
Raigad News : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रायगड जिल्ह्यात मंगळवारी (ता. ६) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या धुळीच्या लोटांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे उन्हाळी भातपिकाबरोबरच आंबा उत्पादक, वीटभट्टी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने समुद्रातही उधाण आले होते. उत्साही पर्यटक उंच उंच लाटांचा मनसोक्त आनंद घेताना दिसले.
दक्षिण रायगडमधील तळा, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. उत्तर भागात माथेरान, कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग, मुरूड, पनवेल तालुक्यांतही रात्री सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस झाला. त्याबरोबरच धुळीचे वादळ उठले होते. काही ठिकाणी झाडे, तर काही ठिकाणी फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.
दोन दिवसांपासून हवामान विभागाने जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मंगळवारी जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. माथेरानमध्ये दीड ते दोन तास पाऊस सुरू होता. त्यामुळे पर्यटक सुखावले आहेत.
आंबा बागायतदार धास्तावले
खोपोली ः दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार धास्तावले होते. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास खोपोली-खालापूर परिसरात वादळी वाऱ्यासह अर्धा तास पाऊस पडला. या वेळी खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
पावसामुळे आंबा बागायतदार व बांधकाम व्यावसायिक धास्तावले आहेत. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.