Solar Energy
Solar EnergyAgrowon

Agriculture Technology : रोपवाटिकेत सौरऊर्जेचा वापर

Solar Energy : सौरऊर्जेचा वापर करून गादीवाफे कमीत कमी एक ते दीड महिना उन्हामध्ये तापू द्यावेत. त्यामुळे जमिनीतील कीड-रोगांच्या अवस्था उन्हामुळे नष्ट होतात. तसेच जमिनीतील हानिकारक बुरशीमुळे होणारी रोपांची मर थांबते. बुरशींचे नियंत्रण करण्यास मदत होते.

डॉ. यू. आर. सांगले

Use of Solar Energy in Nursery : वांगी, टोमॅटो, मिरची इत्यादी पिकांची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपनिर्मिती केली जाते. गादीवाफ्यावर बियाणे टाकल्यानंतर बहुतांशी बियाणे बुरशीच्या प्रादुर्भावामुळे जमिनीतील रोगांमुळे रोपावस्थेतच मरते. तर काही बियाण्यांची उगवण होत नाही. यालाच मर रोग असे म्हणतात.

जमिनीतून रोगांचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जमिनीचे तांत्रिक पद्धतीने निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून दर्जेदार रोपांची निर्मिती होईल. त्यासाठी सूर्याच्या प्रखर उष्णतेची मदत घेता येते. उन्हाळ्यातील याच सौरऊर्जेचा वापर जमिनीच्या निर्जंतुकीकरणासाठी करता येतो.

सौरऊर्जा वापराआधीची पूर्वतयारी

गादीवाफे व्यवस्थित आणि योग्य आकाराचे करावेत.

गादीवाफ्यावर रोप लागवडीपूर्वी वापरावयाची पॉलिथिन फिल्म ही पारदर्शक १०० ते ४०० मायक्रॉन जाडीची असावी.

पॉलिथिन फिल्म टाकताना आवश्यकतेनुसार योग्य आकारात कापून घ्यावी.

गादीवाफ्यावर पॉलिथिन टाकल्यानंतर चारही बाजूंनी मातीने झाकावी. कोठेही छिद्र अथवा रिकामी जागा ठेवू नये. म्हणजे बाहेरील हवा आतमध्ये प्रवेश करणार नाही. आणि आतील उष्णता बाहेर जाणार नाही.

गादीवाफे तयार करण्यासाठी निवडलेल्या जागा दरवर्षी रोपवाटिकेसाठी उपयोगात आणावी. आणि त्याच जागी बेड तयार करून त्यावर पॉलिथिन फिल्म टाकावी. सौरऊर्जेमुळे जमिनीतून येणाऱ्या रोगांचे संपूर्ण नियंत्रण होईल.

Solar Energy
Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती

सौरऊर्जा तंत्राचा वापर

रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा नांगरून, वखरणी करून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. ढेकळे फोडून घ्यावेत. त्यानंतर गादीवाफे तयार करावेत.

सौरऊर्जा तंत्राचा वापर मुख्यत्वे

करून एप्रिलचा शेवटचा आठवडा ते संपूर्ण मे महिना किंवा कडक उन्हाळा असेपर्यंत करावा. गादीवाफे कमीत कमी एक ते दीड महिना उन्हामध्ये तापू द्यावेत. ऑक्टोबर महिन्यात देखील या तंत्राचा वापर करता येते.

गादीवाफे तयार करताना वाफ्यावर कोणताही काडीकचरा, दगड किंवा मोठी ढेकळे नसावीत. त्यामुळे गादीवाफ्यावर वापरण्यात येणाऱ्या पॉलिथीनला छिद्र पडण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते.

गादीवाफ्यावर उपलब्धतेसाठी चांगले कुजलेले शेणखत ४ ते ५ किलो प्रमाणे मिसळावे. शेणखत चांगले बारीक करून नंतर व्यवस्थित प्रत्येक वाफ्यात मिसळावे.

Solar Energy
Solar Energy Generation : बुलडाणा जिल्ह्यात लवकरच १९५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती

रोपलागवडीपूर्वी गादीवाफे पाण्याने चांगले भिजवून घ्यावेत.

पॉलिथिन फिल्म गादीवाफ्याच्या आकारमानानुसार तयार करून त्यावर टाकावी. गादीवाफ्यावर योग्य आकाराची स्वतंत्र पॉलिथिन फिल्म सर्व बाजूंनी टाकावी. वाफा पूर्णपणे झाकून कडेपर्यंत अर्धा ते पाऊण फूट सोडावी. नंतर वाफ्याच्या सर्व बाजूंनी पॉलिथीनच्या कडा माती टाकून झाकाव्यात. त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांपर्यंत तसेच ठेऊन द्यावे. नंतर ४० ते ४५ दिवसांनी वाफ्यावरील पॉलिथिन फिल्म काढावी.

पॉलिथिन काढतेवेळी चारही बाजूंची माती आधी काढून घ्यावी. नंतर तिरकस बाजूने पॉलिथिन ओढावी. पॉलिथिन काढताना ती फाटणार नाही याची काळजी घ्यावी. काढल्यावर व्यवस्थित घडी करून ठेवावी. जेणेकरून पुढील काळात तिचा वापर करता येईल.

पॉलिथिन काढल्यानंतर स्वच्छ खुरप्याने किंवा कुदळीने माती भुसभुशीत करावी. त्यानंतर पाणी देऊन दोन-तीन दिवसांनी वाफ्यावर बियांची पेरणी करावी.

सौरऊर्जेद्वारे माती निर्जंतुकीकरणाचे फायदे

जमिनीतील किडींच्या अंडी व इतर अवस्था नष्ट होतात.

जमिनीतील हानिकारक बुरशीमुळे होणारी रोपांची मर थांबते.

बुरशींचे नियंत्रण होते.

वाफ्यातील संग्रहित ऊर्जेमुळे बीज उगवण्याकरीता चालना मिळते. रोपांची उगवण चांगली होते.

मातीद्वारे पसरणाऱ्या मर रोगाचे नियंत्रण होते. तणांचे नियंत्रण होते. एकाच वाफ्यावर दरवर्षी सौरऊर्जेचा उपयोग केल्यास तणांचा समूळ नियंत्रण होते.

हानिकारक बुरशींचे नियंत्रण झाल्यामुळे जमिनीमधून पिकांना फायदेशीर जैविक घटक उपलब्ध होतात.

वाढ झपाट्याने होऊन रोपे सुदृढ व निरोगी होतात.

झाडांची रोग प्रतिकारशक्ती वाढते.

जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे जमिनीद्वारे पिकास आवश्यक अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात.

अत्यंत कमी खर्चाची पद्धती आहे. रासायनिक घटकांचा शून्य वापर.

ही पद्धत वांगी, टोमॅटो, मिरची, पपई, लिंबूवर्गीय फळपिके तसेच नगदी पिकांच्या रोपवाटिकेसाठी फायदेशीर ठरते.

डॉ. यू. आर. सांगले, : ९५१८९ ९२२१३

(प्रमुख शास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्र विभाग, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com