University of Western Sydney : वेस्टर्न सिडनी विद्यापीठ : एक शाश्‍वत मॉडेल

Education of Western Sydney University : वेस्टर्न सिडनी विद्यापीठ २०१५ पासून दरवर्षी निरंतर विकास अहवाल तयार करत आहे. हे विद्यापीठ व्यक्तींचे आयुष्य बदलून टाकणारे शिक्षण देते. देशातील नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

डॉ. विनायक पाटील, डॉ. संजय भावे

Activities at the University of Western Sydney : मानवजातीच्या बहुतांश गरजा पर्यावरणातील विविध संसाधनांचा वापर करून भागविल्या जातात. मात्र अतिरेकी आणि अविवेकी वापरामुळे सर्वच संसाधनांची उपलब्धता धोक्यात आली आहे. त्यांची गुणवत्ता प्रदूषित झाली आहे. सर्वच देशांनी विकासाचे एक ठरावीक मॉडेल वापरल्यामुळे ही समस्या उभी राहिली.

त्यामुळेच विकासाच्या नावाखाली भकास होत चाललेल्या जगात गेल्या काही दशकांपासून शाश्‍वत विकासाच्या संकल्पनेचा पाठपुरावा केला जात आहे. शाश्‍वत विकास म्हणजे वर्तमानकालीन गरजांची पूर्तता करत असताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागविण्याच्या आपल्या पर्यावरणाच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड न करणे.

यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २००० मध्ये गरिबी नष्ट करण्याचे प्रमुख ध्येय ठेवून सहस्रकातील विकास उद्दिष्टे ठरवली. त्यांची पूर्तता २०१५ पर्यंत पूर्ण करावी अशी अपेक्षा होती. पण हवामान बदलाची वाढती भीषणता लक्षात घेऊन सप्टेंबर २०१५ मध्ये न्यू यॉर्क येथे शाश्‍वत विकास परिषद आयोजित करण्यात आली.

यामध्ये १७ निरंतर शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे निवडून १६९ निरनिराळी लक्ष्ये निश्‍चित झाली. या उद्दिष्टांची प्राप्ती २०३० पर्यंत करायचे ठरवण्यात आले. भारतातील या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि नियंत्रण निती आयोग करत आहे.

वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील उपक्रम

शाश्‍वत विकास प्रक्रियेत समाजातील विविध घटकांचा आणि संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. जगभरातील शिक्षण क्षेत्राच्या निरंतर विकासामध्ये विद्यापीठांचा मोलाचा सहभाग आहे. परंतु त्यांचे मूल्यमापन कसे आणि कोण करणार? त्यासाठी जगातील विद्यापीठांचे रॅंकिंग करणाऱ्या ‘टाइम्स हायर एज्युकेशन’ या संस्थेने पुढाकार घेतला.

२०१९ पासून या संस्थेने क्रमवारी प्रक्रियेत विद्यापीठांनी निरंतर शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी केलेल्या कामाचा प्रभाव मोजण्यास सुरुवात केली. २०२३ मध्ये या प्रक्रियेत जगभरातील १५९१ आणि भारतातील ६६ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. या जागतिक प्रभाव क्रमवारीत २०२२ आणि २०२३ मध्ये सलग प्रथम क्रमांक मिळवला तो ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने. या विद्यापीठाचे संशोधन पाहण्याची संधी आम्हाला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून मिळाली.

आमच्या प्रक्षेत्र भेटीमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. बार्नी ग्लोव्हर यांनी विद्यापीठाची शिक्षण पद्धती आम्हाला समजावून सांगितली. ते म्हणाले, की आमचे विद्यापीठ व्यक्तींचे आयुष्य बदलून टाकणारे शिक्षण देते; याशिवाय संपूर्ण प्रदेश आणि समाजाला सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.

आमचे विद्यापीठ २०१५ पासून दरवर्षी निरंतर विकास अहवाल तयार करत आहे. कोणत्याही विद्यापीठात शिक्षण, संशोधन, विस्तार आणि व्यवस्थापन ही चार प्रमुख प्रकारची कामे असतात. या चारी विभागांत आमचे विद्यापीठ निरंतर विकासाच्या मूल्यांचा अवलंब करते.

Agriculture Technology
Kunbi Record : नागपूर विभागात ८ लाखांवर कुणबी

शिक्षण

एमबीए शिक्षणात शाश्‍वत व्यवसाय आणि पर्यावरण व्यवस्थापन हे महत्त्वाचे विषय शिकवले जातात. भारतातील विद्यापीठांच्या सहकार्याने ऑस्ट्रेलिया-भारत मृद् आणि जलसंवर्धन हा आभासी कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यापीठाने शाश्‍वत पर्यटन विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात समाजातील सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न घटकांशी समायोजन करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी निरंतर विकास उद्दिष्टे समजून देऊन त्यांचा वैयक्तिक आयुष्यात अवलंब करण्याकडे भर दिला जातो. विद्यापीठाने आशियातील विद्यार्थ्यांसाठी एक खास अल्पकालीन कोर्स तयार केला आहे.

संशोधन

शहरीकरणामुळे उभी राहणारी शाश्‍वत विकासाची आव्हाने पेलण्याचे संशोधन करण्यासाठी एक स्वतंत्र केंद्र. शाश्‍वत साधने, लवचिक संरचना आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा संगम करून नावीन्यपूर्ण संशोधन. पुनर्वापरायोग्य काँक्रीट आणि अग्निरोधक बांधकाम साहित्यावर संशोधन.

संरक्षित शेती, परागीकरणासाठी नैसर्गिक घटकांचा वापर, जंगलांतील कार्बन शोषण्याचे प्रमाण अशा अनेक विषयांवर संशोधन.

विस्तार

विद्यार्थी आणि शिक्षकांना जगभरातील पर्यावरणस्नेही उपक्रमांचे उद्गाते आणि कार्यरत तज्ज्ञांशी चर्चा करायला मिळावी यासाठी चर्चासत्रांचे आयोजन. शालेय विद्यार्थ्यांसाठी निरंतर विकासाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ‘हॅक अ थॉन’ उपक्रमाचे आयोजन.

विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि उद्यमशील व्यक्तींना त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणून त्यांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी ‘लाँचपॅड’ सुविधा.

इंडोनेशिया आणि भारतातील विचारप्रवर्तक नेत्यांसाठी जागतिक संवाद परिषदांचे आयोजन.

व्यवस्थापन

विद्यापीठ संचालनातील सर्वच घटकांमध्ये निरंतर विकास उद्दिष्टांचा समावेश. मूळ ऑस्ट्रेलियन रहिवाशांच्या संस्कृती आणि मालकी हक्कांची जाणीव प्रत्येक कार्यक्रमात, प्रकाशनात करून दिली जाते. स्थानिक व्यवसायांकडून आवश्यक सर्व साहित्याचा पुरवठा.

विद्यापीठाचे सर्व प्रक्षेत्र २०२३ पर्यंत कार्बन-तटस्थ करण्याचे उद्दिष्ट. त्यासाठी जास्तीत जास्त अक्षय स्रोतांतून तयार झालेल्या विजेचा वापर. विद्यापीठाच्या विविध परिसरांतील जंगल क्षेत्र आणि जलस्रोतांचे संवर्धन, त्यांच्या व्यवस्थापनातून करोडो रुपयांचे कार्बन क्रेडिट्स मिळवले जातात. वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रभावी पुनर्वापर.

विद्यापीठाचा भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतातील १७ कृषी विद्यापीठांशी सामंजस्य करार. त्याअंतर्गत भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये संशोधन तसेच प्रशिक्षणाची संधी.

Agriculture Technology
Drought Condition : बुलडाणा, लोणार तालुक्यांतील १९ गावांमध्ये ‘मध्यम दुष्काळ’

निरंतर विकास, शिक्षण आणि संशोधनावर भर

वेस्टर्न सिडनी विद्यापीठाला दिलेल्या भेटीमध्ये निरंतर विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेले प्रयत्न आम्ही जाणून घेतले. यातील अनेक उपक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात राबविले जात आहेत. कोकणातील शेती आणि नागरिकांच्या प्रगतीमध्ये गेल्या पन्नास वर्षांत विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.

विद्यापीठात शेती व्यवसायातील निरंतर विकासाचे शिक्षण दिले जाते आणि संशोधन केले जाते. वने, जैवविविधता, मत्स्यसंपदा, कृषी तथा निसर्ग पर्यटनाचा अभ्यास, प्रचार, प्रसार केला जातो. शेतकरी आणि इतर समाज घटकांशी घनिष्ठ संबंध ठेवून सातत्याने त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व उपक्रमांची सुसूत्र मांडणी करण्याचे आणि प्रभाव क्रमवारी प्रक्रियेत भाग घेण्याचे ध्येय विद्यापीठाने ठेवले आहे.

निरंतर शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे

१) गरिबी नष्ट करणे. २) शून्य उपासमार.

३) आरोग्य व लोक कल्याण. ४) गुणवत्तापूर्ण शिक्षण. ५) स्त्री-पुरुष समानता. ६) स्वच्छ पाणीपुरवठा आणि स्वच्छता. ७) सुलभ आणि स्वच्छ ऊर्जा. ८) साजेसा रोजगार आणि आर्थिक वाढ. ९) उद्योग, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधा. १०) असमानता नष्ट करणे. ११) शाश्‍वत शहरे आणि समुदाय.  १२) जबाबदार संसाधन वापर णि उत्पादन प्रक्रिया. १३) हवामानपूरक उपक्रम. १४) पाण्याखालील जीवन. १५) जमिनीवरील जीवन. १६) शांती, न्याय आणि मजबूत संस्था.  १७) उद्दिष्टांसाठी भागीदारी. 

संपर्क : डॉ. विनायक पाटील, ७४९९४३६२५७

(डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. डॉ. विनायक पाटील हे वनशास्त्र महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com