Milk Powder : राज्यात अडीच लाख टन दूध भुकटी पडून

Decision on import of Milk Powder : राज्यात अडीच लाख टन दूध भुकटीचा साठा पडून असताना केंद्र शासनाने भुकटी आयातीचा निर्णय घेतल्याने डेअरी उद्योगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Milk Powder
Milk PowderAgrowon

Pune News : राज्यात अडीच लाख टन दूध भुकटीचा साठा पडून असताना केंद्र शासनाने भुकटी आयातीचा निर्णय घेतल्याने डेअरी उद्योगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ‘‘भुकटी आयातीचा बेअकली निर्णय केंद्राने तत्काळ रद्द करावा,’’ अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.

व्यापार महासंचालनालयाने घेतला तुघलकी निर्णय :

विदेश व्यापार महासंचालनालयाचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी बुधवारी (ता. २६) सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, दहा हजार टन दूध व साय आयात करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मात्र, ही आयात भुकटी, दाणेदार किंवा घन पदार्थ रूपात असेल, अशी अट टाकण्यात आली आहे. विदेश व्यापार महासंचालनालय हे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या अख्यत्यारित काम करते. त्यामुळे श्री. गोयल यांनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या या तुघलकी निर्णयाला मान्यता दिलीच कशी, असा सवाल डेअरी उद्योगातून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी देशात सद्यःस्थितीत सर्वात चांगला जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादनाचा उल्लेख केला जातो. राज्यातदेखील दूध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थिरता मिळाली आहे. परंतु, दुधाचे खरेदी दर पूर्णतः दूध भुकटी व लोण्याच्या दराशी निगडीत असतात. भुकटीला सध्या चांगले भाव नाहीत व मागणीदेखील नाही. त्यामुळे भुकटीचे मोठमोठे साठे पडून आहेत; परिणामी शेतकऱ्यांना गाय दुधासाठी सध्या प्रति लिटर अवघा २७ ते २८ रुपये दर दिला जात आहे.

Milk Powder
Milk Producer: सरकारच्या धोरणामुळे दूध उत्पादकांना फटका

आयातीच्या निर्णयामुळे चिंता वाढली : कुतवळ

दूध भुकटी आयातीचा निर्णय चुकीचा असल्याचे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने म्हटले आहे. संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले की, दहा हजार टन भुकटीची आयात करण्याची घोषणा केंद्राने केली आहे. अद्यापही एक किलोदेखील भुकटी आयात झालेली नाही. परंतु, त्याबाबत उलटसुलट बातम्या येऊ लागल्यामुळे बाजारपेठेत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. भुकटीचे साठे पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी कमी दर दिले जात आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याऐवजी भुकटीच्या आयातीचा निर्णय जाहीर झाल्यामुळे शेतकरी अजून अडचणीत येतील.

नफेखोरांनी पोळी भाजू नये : नरके

डेअरी उद्योगातील तज्ज्ञ व ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारातील करारमदार जपण्यासाठी दूध भुकटी आयातीची केवळ घोषणा झाली आहे. परंतु, देशात भुकटीचे मोठे साठे असल्यामुळे पुन्हा एनडीडीबीकडून भुकटीची आयात अजिबात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये. तसेच, ही गोंधळाची स्थिती पाहून दुधाचे दर पाडण्याचा प्रकार कोणत्याही सहकारी किंवा खासगी डेअरी करू नये.

Milk Powder
Milk Powder Import : गरज नसताना १० हजार टन दूध पावडर आयात; अजित नवलेंची सरकारवर टीका

भारत हा आता जागतिक बाजार व्यवस्थेतील विविध करार प्रणालीचा सदस्य आहे. त्यामुळे आयात निर्यातीच्या घोषणा कराव्या लागतात. २०२० व २०२२ मध्येदेखील दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची घोषणा केली गेली होती. परंतु, प्रत्यक्षात आयात झाली नव्हती आणि तीच स्थिती यंदादेखील असेल. परंतु, ही स्थिती पाहून डेअरी उद्योगातील नफेखोर घटकांनी आपली पोळी भाजू नये. आपल्याला शेतकऱ्यांचा विचार प्राधान्याने करण्याची हीच वेळ आहे.

भुकटीची लॉबी पाडते दर : शेट्टी

‘स्वाभिमानी’चे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आधीच लुटला जात आहे. दर पाडल्यामुळे तो हवालदिल झालेला असताना त्यात पुन्हा अक्कल गहाण टाकलेल्या केंद्राने भुकटी आयातीचा निर्णय घेत दुधाचे भाव पाडायला प्रोत्साहन दिले आहे. आधीच काही मोजके दूध भुकटी प्रकल्पचालक राज्यातील दुधाच्या बाजारपेठेचा खेळ करीत आहेत.

भुकटीवाल्यांनी शेतकऱ्यांच्या दुधाचे दर पाडलेले आहेत. कोल्हापूर भागात गोकुळ, वारणा व स्वाभिमानी डेअरी प्रकल्प तोटा सहन करीत शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३२-३३ रुपये दर देत आहे. राज्यात इतर भागात केवळ २५ ते २७ रुपये दर दिला जात आहे. या स्थितीला केवळ भुकटी लॉबी जबाबदार आहे. कोविड काळात भुकटीला दर मिळू लागताच केवळ याच लॉबीने भाव फुगवले व अकारण ३५ रुपयांपर्यंत नेले. भुकटीमधील नफा संपताच ही लॉबी दुधाचे भाव पाडते. मात्र, मूर्ख सरकारने या समस्येवर उपाय शोधण्याचे सोडून आयातीचा निर्णय घेत आगीत तेल टाकले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com