
Crop Protection : पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव हा बुरशीमुळे (Fungus) होतो. असते. बुरशीमुळे पिकांवर येणाऱ्या रोगांना ‘बुरशीजन्य रोग’ असे म्हणतात. या बुरशी जशा हानिकारक असतात, तसेच काही बुरशी या पिकांसाठी उपयुक्त देखील असतात. त्यांना आपण ‘मित्र बुरशी’ असे म्हणतो. यामध्ये बिव्हेरिया, मेटाऱ्हायझियम, व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसीस, मायकोरायझा अशा विविध प्रकारच्या बुरशींचा समावेश होतो. आजच्या लेखात ट्रायकोडर्मा या बुरशी विषयी माहिती घेऊ.
बुरशीची माहिती
बुरशीचे नाव : ट्रायकोडर्मा
वर्ग : बुरशी (Fungi)
बुरशीचे फायलम : Ascomycota
महत्त्वाच्या प्रजाती : अ) ट्रायकोडर्मा व्हिरीडी (Trichoderma viride),
ट्रायकोडर्मा हर्जियानम (Trichoderma harzianum)
परजीवी प्रकार : वैकल्पिक परजीव (facultative Parasite)
ओळख
ट्रायकोडर्मा हा मित्र बुरशीचा ‘ॲसकोमायकोटा’ (Ascomycota) या फायलममधील एक जीनस आहे. तो साधारणतः जमिनीमध्ये आढळून येतो. या जीनसमधील आतापर्यंत साधारणतः ४६६ वेगवेगळ्या प्रजातीची (Species) ओळख पटलेली आहे. त्यापैकी ‘ट्रायकोडर्मा व्हिरीडी’ आणि ‘ट्रायकोडर्मा हर्जियानम’ या दोन प्रजाती मुख्यत: सर्वांना परिचित आहेत. ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी जमिनीतील हानिकारक बुरशीचे नियंत्रण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बुरशी आहे.
पोषक वातावरण
ट्रायकोडर्माच्या चांगल्या वाढीसाठी दमट आणि पावसाळी वातावरण पोषक असते. वाढीसाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. काही प्रजाती या ४५ अंश सेल्सिअस तापमानात देखील तग धरून राहतात.
ट्रायकोडर्माची रोग नियंत्रण प्रणाली
ट्रायकोडर्मा बुरशी वेगवेगळ्या प्रकारे हानिकारक बुरशींना नष्ट करण्याचे काम करते.
अ) स्पर्धा ः ट्रायकोडर्मा बुरशी इतर हानिकारक बुरशींपेक्षा अतिशय जलद आणि मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे इतर बुरशींच्या वाढीसाठी जागा शिल्लक राहत नाही.
ब) परजीवी ः ट्रायकोडर्मा बुरशीचे तंतू हानिकारक बुरशीच्या तंतूमध्ये शिरकाव करतात. त्यानंतर त्यामधील अन्नद्रव्यांचे शोषण करून हानिकारक बुरशीला मारतात.
क) रासायनिक पद्धत ः ट्रायकोडर्मा अनेक प्रकारची संप्ररके (एन्झायम) आणि मेटाबोलाइट तयार करतात. त्यामुळे हानिकारक बुरशीच्या पेशी आणि पेशीभित्तिका खराब होतात किंवा त्यांच्यामधील जैविक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊन बुरशीचा नाश होतो. उदा. ट्रायकोडर्मा व्हिरीडी ही बुरशी ‘व्हिरीडीन’ नावाचे संप्रेरक बनवते. जे बुरशीनाशक म्हणून काम करते.
ड) प्रतिकारशक्ती ः ट्रायकोडर्मा बुरशी काही काही विशिष्ट रसायने तयार करते. जसे की पेरॉक्सिडेज आणि फिनिलालॅनिन अमोनियालेज (peroxidase and phenylalanine ammonia lyase). हे झाडांना विशिष्ट संदेश देऊन त्यांची प्रतिकारशक्ती जागृत करायला भाग
पाडते.
इ) मुळांची वाढ ः ट्रायकोडर्मा काही वाढ सुधारक तयार करतात. जसे की ऑक्झिन्स, सायटोकायनिन आणि जिबरॅलिन. त्यामुळे मुळांची वाढ जास्त होऊन झाडे रोग प्रतिकारक्षम बनतात.
या रोगांसाठी जास्त उपयुक्त
जमिनीतून प्रादुर्भाव करणारे रोग जसे की, फ्युझॅरिअम मर रोग, स्क्लेरोशिया मर रोग, रायझोक्टोनिया मर, पिथीयम मर, फायटोफ्थोरा
रोग.
ट्रायकोडर्माचे इतर उपयोग
शेतातील काडी, कचऱ्याचे लवकर विघटन होते.
पिकांना लोह आणि मॅंगेनीज जास्त प्रमाणात उपलब्ध होते.
पिकांची जोमदार वाढ होते.
वापर करण्याची पद्धत
जमिनीवर फवारणी अथवा धुरळणी करावी.
शेणखतामध्ये मिसळून शेतात टाकावे.
बीजप्रक्रिया करावी.
आळवणीद्वारे वापर.
उसाचे कांडे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
भाजीपाल्यांची मुळे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
ट्रायकोडर्मा कुठे दिसून येतो ?
शेतात कुजलेल्या वस्तूंवर ट्रायकोडर्माची वाढ दिसून येते.
ऊस पिकात खाली पडलेल्या चीपट (पाने) व लावलेल्या सेटच्या वरील बाजूला ट्रायकोडर्मा दिसतो.
द्राक्ष पिकात खोडावर, चिरलेल्या द्राक्ष मण्यांवर.
सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते ?
आपण ट्रायकोडर्मा बुरशीचे बीजाणू सूक्ष्मदर्शिकेखाली स्पष्टपणे पाहू शकतो. ट्रायकोडर्मा बुरशीचे तंतू हे पांढरे रंगाचे किंवा रंगहीन असतात. बीजाणू हे हिरवट रंगाचे देखील असतात, त्यामुळे ट्रायकोडर्माची वाढ नेहमी हिरव्या रंगाची दिसते. अलैंगिक बीजाणू (Conidia), बीजाणू दंड (Conidiophore) आणि ट्रायकोडर्माचे वैशिष्ट्यपूर्ण असे ‘फियालाइड्स’ सूक्ष्मदर्शिकेखाली पाहता येतात.
बीजाणू दंड हे झाडाच्या फांद्यासारखे वरच्या बाजूला निमुळते होत जातात. त्यांचा आकार पिरॅमिड सारखा दिसून येतो.
बीजाणू हे गोलाकार असतात. बीजाणू फियालाइड्सवर (phialide) असतात.
फियालाइड्स हे वरील बाजूला निमुळते, मध्यभागी फुगलेले व खालील बाजूस पसरट झाडाच्या पानासारखे दिसते. फियालाइड्स हे बीजाणू दंडाच्या प्रत्येक शाखेवर असतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.