Vasantlal M. Shah and Company : वसंतलाल एम. शहा ॲण्ड कंपनी कृषिक्रांतीमधील साडेसहा दशकांचा अग्रदूत !

Agricultural Input Manufacturing Company : सांगलीतील वखारभागातील हायस्कूल रस्त्यावरील कृषी निविष्ठा विक्रेते ते प्रतिक इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शेती निविष्ठा उत्पादक कंपनी, असा वसंतलाल एम. शहा ॲण्ड कंपनीचा साडेसहा दशकांचा प्रवास आहे.
Vasantlal M. Shah and Company
Vasantlal M. Shah and CompanyAgrowon

Agricultural Input : सांगलीतील वखारभागातील हायस्कूल रस्त्यावरील कृषी निविष्ठा विक्रेते ते प्रतिक इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शेती निविष्ठा उत्पादक कंपनी, असा वसंतलाल एम. शहा ॲण्ड कंपनीचा साडेसहा दशकांचा प्रवास आहे. देशभरात शेकडो वितरकांच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांपर्यंत हा व्याप विस्तारला आहे. देशाच्या मर्यादा ओलांडून हा प्रवास आता आखाती, आफ्रिकन, युरोपियन देशांसह ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचला आहे.

व्यापारी-उद्योजक कुटुंब घडण्याच्या प्रेरणा पिढ्यान् पिढ्या पुढे जातात कशा याचा शोध महत्त्वाचा आहे. त्यासाठीचा एक निरंतर संस्कार असतो. वसंतलाल एम. शहा ॲण्ड कंपनीचा या फर्मचा प्रवास त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. १९६१ मध्ये शेंगदाणा पेंड विक्रीचे दुकान सुरू करताना नावामध्ये ‘कंपनी’ असा उल्लेख करावा यात उच्च ध्येय्याची प्रचिती येते. गुजरातच्या जामनगरातून रोजगारासाठी १९५८ च्या दरम्यान सांगलीत स्थलांतरित झालेले वसंतलाल मोहनजीलाल शहा, तेव्हा अवघ्या पंधरा वर्षांचे होते. सांगलीत आले ते रतनजी खिमजी शहा कंपनीत कामगार म्हणून. बोलका, लाघवी, माणसं जोडणारा स्वभाव. त्या बळावर त्यांनी या फर्मच्या मदतीनेच वखार भागात सध्याच्या दुकानात अवघ्या बारा रुपयांच्या मासिक भाड्याने पत्र्याच्या शेडमध्ये शेंगपेंड विक्रीचे दुकान टाकले.

तेव्हाचे प्रतिष्ठित व्यापारी कनुभाई देसाईंनी त्यांना आपल्या ताब्यातील जागा त्यांना दिली. शेंगदाणा पेंड किरकोळ स्वरूपात विकत घेऊन वखार भागात गाडीवान हमाल- शेतकऱ्यांच्या बैलांसाठी विक्री करायची असं व्यवसायाचे पहिलं स्वरूप. वर्ष दीड वर्षात शेंगदाणा पेंड विक्री व्यवसायाचा चांगला जम बसत असतानाच त्यांनी मदतीला आपले ज्येष्ठ बंधू शांतिलाल यांना जामनगरमधून बोलावले. ते तिकडे तीन भाऊ, पाच बहिणी, आई-वडील अशा भल्या मोठ्या कुटुंबाचे कर्तेपण निभावत होते. वसंतलाल यांचा स्वभाव अघळपघळ. त्यातून माणसं जोडली जायची, मात्र व्यवसायाला तेवढेच पुरेसे नसते. हिशेबीपणा हवा. शिस्त हवी. ती उणीव शांतिलाल यांनी भरून काढली आणि बघता बघता सांगलीच्या बाजारपेठेत ‘वसंतलाल एम. शहा’ हे नाव प्रतिष्ठेचं झालं.

Vasantlal M. Shah and Company
Women's Farmers Company : महिलांची पहिली शेतकरी कंपनी काढणाऱ्या अनिताताई यांची अनोखी कहाणी

कंपनीची वाटचाल ...
साधारणपणे १९५९ मध्ये फर्मची स्थापना झाली. पुढच्याच वर्षी वसंतलाल यांच्या मदतीला शांतिलाल आले. १९६१ मध्ये फर्मची रीतसर नोंदणी झाली. सध्याच्या नावंधर सीए फर्मचे संस्थापक मदनलाल या नवशिक्या वकिलाने त्यांच्या व्यवसायातील केलेली ही पहिलीच फर्म. नावंधरांशी तेव्हापासून ऋणानुबंध आजही कायम आहे. ते केवळ व्यापारी नव्हे, तर पिढ्यांचा स्नेहबंध आहे. १९६८ पर्यंत कंपनीतर्फे फक्त शेंगदाणा पेंड विक्री व्हायची. तिचा वापर कसदार पिकासाठीही खत म्हणूनही होऊ शकतो हे पटवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतात पेंड टाकली, की कीड व्हायची. मग त्यासोबत लिंबोळी-करंज पेंडेची मात्रा आली. ते शेतकऱ्यांच्या गळी उतरवणे पुन्हा आव्हान. तोपर्यंत शेणखत हीच मात्रा असायची. हा स्वतःचा फॉर्म्यूला त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात यशस्वीपणे पोहोचविला. त्याच वेळी १९७६ मध्ये महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाने बाजारात आणलेले ‘सुग्रास’ या पशुखाद्याची विक्रीही त्यांनी सुरू केली. श्‍वेतक्रांती घडवणारे ‘सुग्रास’ गोठ्यापर्यंत नेण्यासाठी ही फर्म वाटाड्या ठरली.

Vasantlal M. Shah and Company
Insurance Company : बुलडाणा जिल्ह्यात विमा कंपनी अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिस तक्रार

हरितक्रांतीच्या बदलाची साथ
देशामध्ये १९७६ मध्ये देशात हरितक्रांतीमुळे शेतीक्षेत्रात बदल दिसू लागले. त्यातून आलेल्या बदलानुसार ‘फर्म'ने देखील कार्यपद्धती बदलली. ‘झुआरी’ या सरकारी आणि धरमशी मोरारजी या खासगी खत कंपन्यांची डीलरशिप त्यांच्याकडे आली. एकीकडे पारंपरिक पेंड विक्रीचा व्यवसाय आणि नवे कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत नेण्यासाठी ते प्रयत्नशील होते. १९८२ ते ८५ दरम्यान नवी पिढीही व्यवसायात दाखल झाली. शांतिलाल यांचे चिरंजीव निगमभाई आणि जतीनभाई बीकॉम पदवीनंतर व्यवसायात दाखल झाले. दुकान स्वरूपातील वडील-काकांच्या या फर्मची जबाबदारी त्यांनी हाती घेतली. तेव्हाच आपल्याला मोठी झेप घ्यायचीच आहे असा विचार होता.
शेंगदाणा पेंडीबरोबरच सरकी पेंड विक्री सुरू केली.

सरकी पेंड शेतकऱ्यांना माहीतच नव्हती. त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागले. निगमभाई सांगतात, तेव्हा सरकीचा घेतलेला एक ट्रक ते वर्षभर विकत होते. आज सांगलीच्या पेठेत रोज चाळीस-पन्नास ट्रक सरकी पेंडीचा खप होतो. काळानुरुप व्यवसायात बदल हवाच आणि तो शेतीपूरक निगडित हवा, हे नक्की ठरवून निगमभाईंनी पावले टाकली. त्यांच्या खांद्याला खांदा लावत जतीनभाईंनी सुरुवातीपासून लेखाविभागासह आजपर्यंत खते, बी-बियाणे विभागाची जबाबदारी धडाडीने सांभाळली आहे. हरितक्रांतीने शेतीत संकरित बियाणे आले आणि निगमभाईंनी तिकडे मोर्चा वळवला. तेव्हा फलटण-कोल्हापुरातच असणारे हे बियाणे त्यांनी थेट सांगलीत आणले. महाबीज, हिंदुस्थान लिव्हरसारख्या या सरकारी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची त्यांनी डीलरशिप घेतली. कृषिपूरक व्यवसायाच्या अशा अनेक गरजांचा अभ्यास करताना त्यांना त्यासाठीच्या पूरक मनुष्यबळाची गरज जाणवली. ती दृष्टी ठेवून ते त्यांनी कुटुंबातच घडवले.

शिक्षण आणि एकीचे बळ
एकत्र कुटुंब ही ताकद आहे. तिचा वापर योग्य दिशेने करताना शहा कुटुंबाने आपली पुढची पिढी उच्चशिक्षित होऊनच व्यवसायात येईल याची दक्षता घेतली. निगमभाईंची मुले प्रतीक आणि हर्ष या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. फर्मचाच भाग प्रतीक इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक असलेले प्रतिक हे नेदरलॅण्ड विद्यापीठातून ऑरगॅनिक ॲग्रीमध्ये एमएस आहेत. प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमधील ‘बी.टेक.’ असलेले हर्ष हे सिंगापूरमधील विद्यापीठाचे सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील सुवर्णपदक विजेते ‘एमएस’ आहेत. आता ते सांगलीची प्रमुख उत्पादनांपैकी असलेल्या हळद, चिंच, बेदाणा, गूळ आणि कंपनीच्या सेंद्रिय खतांच्या निर्यातीचा विभाग पाहतात.

वसंतलाल यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजेश पवई आयआयटीचे रसायनशास्त्रातील ‘एमटेक’ असून, ते रिटेल बिझनेस आणि कस्टमर केअर विभागाचे संचालक आहेत. त्यांची बहीण डॉ. फाल्गुनी मेहता या भारती वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग विभागप्रमुख आहेत. त्यांचा मुलगा केतन हा सीए असून, समूहाचा लेखा विभाग सांभाळतो. राजेशभाईंच्या मुली प्रेक्षा व विरती याही उच्चशिक्षित आहेत. प्रेक्षा परदेशात स्थायिक आहे. आता जतीनभाईंचे चिरंजीव जैनम बियाणे विभाग पाहतात. ते एमबीए आहेत. जतीन यांच्या मुली अशिता व्होरा आणि मेघना गोरे उच्चशिक्षित आहेत. अशिता वास्तुशास्त्र ‘एमआर्च’, तर मेघना संगणक अभियांत्रिकीतील ‘एमएस’ आहेत. कुटुंबात स्नूषांपैकी बिजल प्रतीक आणि सुरभी हर्ष या सीए आणि एमबीए आहेत. तर हेतना जैनम या वकील आहेत. अनुभवातून यशस्वी अर्थकारण येते. त्यासाठी शिक्षणाचे पाठबळ हवे. उच्च ध्येय्यासाठी हा मेळ हवा. तो निगमभाईंनी दूरदृष्टीने साधला आहे. या भक्कम पायावरच हा उद्योग समूह सातासमुद्रापार झेप घेत आहे.

उदंड आमची ध्येयासक्ती !

गेली ६३ वर्षे नामवंत कंपन्यांची पशुखाद्ये, शेतीसाठीची खते- कीडनाशके, बी-बियाण्यांची विक्रीत फर्म अग्रेसर आहे. विक्रीबरोबरच उत्पादनात गेले पाहिजे असा विचार तीस वर्षापूर्वी निगमभाई आणि राजेशभाईं बंधुद्वयांनी केला. नवतंत्रज्ञान, गुणवत्ता देताना आपल्याला आधी खात्री हवी. त्यासाठी त्यांनी १९९५ मध्ये प्रतिक इंडस्ट्रीजची स्थापना झाली. या उद्योगातर्फे सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक, सेंद्रिय खते, जैविक कीडनाशक, बुरशीनाशके, जैवउत्तेजके, बेदाणा निर्मितीसाठीची डिपिंग ऑइल उत्पादित होतात. न्यूट्रॉल एस व न्यूट्रॉल इफेक्ट, बायोलाईव्ह पी.एस.बी., के.एन.बी., बायो ग्रो, निसर्ग, बायो गार्ड, ट्रायकोडर्मा, बुलेट हे डिपिंग ऑइल अशा विविध श्रेणींतील लोकप्रिय उत्पादनांसह शंभरहून अधिक उत्पादने देशभरातील बाजारपेठेत जात आहेत.

कंपनीच्या अद्ययावत प्रयोगशाळेत शेतकऱ्यांना पाणी, माती, देठ परीक्षण सुविधा माफक दरात आणि उच्चशिक्षित केमिस्टद्वारा तपासणी करून दिली जाते. भविष्यात ही लॅब आंतरराष्ट्रीय दर्जाची असणार आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत कंपनीच्या तज्ज्ञांमार्फत आणि संचालकांकडूनही बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. परदेशातही आखाती, आफ्रिकन, युरोपियन देशांसह ऑस्ट्रेलियात ही उत्पादने दाखल झाली आहेत. अवघ्या जगाला कवेत घेणारी ही वाटचाल सांगलीकरांसाठी भूषणावह आहे.
-------------------------------------------
संपर्क -
१)निगमभाई शहा,९८२३० २९५९७
(संचालक, वसंतलाल एम. शहा अँड कंपनी आणि प्रतीक इंडस्ट्रिज)
२) प्रतीक शहा, ८८०५० १४७७८
(संचालक, प्रतीक इंडस्ट्रिज, कुपवाड,जि.सांगली)
३) वेबसाईट ः www.pratikindia.com


Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com