Forest Produce : सातपुड्यातील मोह, चारोळी, पळसापासून मूल्यवर्धित उत्पादने

Article by Chandrakant Jadhav : आदिवासी शेतकऱ्यांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेतच. परंतु त्यावर प्रक्रिया, मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यास बाजारपेठ मिळवून अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्नही येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
Forest Food
Forest FoodAgrowon

चंद्रकांत जाधव

Forest Production Food : खानदेशच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहेत. त्यात मोठी वृक्षसंपदा असून, त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा येथील शेती, कुटुंबांच्या विकासाला लाभ झाला आहे. येथील सागवान लाकडाच्या मदतीने अनेक गावांत टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. आजही त्या भक्कम असून वापरात आहेत. पळस, मोह, चारोळी आदी वृक्षांची येथे विविधता आहे.

पैकी चारोळीचे वृक्ष मात्र नामशेष होत चालले आहेत. मोहाची झाडेही मानवी अतिक्रमण व प्रशासकीय अनास्था यामुळे कमी होताना दिसत आहेत. परंतु सातपुड्यातील आदिवासी शेतकरी त्यांचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांत आहेत. परंपरा, शुभ कार्यात या तीनही वृक्षांना स्थान आहे.

पळसाचे महत्त्व

पळसापासून पत्रावळी निर्मितीचा मोठा व्यवसाय सातपुड्यात एकेकाळी होता. परंतु झाडांची
संख्या कमी होत गेली तशी या व्यवसायाची गती कमी होत गेली. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी व लगतच्या भागांमध्ये ही झाडे अधिक प्रमाणात दिसतात. साहजिकच तेथे पळसाच्या पत्रावळ्यांचे महत्त्व टिकून आहे.

पळसाच्या फुलांपासून सरबत तयार केले जाते. धडगावातील बचत गट त्याचीविक्री करतात. आदिवासी कुटुंबांमध्ये पळसाच्या फुलांचा चहा देखील तयार केला जातो. काही कुटुंबे नियमित या चहाचे सेवन करतात. तर काही कुटुंबांमध्ये याच चहाने अतिथींचे आदरातिथ्य केले जाते.

Forest Food
Muskmelon Processing : खरबूजापासून बनवुयात पावडर, जेली व सिरप.

पळसापासूनची उत्पादने

अक्राणी (जि. नंदुरबार) तालुक्यातील जलसाक्षरता समितीने होळीच्या वेळेस पळसाची फुले संकलित करण्याचा उपक्रम राबविला. त्यात होळीत नैसर्गिक रंग उपयोगात आणावेत असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले होते. त्यातूनच पळसाच्या फुलांपासून पावडर व द्रव स्वरूपात नैसर्गिक रंग तयार करून परिसरातील शालेय व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी होळी साजरा केली. रंगनिर्मितीत समितीचे प्रमुख डॉ.एच.एम.पाटील यांनी पुढाकार घेतला होता.

जैवविविधता व पर्यावरण या विषयात त्यांनी पीएचडी पदवी घेतली असून, सातपुड्यातील जैवविविधता विषयावर त्यांचा मोठा अभ्यास आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग वृक्ष संवर्धन व काही उत्पादने तयार करण्यासाठी देखील त्यांनी इतरांना करून दिला आहे. पळसाच्या फुलांचा उपयोग डोळ्यांचे आजार, पित्त यावरील औषधांमध्ये, कंदाचा उपयोग जखम, शरीरावरील सूज कमी करण्यासाठी तर डिंकाचा उपयोग अतिसारावर केला जातो. बियांचा उपयोग सातपुड्यात मुतखडा, मूत्र विकारांवर तर पानांचा वापर पोटाचे विकार, जंतुनाशक म्हणून केला जातो.

Forest Food
Jackfruit Food Processing : फणसाचे मूल्यवर्धित पदार्थ

चारोळीतून कमाई

खानदेशात शहाद्यातील शिरपूर, धडगावमधील कारकरा भागात चारोळीची झाडे दिसून येतात. बारीक व जाड अशा दोन आकारात ती येते. सातपुड्यातील चारोळीचा उपयोग आदिवासी बांधव सुकामेवा म्हणून करतात. चारोळीच्या विक्रीतून जे उत्पन्न हाती येते त्याची मदत आदिवासींना आपल्या कुटुंबीयांसाठी दागिने बनवून घेण्यासाठी होतो. चारोळीचे झाड तोडणे व जाळणे सातपुड्यात पाप मानले जाते.

मोहाच्या झाडांचे महत्त्व

देशात मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्रात या राज्यांव्यतिरिक्त अन्य चार देशांत मोह वृक्ष आढळतो. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, जळगावमधील चोपडा, यावल व रावेर भागात हे वृक्ष दिसून येतात. मोहाचे व्यावसायिक मूल्यवर्धन चांगल्या प्रकारे केल्यास त्यातून परकीय चलन मिळू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा वृक्ष शंभर वर्षांपर्यंत टिकून राहू शकतो.

दुष्काळाला काटक व दरवर्षी पानगळ होऊन पुनरुज्जीवित होणारा वृक्ष म्हणून त्याचा उल्लेख आहे. मोह फुलांच्या विक्रीतून सातपुड्यातील आदिवासींना धान्य व खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी आधार होतो. ही फुले देवपूजेसाठीही वापरली जातात. चोंदवाडे खुर्द (ता. अक्राणी) येथे विविध मोहफुलांचे प्रदर्शन व व्यंजन स्पर्धा आयोजिण्यात येते.

मोहापासून विविध उत्पादने

मोहाच्या बियांचे तेल काढून त्याचा सातपुडा भागात खाद्यतेल म्हणून वापर केला जातो. आयुर्वेदातही त्याचा उपयोग आहे. बाजारात तीन हजार रुपये प्रतिकिलो असा त्याचा दर आहे. मोहफळांचा उपयोग करून लाडू निर्मितीचा प्रयत्नही धुळे जिल्ह्यातील साक्री तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव भागात झाला आहे. येथील काही बचत गट काजू, बदामयुक्त मोह लाडू तयार करून त्याची बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शुभकार्य किंवा पाहुणचारात मोहाची फुले, फळे आदींच्या वापरातून भजी (पकोडे), भाकरी, लाडू तयार केले जातात. मांसाहारी पदार्थ मोहतेलात बनवून पाहुणचार करण्याची परंपरा इथे आहे. मोहाचे मूल्यवर्धन करण्याच्या दृष्टीने सातपुडा व पर्वतीय क्षेत्रात बचत गट, शेतकरी समूह प्रयत्नशील आहेत. बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील वनभूषण पुरस्कारप्राप्त चैत्राम पवार यांनी ही माहिती दिली. मोहफुलांची पेंडही (ढेप) महत्त्वाची असून किडी, मच्छर पळविण्यासाठी तिचा धूर केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com