Jalgaon News : शरद पाटील यांची गाढोदे (ता.जि. जळगाव) येथे गिरणा नदीच्या लाभक्षेत्रात २५ एकर जमीन आहे. जमीन काळी कसदार असून, केळी मुख्य पीक आहे. बेवडसाठी पपई लागवडदेखील केली जाते. सिंचनासाठी तीन कूपनलिका आहेत. केळी लागवडीसाठी कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड केली जाते.
जेणेकरून साधारण ११ महिन्यांत पूर्ण बागेतील केळी काढणी पूर्ण होईल. श्री. पाटील मागील अनेक वर्षांपासून निर्यातक्षम केळी उत्पादन घेत आहेत. लागवड पाच बाय सहा फूट अंतरावर केली जाते. दर्जेदार केळी उत्पादन घेण्याचा शरद पाटील यांचा प्रयत्न असतो. निर्यातक्षम उत्पादनासाठी फ्रूट केअर तंत्राचा अवलंब केला जातो. उत्पादित १०० टक्के केळीची आखातात एका खासगी कंपनीच्या मदतीने निर्यात केली जाते.
केळी लागवड
केळीमध्ये नवती किंवा मृग बहर आणि कांदेबागेतून उत्पादन घेतले जाते.
दरवर्षी मृग बहर केळीची जून महिन्यात तर कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबरमध्ये केली जाते.
लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन या जातीच्या १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला जातो.
लागवड दीड फूट उंच व तीन फूट रुंद गादीवाफा पद्धतीने केली जाते.
सिंचनासाठी एका ओळीत दोन लॅटरल टाकल्या जातात.
पूर्वतयारी
या वर्षी कांदेबाग लागवड २५ ऑक्टोबरला सात एकरांत करण्याचे नियजित होते. त्यानुसार योग्य पूर्वतयारी करून घेतली होती. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून पावसाच्या कालावधीत शेत नापेर ठेवले होते. त्यामुळे शेताची सुपीकता टिकून सेंद्रिय कर्ब स्थिर राहण्यास मदत होते. केळी हे ११ ते १२ महिन्यांचे पीक असल्याने जमिनीचा पोत टिकविणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतर एकरी साधारण तीन ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घेतले. त्यानंतर ट्रॅक्टरचलित अवजाराने योग्य अंतराचे गादीवाफे तयार करून घेतले. गादीवाफे तयार झाल्यावर सिंचनासाठी ड्रीप टाकून घेतले. पूर्वतयारी झाल्यानंतर गादीवाफे चांगले भिजवून घेतले. या कालावधीत तापमान साधारण ३५ अंश सेल्सिअसअ इतके होते. त्यामुळे वाफे चांगले फिजवून घेतले आहेत.
लागवड नियोजन
लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांची उपलब्धता केली. लागवडीसाठी आणलेली रोपे शेतातील झाडाखाली सहा दिवस ठेवली होती. जेणेकरून रोपे बाहेरील वातावरणासोबत सुसंगत होती आणि लागवडीनंतर नुकसान होणार नाही, यासाठी ही काळजी घेण्यात आली.रोप लागवडीपूर्वी प्रति एक हजार झाडांना सिंगल सुपर फॉस्फेट ४ बॅग तसेच निंबोळी पेंड दोन गोण्या याप्रमाणे मात्रा दिली. साधारण २५ ऑक्टोबरला सात एकरांत साधारण १० हजार केळी रोपांची लागवड केली आहे. लागवडीनंतर ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक आणि ॲमिनो ॲसिडची आळवणी केली. बागेत कीड नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निळे व पिवळे चिकट सापळे लावले आहेत. सध्या रोपांची उगवण चांगली झालेली आहे. सध्याचे हवामान विषम आहे. या महिन्यात किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधत्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणी घेतली आहे.
वेळापत्रकानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत आहे.
केळी बाग लागवड परिसरात वन्यप्राणी अधिक आहेत. या प्राण्याच्या आक्रमणामुळे रोपांचे मोठे नुकसान होते. रोपांची नासाडी झाल्यास अधिकच्या नांग्या भराव्या लागतात. वन्य प्राण्यांपासून बागेतील रोपांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती तारेचे कुंपण तयार करून घेतले आहे.
आगामी नियोजन
सध्या रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वेळापत्रकानुसार सेंद्रीय व रासायनिक खतांच्या वापर करण्यावर भर राहील.
बाग साधारण एक महिन्याची झाल्यानंतर प्रति हजार झाडांना युरिया ५० किलो, १०ः२६ः२६ हे खत ५० किलो, पोटॅश ५० किलो प्रमाणे रासायनिक खतमात्रा दिली जाईल. तसेच २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य दिली जातील. सोबतच सेंद्रिय खत व निंबोळी पेंडीची मात्रा दिली जाईल.
खतांच्या मात्रा दिल्यानंतर मातीची भर लावून घेतली जाईल. जेणेकरून खते मातीआड होतील आणि रोपांना त्याचा पुरेसा फायदा होईल.
त्यानंतर लगेच ठिबकद्वारे सिंचन केले जाईल. बागेत वाफसा स्थिती कायम ठेवण्यावर भर दिला जाईल.
कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सतत निरीक्षण केले जाईल. कारण या काळात बुरशीजन्य व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
पुढील साधारण २० ते २२ दिवसानंतर तणनियंत्रणाची कार्यवाही केली जाईल.
सिंचन व्यवस्थापन
येत्या काळात तापमान कमी होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचनावर भर दिला जाईल.
बागेस विशेषतः रात्रीच्या वेळी सिंचन करण्यावर भर दिला जाईल.
जमीन काळी कसदार असल्याने आठवड्यातून एक तास ठिबक संच चालू ठेवला तरी पुरेसा होतो. पाण्याचा अतिवापर करणे टाळले जाते.
बाग १ महिन्याची झाल्यानंतर ठिबकच्या तोट्या स्वच्छ केल्या जातील. तसेच ठिबक संच व्यवस्थित असल्याची खात्री केली जाईल.
कुकुंबर मोझॅक नियंत्रण
सुरुवातीचे तीन महिने बागेत कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिन्यातून दोन वेळा शिफारशीत घटकांची रासायनिक फवारणी घेतली जाईल.
- शरद पाटील,
९५१८५३५२६१
(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.