डॉ. गणेश पवारSugarcane Farm Management: हंगामामध्ये तोडणी तसेच वाहतुकीसाठी उष्ण, कोरड्या हवामानाची गरज असते. जमिनीलगतच्या कांड्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीलगत तोडणी महत्त्वाची आहे.तोडणी जमिनीलगत न झाल्यास उत्पादनात हेक्टरी साधारणपणे ५ ते १० टन तूट येऊ शकते. हे लक्षात घेऊन तोडणी व्यवस्थापन महत्त्वाची बाब आहे..तुरा आलेला ऊस हा एक प्रकारे हानिकारक तसेच फायदेशीर ठरणारा घटक आहे. त्यामुळे ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात घट येते. उसाला आलेला तुरा फायदेशीर ठरतो. कारण तुरा येत असताना आणि आल्यानंतर उसामध्ये ८ ते १० आठवड्यापर्यंत साखर सर्वोच्च पातळीवर जाते. त्या वेळेस जर हा तुरा आलेला ऊस तोडला गेला तर त्यातून चांगला साखर उतारा मिळतो..नुकताच तुरा आलेला ऊस आणि तुरा येऊन तीन महिने झालेल्या उसाची तोडणी केली तर साचलेल्या साखरेचे विघटन होऊन वजन आणि उताऱ्यात घट येते. तुरा आलेल्या उसाची गुणवत्ता आणि उत्पादन हे लागणीच्या वेळेवर बरेचसे अवलंबून असते. वेळेत लागण केलेल्या उसाला आलेला तुरा हा गुणवत्ता, उत्पादन आणि उताऱ्यावर सकारात्मक परिणाम करतो..परंतु त्या तुलनेत उशिरा लागण केलेल्या उसाला आलेला तुरा हा गुणवत्ता, उत्पादन व साखर उताऱ्यास मारक ठरतो. त्यामुळे तुरा येणाऱ्या वाणांची लागण वेळेत व लवकर करावी. तुरा आल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांच्या आत तोडणी करावी. त्यानंतर मात्र उसामध्ये चोयटा आणि तंतुमय पदार्थ वाढून साखरेचे प्रमाण कमी होऊन ऊस आणि साखरेचे उत्पादन घटते. .Sugarcane Season : आम्ही चाललो ऊस तोडणीला....हवामान परिस्थितीमध्यम ते कमी आद्रता, मोजके सिंचन, रात्रीचे कमी तापमान, दिवसाचे उष्ण हवामान उसाच्या पक्वतेसाठी पोषक असते. अशा हवामानाचा फायदा मिळण्यासाठी ऊस वाढीसाठी पोषक वातावरण मिळायला हवे. तोडणी हंगामामध्ये तोडणी तसेच वाहतुकीसाठी उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते, त्या कालावधीत जर पाऊस आला तर तोडणी, वाहतूक आणि रसाची गुणवत्ता ढासळते. .तोडणी पूर्वीचे सिंचनपरिपक्वतेच्या कालावधीत वाढ थांबल्यानंतरच पेरामध्ये साखर उतरली जाते. त्यासाठी नियंत्रित सिंचन पाळ्यांचे नियोजन करावे लागते. वेगवेगळे वाण आणि लागणीच्या वेळेनुसार तोडणीचे वय सर्वसाधारणपणे ११ ते १६ महिन्यांपर्यंत असते. उन्हाळ्यातील उशिराच्या तोडणी कालावधीमध्ये साखरेचा ऱ्हास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उताऱ्यात घट येते. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या पाळ्यांचे योग्य नियोजन करून ही घट काही प्रमाणात टाळता येऊ शकते..तोडणी कामगारकारखाना कार्यक्षेत्रावर चांगल्या प्रकारची तोडणी करणाऱ्या मजुरांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. यांत्रिकीकरणाला सुद्धा भौगोलिक विविधतेमुळे मर्यादा येतात. त्यामुळे मजूर व यांत्रिक तोडणीचा समतोल साधावा लागणार आहे.दररोजच्या गाळप क्षमतेएवढा ऊस गाळपास पुरवण्याकरता आवश्यक मजुरांची उपलब्धता असावी लागते. ज्या शेतकऱ्यांचा ऊस चांगला, न लोळलेला,रस्त्याच्या लगतचा असतो अशा उसाची तोडणी मजूर अगोदर करतात. त्यामुळे कमी प्रतीच्या उसाला तोडणी मजूर मिळत नाहीत.ऊस तोडल्यापासून गाळप होईपर्यंत लागणारा वेळ हा अयोग्य तोडणी व्यवस्थापनामुळे वाढत आहे.तोडलेला ऊस फडात तसेच यार्डावर लवकर नंबर न आल्याने रांगेत वेळ जाऊन तसाच एक दोन दिवस राहतो. त्याचीही परिणाम होतो. .यांत्रिक ऊस तोडणीऊस शेतीचे यांत्रिकीकरण भविष्यकाळात अटळ आहे. सद्यःस्थितीत बऱ्याच कारखान्यांनी या मशीनच्या माध्यमातून तोडणीचा अवलंब केला आहे..Sugarcane Crop Management : पूरबाधित ऊस क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना.ऊस तोडणीची पद्धत कार्यक्षम प्रकारच्या तोडणीसाठी चांगली अवजारे असावीत.जमिनीलगतच्या कांड्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीलगत तोडणी करणे अत्यंत महत्त्वाची आहे. जर तोडणी जमिनीलगत झाली नाही तर साधारणपणे ५ ते १० टन/ हेक्टरी (०.५ ते १ टन साखर) उत्पादनात तूट येऊ शकते. जमिनीलगत तोडणी झाल्यास खोडवा पीक व फुटवे चांगल्या प्रकारे येतात. यंत्राद्वारे उसाचे तुकडे करून तोडणी केल्यामुळे गाळप होईपर्यंत कांड्यामध्ये ल्युकोनाँस्टिक जिवाणू आणि इतर बुरशींची वाढ होऊन उसाचा ऱ्हास होतो. तसेच रसाची गुणवत्ता कमी होऊन उतारा आणि टनेजमध्ये घट होते. ही घट तुटलेला ऊस ८ ते १० तासामध्ये गाळपास गेला तर कमी करता येऊ शकते..बाह्य पदार्थ टाळणे तोडणी करताना पानफुटवे, पाचट, मुळ्या चिखल, वाळलेला, रोगग्रस्त व उसाला वेढलेल्या वेलवर्गीय तणांचे अवशेष उसाबरोबर जाणार नाही याची काळजी घ्यावी. रसाच्या शुद्धीकरणासाठी जास्त वेळ व खर्च येऊ शकतो. पान फुटव्यांमध्ये (वॉटरशूट) सुक्रोजचे प्रमाण कमी असते.सध्या कारखान्याकडून मजुरांच्या साह्याने तुटलेल्या उसाची मोळी बांधण्यासाठी १ टक्के आणि यंत्राच्या साह्याने तुटलेल्या उसाचे ४. ५ टक्के प्रमाण ग्राह्य धरून ही घट एकूण टनेजमधून वजावट करण्याची पद्धत आहे..ऊस वाहतूकतुटलेला ऊस २४ तासाच्या आत गाळपास गेला पाहिजे. बैलगाडी, ट्रक व ट्रॅक्टर ट्रॉली यार्डवर थांबण्याची वेळ ही दोन तासापेक्षा जास्त नसावी. सद्यःस्थितीत काही कारखान्याचा हा कालावधी १० ते १२ तासापेक्षा जास्त आहे.वाहतूक करणाऱ्या मालकांना वेळेवर मोबदला मिळायला हवा. इतर सुविधा (इंधन, टायर दुरुस्ती व डागडुजी) यांची व्यवस्था कारखाना परिसरात उपलब्ध असावी, म्हणजे वेळ वाचेल. वाहतूक यंत्रणा गतिमान होईल..आर्थिकदृष्ट्या कमाल वाहतूक अंतरप्रत्येक कारखान्याने ऊस वाहतुकीच्या दृष्टीने परवडेल असे कमाल अंतर ठरवावे. तामिळनाडूमध्ये केलेल्या कमाल आर्थिक वाहतूक अंतराच्या अभ्यासामध्ये १० ते २६ किलोमीटर एवढे अंतर हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसून आले आहे.दोन कारखान्याच्या स्पर्धेमुळे तसेच इतर काही कारणामुळे कारखान्यास दूरच्या अंतरावरून ऊस (गेट केन) आणावा लागतो, त्यामुळे लांबच्या शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा जास्तीचा खर्च हा जवळच्या शेतकऱ्यांना भरावा लागतो. त्यातून जवळच्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. .ऊस वाहतुकीचा प्रकार हा कारखान्यापासूनच्या अंतरानुसार ठरतो. ऊस क्षेत्र कारखान्याच्या १० किलोमीटर परिसराच्या परिघातील असेल तर अशा ठिकाणी बैलगाडी वाहतूक किफायतशीर ठरते. लांब अंतरासाठी ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रक उपयुक्त ठरतात. त्यासाठी कारखाना स्तरावर ऊस वाहतूक करणाऱ्यांसाठी अल्प दरातील वाहन खरेदीसाठी कर्ज किंवा हार्वेस्टर विकत घेण्यासाठी अनुदान, अल्प दरातील दीर्घ कालावधीतील कर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी..तोडणीपश्चात होणारा ऱ्हास वाहतूक यंत्रणेतील अयोग्य नियोजनामुळे गाळपास उशीर झाल्यास रस गुणवत्तेमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन प्रत खालावण्यास सुरुवात होते. या ऱ्हासाची वेगवेगळी कारणे आहेत. यामध्ये वाण, पक्वता कालावधी व हवामान परिस्थिती इत्यादी. या व्यतिरिक्त ऊस वजन आणि रसातील सुक्रोजमध्ये घट होते. उसातील अशुद्ध घटकांमुळे रस शुद्धता, गाळप क्षमतेच्या समस्या निर्माण होतात. यातून बाष्पीभवनाने मिळणाऱ्या मदर लिकरमध्ये मिश्रित साखरेचे वस्तुमान आणि साखरेचे स्फटिकीकरण प्रक्रियेवर परिणाम होतो. डेक्सट्रानची पातळी ५०० पीपीएमच्या पुढे गेली तर सुईच्या आकाराचे साखरेचे स्फटिक तयार होतात. त्यामुळे ते मळीपासून वेगळे करण्यास अडचण येते..ऊस तोडल्यापासून गाळपास ४८ तासापेक्षा अधिक कालावधी लागला तर साखरेचे प्रमाण कमी होते. यांत्रिक पद्धतीने (हार्वेस्टर) तोडणी केल्यास तुकड्याच्या दोन्ही बाजूकडून साखरेचे प्रमाण कमी होते. उसातील साखरेची घट कमी करण्यासाठी कमीत कमी वेळेत तोडलेल्या उसाचे गाळप करावे..तुटलेल्या उसाची घट कमी करण्याच्या उपाययोजनातुटलेला ऊस जलद वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करून गाळपास पाठवावा.ऊस तोडणीपूर्वी पॉलिसीस रसायानाची फवारणी करावी. त्यामुळे उसाच्या गुणवत्तेबरोबर ऱ्हास कमी प्रमाणात होतो.शक्य असेल तर ट्रक, ट्रॉली सावलीत उभी करावी किंवा शेतातील उसाच्या मोळ्यांवरती पाचट झाकावे..केन यार्ड केन यार्डात आलेल्या वाहनांना सुलभतेने वाहन खाली करता यावे, गर्दीच्या वेळेला थांबण्यासाठी योग्य जागा असावी. यार्ड परिसरात मोठी झाडे किंवा सावलीची सोय असावी. जेणेकरून बैल, कामगार, वाहन चालकांना सावलीत विश्रांती घेता येईल, ऊस देखील सावलीत राहील..शेतकऱ्यांचे प्रबोधनशेतकऱ्यांना हंगाम व वाणनिहाय लागवडीचे महत्त्व पटवून त्यांना पक्वतेनुसार ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. कोएम-०२६५ हा उशिरा पक्व होणारा वाण आहे. त्यामुळे त्याची लागवड आडसाली करावी म्हणजे १४ ते १५ महिन्यात पक्व होऊन त्याच्या लागण नोंदीनुसार तोडला जाईल. त्यामुळे उत्पादन आणि उतारा चांगला मिळेल.पक्वता गट व लागण नोंदीनुसार तोडणी वेळापत्रक तयार करावे. तोडणी अगोदर एक महिना शेतकऱ्यांना तोडणीची कल्पना द्यावी, म्हणजे ते सिंचन कमी करतील..काही वेळेस नैसर्गिक आपत्ती (पूर), आग किंवा तुरा येऊन दीड- दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर अग्रक्रमाने हा ऊस तोडणीस घ्यावा.ऊस तुटल्यावर जलद गतीने गाळपास न्यावा.नियमाप्रमाणे १४ दिवसाच्या आत त्याच्या टनेजनुसार रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) मिळणे आवश्यक आहे..तोडणीपश्चात उसाच्या ऱ्हासाची तीव्रताऊस तोडल्यानंतर आणि वाहतुकीदरम्यान, गाळपास उशीर झाल्यास त्यातील ओलावा कमी होऊन वजनात घट येते. ल्युकोनाँस्टिक जिवाणूंमुळे जैविक विघटन होते. ऊस तुटलेल्या क्षणापासून हे जिवाणू कांड्यामधून प्रवेश करतात. एका तासांमध्ये प्रवेश केलेल्या भागापासून २० सेंटिमीटर आतमध्ये प्रवास करतात. हे जिवाणू सुक्रोजचे विघटन करून डेक्सट्रॉन आणि डिंकयुक्त चिकट पदार्थांची निर्मिती करतात..एका अभ्यासानुसार तोडणीपश्चात ऊस रसामध्ये ३८ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाला १५ टक्के रसांमधील ओलाव्यात घट येते. वजनातील घट ही ऊस तोडणी वेळची पक्वता वय आणि त्या भागातील हवामानावर अवलंबून असते. उष्णकटिबंधीय भागामध्ये तोडणी केल्यापासून प्रत्येक २४ तासात ही घट १.५ ते २.३ टक्के झाल्याचे आढळून आले आहे. उन्हाळ्यातील हंगामामध्ये ही घट २५ टक्क्यांपर्यंत वाढत जाते. त्या तुलनेने हिवाळ्यामध्ये ही घट कमी प्रमाणात असते, त्यामुळे भारतातील तोडणी हंगाम हा हिवाळ्यात सुरू करतात.- डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७(लेखक ऊस पीक तज्ज्ञ आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.