Black Grape Variety : काळ्या द्राक्षाचे ‘उत्कर्षा’ वाण विकसित

Utkarsha Grape Variety : या वाणाला केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानुसार वाणाचे सर्वाधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत.
Utkarsha Grape Variety
Utkarsha Grape VarietyAgrowon

Nashik News : पाथर्डी (गौळाणे रस्ता) (जि. नाशिक) येथील शेतकरी रामचंद्र दगुजी चुंभळे हे २३ वर्षांपासून द्राक्षशेती करत आहेत. त्यांनी निवड पद्धतीने ‘उत्कर्षा’ या नावाने काळ्या रंगाचा वाण विकसित केला आहे. या वाणाला केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानुसार वाणाचे सर्वाधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत.

श्री. चुंभळे यांना २०१७ मध्ये बेंगलोर डॉग्रिज या खुंटावर लागवड केलेल्या ‘शरद सिडलेस’ जातीच्या द्राक्षबागेत निरीक्षण करताना एक वेगळी वेल आढळून आली. द्राक्षवेलीच्या दोन भागांमध्ये उत्पादनसंबंधी वेगवेगळे परिणाम दिसत होते.

त्यातील एका ओलांड्यावर अधिक प्रमाणात मोठ्या मण्यांसह घड दिसून आले. याबाबत सलग तीन वर्षे निरीक्षण करीत असताना चुंभळे यांना पारंपरिक ‘शरद सिडलेस’ वाणापेक्षा वेगळी वैशिष्ट्ये आढळून आली. असे परिणाम सलग तीन वर्षे अभ्यासले.

Utkarsha Grape Variety
Grapes Variety : द्राक्षांच्या नव्या, ‘पेटंटेड’ वाणांकडे वळावेच लागेल

पुढे २०१८ मध्ये या वेलीवरील काड्यांपासून १५ रोपे तयार करून लागवड केली. त्यावर चांगले परिणाम आल्यानंतर पुढे पुन्हा काडी काढून रोपे तयार केली. त्यातून २०२० मध्ये दीड एकरांवर लागवड केली. या वाणाच्या लागवड क्षेत्रावर पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. रोशनी समर्थ यांनी सलग दोन वर्षे भेटी देऊन निरीक्षणे व परिणाम नोंदविले.

त्यानंतर भारत सरकारच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे ‘उत्कर्षा’ या नावाने द्राक्ष वाणाच्या अधिकार हक्कासाठी १२ जुलै २०२२ रोजी अर्ज दाखल केला. सर्व अभ्यास, प्रायोगिक निष्कर्ष, नोंदी- तपशीलांची खातरजमा झाली. त्यानुसार ‘उत्कर्षा’ वाणाचे कायदेशीर मालकी अधिकार हक्क चुंभळे यांना १८ ऑक्टोबर २०२३ रोजी देण्यात आले. तसे अधिकृत प्रमाणपत्रही नुकतेच त्यांना देण्यात आले आहे.

Utkarsha Grape Variety
Arra Grape Variety : ‘आरा’ द्राक्षाला प्रतिकिलो २६० रुपये दर

आपल्या मुलीचे नाव चुंभळे यांनी या वाणाला दिले आहे. सर्व हक्क प्राप्त अधिकार हक्कानुसार चुंभळे यांच्या संमतीशिवाय या वाणाच्या रोपाची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण आयात, निर्यात कोणालाही परस्पर करता येणार नाही. चुंभळे दाभोळकर प्रयोग परिवाराचे सक्रिय सदस्य आहेत.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, प्रयोग परिवार व वासुदेव काठे यांचे सहकार्य व मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. एस. डी. रामटेके यांनीही त्यांच्या बागेला भेटी दिल्या आहेत.

उत्कर्षा वाणाची वैशिष्ट्ये

- पानांचा अधिक हिरवेपणा

- गर्भधारणा वा पीकवाढीसाठी संजीवके, वाढ नियंत्रके, जीए आदींची कमी गरज

- सबकेन व काटेकोर सिंचन व्यवस्थापन महत्त्वाचे

- अन्य काळ्या वाणांच्या तुलनेत ‘पीजीआर’ घटकांची गरज २५ टक्के कमी

- एका वेलीवर जवळपास ५० ते ८० दरम्यान घड धारणाक्षमता

- २२ मिमीपर्यंत मण्यांचा आकार

- गर हलकासा पातळ व लवचिक असल्याने तडे जाण्याची समस्या अन्य पारंपरिक काळ्या वाणाच्या तुलनेत कमी

- मण्यावरील साल पातळ व द्राक्षमण्याला अधिक गोडी

- गोडी बहर छाटणीपश्चात चार ते सव्वा चार महिन्यात काढणीस येणारा वाण

- साध्य उत्पादन- एकरी १० टन.

गेल्या दोन वर्षांपासून नव्या वाणाचे उत्पादन सुरू झाले आहे. गोडी व आकार असल्याने नेपाळ व बांगलादेश व्यापाऱ्यांकडून पसंती मिळाली आहे. आता पुढील ७ ते ८ दिवसांत प्रक्षेत्र दिवस घेऊन शेतकऱ्यांना पाहणीसाठी बोलावणार आहे.
- रामचंद्र चुंभळे, ९८२२६१२८७३, ९८२२६१२८७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com