Pune News : केंद्र सरकार शेतीसाठी नव्या योजना आणि तंत्रज्ञानावर भर देत आहे. याआधुनिक कृषी तंत्रे आणि उपकरणांची माहिती देण्यासाठी 'अॅग्रीशुअर फंड' आणि विविध सरकारी योजनांचा लाभ कृषी गुंतवणूकदारांपर्यंत पोहचवण्यासाठी 'कृषी गुंतवणूक पोर्टल' अशा दोन पोर्टलची निर्मिती सरकारने केली आहे. या दोन्ही पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान मंगळवारी (ता. ३) करणार आहेत.
अॅग्रीशुअर फंड आणि कृषी गुंतवणूक पोर्टलची निर्मिती कृषी मंत्रालय आणि नाबार्डकडून करण्यात आली आहे. तर अॅग्रीशुअर फंडातून नव्या उद्योजकांना आणि ग्रामीण उद्योगांना प्रगत तंत्रज्ञानासाठी निधी उपलब्ध करून देण्यात मदत मिळेल असा दावा सरकारने केला आहे. कृषी गुंतवणूक पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी आणि गुंतवणूकदारांना एका सुलभ व्यासपीठावर आणले जाईल. यामुळे व्यावसायिकांना ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात गुंतवणूक करता येईल असेही कृषी मंत्रालयाचे म्हणणे आहे.
अॅग्रीशुअर (AgriSURE) फंड
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मते, कृषी क्षेत्राच्या समृद्धी आणि सक्षमीकरणासाठी अॅग्रीशुअर (AgriSURE) फंड महत्त्वाची भूमिका बजावेल. नावीन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जे शेती सुधारू पाहत आहेत अशा स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योगांसाठी अॅग्रीशुअर फंड नवी दिशा देणारे आहे. या अॅग्रीशुअर फंड पोर्टलमधून शेतकरी आणि उद्योजकांना आधुनिक उपकरणे, प्रशिक्षण आणि बाजारपेठेतील प्रवेशासाठी मदत मिळेल.
पोर्टलचा उद्देश
१) अॅग्रीशुअर फंड पोर्टलमधून शेतकऱ्यांना कर्ज आणि इतर आर्थिक सहाय्य पुरवणे
२) आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती शेतकऱ्यांसह उद्योजकांना पुरवणे
३) शेतकऱ्यांना विपणन धोरणे, बाजारपेठेतील मागणी आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देणे
४) पीक व्यवस्थापन, माती परीक्षण आणि पोषक तत्वांचा वापर यावर सल्ला देणे
५) शेतकऱ्यांना नवीन कृषी कौशल्ये आणि तंत्रज्ञांचे प्रशिक्षण देणे
कृषी गुंतवणूक पोर्टल
भारतातील कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी गुंतवणूक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. याचा उद्देश शेतकरी आणि गुंतवणूकदारांना एका सुलभ व्यासपीठावर आणणे आहे. तर या पोर्टलमुळे शेतकरी आणि गुंतवणूकदार एकमेकांशी जोडले जातील आणि कृषी क्षेत्रातील सामूहिक प्रयत्नांद्वारे विकास करता येईल.
पोर्टलचा उद्देश
१) पोर्टल विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासह कृषी गुंतवणूकदारांसाठी कृषी गुंतवणूक पोर्टल सुलभ व्यासपीठ असेल
२) भारताच्या कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणे आणि कृषीच्या सर्व उप-क्षेत्रांच्या क्षमतेचा वापर करणे
३) गुंतवणूकदारांना विविध कृषी योजना, अनुदान आणि गुंतवणुकीच्या संधींची अचूक माहिती एकाच ठिकाणी देणे.
४) राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या योजना, धोरणे आणि प्रोत्साहनांसह गुंतवणूकदार आणि कंपन्यांना सहकार्य करणे
५) कृषी विकासाला गती देण्यासाठी कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहित केलं जाईल. यामुळे शेती विकासाला चालना मिळेल
६) भारतात उपलब्ध असलेल्या प्रमुख पायाभूत सुविधांबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शन आणि मदत करणे
या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी आणि रामनाथ ठाकूर देखील उपस्थित राहणार आहेत. कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेंतर्गत चांगल्या कामगिरीसाठी बँका आणि राज्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी शिवराज चौहान विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांना ग्रीनॅथॉन AIF एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करतील.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.