India Urea Subsidy Policy Reform: युरियालाही पोषक तत्त्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) योजनेत आणावे, अशी शिफारस नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेसने (एनएएएस) केली आहे. युरियाचे भाव सरकारच्या नियंत्रणात आहेत आणि त्याला अनुदानही जास्त मिळते. त्यामुळे नत्राच्या अतिवापराला चालना मिळाली आहे, असे अकादमीने म्हटले आहे. ‘खतांसाठी आत्मनिर्भरतेचा आराखडा’ या पॉलिसी पेपरमध्ये ही शिफारस आहे..या पॉलिसी पेपरनुसार नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे ४:२:१ हे प्रमाण योग्य मानले जाते. परंतु प्रत्यक्षात देशात खत वापराचे सरासरी प्रमाण १०.९:४.४:१ आहे. पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशात ही तफावत आणखी जास्त आहे. यामुळे खतांची कार्यक्षमता कमी आहे, अनेक अन्नद्रव्यांची कमतरता दिसते आणि जमिनीचे आरोग्य बिघडते. १९७० च्या दशकाच्या मध्यात एक किलो अन्नद्रव्यामागे (एनपीके) ६० किलोहून जास्त धान्य मिळत होते. २०२१ मध्ये हे प्रमाण ९ किलोवर आले..India Urea Tender: भारताच्या युरिया निविदेकडे जागतिक खत बाजाराचे लक्ष.खत अनुदान २००४-०५ मध्ये १६,१२७ कोटी रुपये होते. २०२४-२५ मध्ये ते १.९१ लाख कोटी रुपयांवर गेले. यातील ६९.५ टक्के अनुदान एकट्या युरियावर खर्च झाले. याच वर्षी खत आयातीसाठी सुमारे ७२,००० कोटी रुपयांचे (८२९ कोटी डॉलर) परकीय चलन खर्च झाले. देशाला लागणारे सुमारे ९० टक्के स्फुरद आणि जवळपास सर्वच पालाश आयात करावे लागते, असे अकादमीने म्हटले आहे. युरियाच्या उत्पादन खर्चात नैसर्गिक वायूचा वाटा ७० टक्क्यांपर्यंत आहे. युरिया उद्योगाला लागणारा सुमारे ८५ टक्के वायू आयात होतो..अकादमीने २०४७ पर्यंतचा तीन टप्प्यांचा आराखडा मांडला आहे. २०२६ ते २०३० या पहिल्या टप्प्यात खत अनुदानात टप्प्याटप्प्याने सुधारणा करावी. फक्त खतांना नव्हे तर पोषक घटकांना अनुदान द्यावे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय आणि जैविक स्रोतांना प्रोत्साहन द्यावे. माती परीक्षण सेवा ॲग्रिस्टॅकशी जोडावी, अशा शिफारशी आहेत..Urea Alternative: युरिया खताला पर्यायी रासायनिक खते कोणती?.२०३१ ते २०४० या दुसऱ्या टप्प्यात खते आणि कच्च्या मालाचा धोरणात्मक साठा उभारावा. डिजिटल आणि संस्थात्मक व्यवस्था सक्षम असेल तिथे थेट लाभ हस्तांतराकडून (डीबीटी) थेट रोख हस्तांतरणाकडे (डीसीटी) जाण्याचा विचार करावा, असे पॉलिसी पेपरमध्ये म्हटले आहे. २०४१ ते २०४७ या तिसऱ्या टप्प्यात शेती, पशुधन, शहरे आणि उद्योग या सर्व क्षेत्रांत अन्नद्रव्ये नियमितपणे परत मिळवून पुन्हा वापरणारी पूर्ण व्यवस्था उभी करावी, असेही अकादमीने सुचवले आहे..२०२४-२५ मधील खत आयात (लाख टन)युरिया ५६.५डीएपी ४५.७एनपीके/पीके मिश्रखते २२.७म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) ३५.४रॉक फॉस्फेट ११९.५गंधक २२.०फॉस्फरिक ॲसिड २१.२(स्रोत : एनएएएस, पॉलिसी पेपर क्र. १५०, सप्टेंबर २०२६).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.