी क्षेत्रात अग्रेसर राहील, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामुळे भारत देश तांदूळ उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला. कालांतराने भारत देश धान्य निर्यातीत १८ व्या क्रमांकाचा बनला’’
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार भास्कर जाधव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे नेते बशीर मूर्तुझा, सत्यजित पाटणकर, विक्रांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक बबन कनावजे आदी उपस्थित होते.
कोकणात मत्स्य, कृषी, पशु, दुग्ध क्षेत्रात मोठी संधी
शरद पवार म्हणाले, ‘‘कृषी महोत्सवासाठी मोठी जागा घेऊन स्टॉलच्या बाजूला नवीन भात बी-बियाण्यांच्या जातीची पेरणी करून ते पीक कसे येते, याची माहिती दिली तर शेतकरी अधिक जोमाने कृषी क्षेत्रात काम करेल. कोकणात मत्स्य, कृषी, पशु, दुग्ध क्षेत्रात मोठी संधी आहे. कोकणचा चेहरामोहरा बदलतोय तो आणखी बदलेल आणि कोकणचा भाग संपन्न होईल. या भागाचा नावलौकिक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.