Book Review : नव्या पिढीची घालमेल, वेदना सांगणारी ‘उसवण’

Usvan Book : माणूस जगतो कशासाठी? केवळ पोटासाठी नक्कीच नाही. पोटाची भूक भाकरीचा एक तुकडा मोडला तरी भागवता येईल, पण ज्ञानाच्या भुकेचं काय?
Usvan Book
Usvan Book Agrowon

अविनाश पोफळे

Usvan Book Review :

पुस्तकाचे नाव : उसवण

लेखक : देवीदास सौदागर

प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे.

पाने : ११६

मूल्य : १६० रुपये

माणूस जगतो कशासाठी? केवळ पोटासाठी नक्कीच नाही. पोटाची भूक भाकरीचा एक तुकडा मोडला तरी भागवता येईल, पण ज्ञानाच्या भुकेचं काय? त्यातही केवळ तार्किक ज्ञानापेक्षा सहवेदना जाणणारे, समाजाला कवेत घेणारे ज्ञान आजच्या केवळ स्वतःपुरते पाहणाऱ्या अप्पलपोटी समाजामध्ये दुरापास्त होत चालले आहे. गेल्या काही काळात जागतिकीकरणाने सारा गावगाडा उलटापालटा करून टाकला. या वादळात पिढ्यान् पिढ्या तग धरून असलेली शेतीकेंद्रित बलुतेदारी, अलुतेदारी मोडून पडली.

Usvan Book
Book Review : पाणी प्रश्नातील अनेक पैलूंचा सखोल आढावा...

म्हणजेच ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीच नष्ट होत गेल्या. मग रोजगाराच्या नवीन संधी शोधत नवीन पिढीही पालापाचोळ्याप्रमाणे इकडून तिकडे भिरकावली जात आहे. मराठी साहित्यामध्ये दलितांचं जगणं, त्यांच्या वेदना आत्मचरित्रे, कादंबऱ्यातून एखाद्या वादळाप्रमाणे बऱ्यापैकी येऊन गेलं, पण त्या तुलनेत या अलुतेदार, बलुतेदारांचं जगणं साहित्यात झिरपलेलं दिसत नाही.

त्यातही त्यांच्यातील तरुणांसमोर उभी राहिलेली बेरोजगारीची अकराळविकराळ समस्या, त्यात कंपनीकरणामुळे वाढलेली जीवघेणी स्पर्धा, त्यातून येणारे ताणतणाव साहित्यात फारसे आलेच नाहीत. ती गरज ‘उसवण’ ही देविदास सौदागर यांची कादंबरी भागवते. साधेसोपे शब्द उस्मानाबादी बोलीतून येत असले, तरी त्यामागे दडलेल्या वेदनेमुळे त्याला वजन येते. त्याची भेदक मांडणी आपल्याला हलवून टाकते. नेहमीच्या जगण्यातील ताणतणाव आणि वेदनेसोबत येणारे काही अस्सल कवडसे आपल्याला भारून टाकतात. या कादंबरीला नुकताच साहित्य क्षेत्रातील मानाचा ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

फाटके कपडे शिवणाऱ्या फाटक्या माणसाच्या वेदनेतून जगण्याचं तत्त्वज्ञान प्रसवतं. नवी कापडं शिवताना त्यासोबत आनंदानं थुईथुई नाचतं. व्यवसायानं शिंपी असलेल्या देविदास सौदागर यांचा नायक विठू हा शिंपी आहे. शिंपी अर्थात टेलर. त्याच्या भोवतीचं समाजवास्तव, खेड्यातलं जीवन, गावोगावी आलेल्या रेडिमेड कपड्यांच्या टोलेजंग दुकानांमुळे लयाकडे निघालेला शिंपी व्यवसाय.

Usvan Book
Book Review : मधमाश्या संशोधकांची महती सांगणारे लेखन

त्यामुळे टेलरिंग व्यवसायावर पोट असलेल्या एका शिंप्याच्या कुटुंबाच्या दयनीय अवस्थेचे धागे लेखकानं शब्दातून विणलेत. जागतिकीकरणाने हातावर पोट असलेल्याचं जगणं शेकडो सुया टोचून रक्तबंबाळ झालंय. छोट्या व्यावसायिकांना मोठ्या भांडवलदारांनी संकटांच्या खाईत लोटलेय. या कादंबरीतील भवतालही तसाच. साध्या साध्या जगण्यातून उलगडत जाणारे प्रसंद, संवाद कधी तत्त्वज्ञानात शिरतात ते कळतही नाही. उदा. गावातील महाराज विठूकडे धोतर शिवायला येतात.

महाराज : बरं, विठोबा धोतर कुरतडलंय उंदरानं. बघ जरा दंड घालून दे.

विठू : महाराज नवं घ्या आता धोतर. किती जुनं झालंय.

महाराज : देह जुना झालाय. आता नवं कापड काय करावं?

विठू : असं बोलू नका महाराज!

महाराज : विठोबा खरं सांगू, मन कशातच राहिलं न्हाई. कोंडून ठेवलेली कबुतरं आभाळात सोडून द्यावी, तशी सगळी कोंडलेली इच्छा सोडून दिली हाय. विठोबा सगळे रंग मागे सुटले रे. उरला फक्त पांढरा रंग. सगळं कसं आता मोकळं ढाकळं वाटतं.

कोणत्याही गावात असतात, तशीच अनेक माणसं विठूच्या अवतीभवती येत राहतात. त्यात आहे एक वेडा. रुढार्थाने वेडा असणाऱ्या या माणसाची बडबड नीट ऐकली, थोडा अर्थ लावला तर शहाण्यालाही मागे टाकणाऱ्या गोष्टी तो बोलतो. त्याच्या वेडसर वाटणाऱ्या बडबडीतलं सार विठू जाणतो. कादंबरी वाचल्यानंतरही तो माणूसच नव्हे, तर संपूर्ण कादंबरी आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये दीर्घकाळ रेंगाळत राहते. गावखेड्यातील सामान्यांचं जगणं, त्याच्या भावभावना, वेदना आणि त्यात कधीमधी चमकून जाणाऱ्या आनंदाच्या लकेरी समजून घेण्यासाठी कादंबरी वाचलीच पाहिजे. लेखक एका मुलाखतीत म्हणतो, तसे प्रत्येक सामान्यांच्या जगण्याच्या नोंदी साहित्यानं टिपल्याच पाहिजेत. आणि मला वाटते, त्या टिपणाऱ्या साहित्याला समाजानं डोक्यावरही घेतलं पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com