
Solapur News : टिपेश्वर अभयारण्यातील टी-२२ या वाघिणीचा बछडा स्वत:ची हद्द निश्चित करण्यासाठी मे २०२३ मध्ये अभयारण्यातून बाहेर पडला. १९ डिसेंबर २०२४ रोजी येडशी अभयारण्यातील कॅमेऱ्यात पहिल्यांदाच कैद झाला.
मागील २३ दिवसांत त्याने बार्शी आणि धाराशिवमधील सुमारे १५ ते २० जनावरांवर हल्ले केले आहेत. मात्र, मानवी वस्तीपासून तो दूर असून फक्त एकदाच पाच सेंकदासाठी तो कारी येथे मानवी दृष्टीस पडला आहे. मात्र, त्याचा दरारा बार्शी व धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटक्षेत्रात कायम आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील पंधरा वर्षात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनानांतर बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. वाढत्या ऊस क्षेत्रामुळे अनेक बिबटे सोलापूर जिल्ह्यातच जन्मले आणि वाढले आहेत.
मात्र, सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यात मागील पन्नास वर्षांत कुठेही वाघ दिसल्याची नोंद नाही. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून मे २०२३ मध्ये एक बछडा बेपत्ता झाला. २०२२ मध्ये टी-२२ हा सांकेतिक क्रमांक असलेल्या वाघिणीचा हा बछडा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून बेपत्ता झालेला बछडा नांदेड जिल्ह्यातील काही गायींवरील हल्ल्यामुळे या परिसरात वावरत असल्याचा वन्यजीवप्रेमी व वनधिकाऱ्यांचा अंदाज होता. त्यांनतर तो तेथूनही गायब झाला. सुमारे पाचशे किलोमीटरचे अंतर पार करत येडशी (जि. धाराशिव) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात तो १९ डिसेंबरला कैद झाला.
त्यापूर्वी तो कधी तिथे पोचला याची निश्चित माहिती नसली तरी कॅमेऱ्यात कैद होण्यापूर्वी २० दिवस ते एक महिना आलेला असावा, असा तेथील वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. टिपेश्वरपासून येडशी अभयारण्य गाठेपर्यंत तो ना कुणाच्या दृष्टीस पडला ना कुठे कॅमेऱ्यात कैद झाला.
क्षेत्रनिश्चितीसाठी फिरणारा पौगंडावस्थेतील बछडा
बार्शी तालुक्यात फिरणारा वाघ पूर्ण वाढ झालेला वाघ नसून, पौगंडावस्थेतील बछडा आहे. २०२२ मध्ये तो जन्मलेला असून, सध्या त्याचे वय अडीच वर्षांहून अधिक व तीन वर्षांपेक्षा कमी आहे. एका प्रौढ वाघाचा व्यवस्थित अधिवास तयार होण्यासाठी किमान दहा हजार एकर जंगल आवश्यक आहे.
मात्र, बार्शी तालुक्यालगत असलेले येडशी अभयारण्य हे २२३७.५ हेक्टर अर्थात पाच हजार ५९३.७५ एकर आहे. या अभयारण्यालाच्या अगदी लगत बार्शी वन विभागाचे काही क्षेत्र आहे. मात्र, वाघाचे अस्तित्व कामय राहील इतके पुरेशे क्षेत्र आणि वन्यप्राण्यांचे प्रमाण कमी आहे. पुरेशा शिकारी न मिळाल्यामुळे या वाघाचा येथे अधिवास निश्चित होणे कठीण आहे.
असा लागला वाघाचा तपास
धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, कळंब, वाशी या तालुक्यात नोव्हेंबर व डिसेंबर पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले वाढले. नुकसान भरपाईसाठी करण्यात आलेल्या पंचनाम्यात हल्ला करणाऱ्या वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे हे बिबट्याच्या पायांच्या ठशापेक्षा मोठे वाटल्यामुळे धाराशिवचे उपवनसंरक्षक किशोर पौळ यांना संशय आला. त्यांनी येडशी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांना अभयारण्यातील पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावेत, अशी सूचना केली.
येडशी येथील पाणवठ्यावरील ट्रॅप कॅमेऱ्यात १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदाच या वाघाचे छायाचित्र कैद झाले. यामुळे या परिसरात वाघाचा वावर सुरू झाल्याचे समजले. तेव्हापासून धाराशिव वनविभाग, येडशी अभयारण्य वन्यजीव विभाग व सोलापूर वनविभाग संयुक्तपणे वाघाच्या पाळतीवर आहेत.
२३ दिवसांत धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात या वाघाचा वावर कायम आहे. वाघ कॅमेऱ्यात जरी १९ डिसेंबरला कैद झाला असला तरी त्यापूर्वी २० दिवस ते एक महिना येडशी परिसरात वावरत असावा, असा अंदाज येडशी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
परतण्याची शक्यता कमीच
टिपेश्वर अभयारण्यात २०२२ मध्ये जन्मलेल्या या वाघाचे सध्याचे वय अडीच वर्षाहून अधिक व तीन वर्षापेक्षा कमी आहे. यापैकी पंधरा ते १८ महिन्याचा होईपर्यंत तो आईसोबत टिपेश्वर अभयारण्यात वावरला आहे. त्यावेळी या अभयारण्यातील कॅमेऱ्यात तो दिसलेला आहे. मे २०२३ ते जानेवारी २०२५ हे सुमारे १९ महिने तो हद्द निश्चित करण्यासाठी संघर्ष करत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाढत्या वाघांची संख्या पाहता तो परत माघारी जाणे कठीण आहे.
यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यातून मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यात आलेला वाघ चार वर्षांपासून गौताळा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथेच ठाण मांडून आहे. यामुळे हा वाघ देखील स्वत:हून परत जाण्याची शक्यता कमी आहे. कळंब येथील बावी गावाजवळ सोलापूर-धुळे हा सहापदरी महामार्ग ओलांडून परत गेलेला हा वाघ पुन्हा माघारी आलेला आहे. यावरून त्याला परत टिपेश्वरकडे जाण्यात रस आहे, असे वाटत नाही.
हल्ल्यातील बाधितांचा तपशील
ता. गाव शेतकरी पाळीव प्राणी
१६ डिसेंबर चारे पंढरीनाथ देशमुख २ गाय
१६ डिसेंबर उक्कडगाव सतीश सोनवणे १ कालवड
१७ डिसेंबर चारे रोहिणी कात्रे १ बोकड
१९ डिसेंबर ढेंबरेवाडी सोहम तापकिरे १ गाय
२२ डिसेंबर पांढरी सर्जेराव गवाले १ म्हैस जखमी
१ जानेवारी चारे प्रताप जगदाळे १ गाय
७ जानेवारी मुंगशी (आर) राहुल कुरुंद २ वासरे
८ जानेवारी राळेरास दशरथ जाधव १ वासरू
८ जानेवारी राळेरास वासुदेव आवारे १ रेडकू
९ जानेवारी वैराग (लाडोळे हद्द) विनायक खेंदाड १ बैल
१० जानेवारी लाडोळे संदीप सावंत १ गाय
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.