Maharudra Manganale: ही देखणी विहीर निळ्याशार पाण्यामुळे छोट्या समुद्रासारखी वाटते...

उन्हाळ्यात जनावरांना पाणी पाजवताना मोठी दमछाक व्हायची. अशा काळातही वडिलांनी आंब्याची झाडे सांभाळली. या विहिरीवर सुरुवातीला मोट होती.
Well Scheme
Well SchemeAgrowon
Published on
Updated on

Maharudra Manganale मी शेतात घर बांधलंय. मी तिथंच राहतो. त्याचं नाव आहे रूद्रा हट. तिथं एक विहीर (Well) आहे. पाण्यानं काठोकाठ भरलेली, सुंदर कठडा असलेली ही विहीर म्हणजे रूद्रा हटचं (Rudra Hut) भूषण आहे.

या विहिरीच्याही आयुष्याचे अनेक टप्पे आहेत. मागेच शेतात माईशी बोलताना या विहिरीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माय सांगत होती की, आता जिथं विहीर आहे तिथून जवळपास आठ-नऊ महिने पाणी वहायचं. तिथं छोटासा चलमा होता. तेच पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं.

त्यावेळी या परिसरात एकही विहीर नव्हती. माझ्या जन्माच्या आधी दोन वर्षे म्हणजे १९५८ च्या सुमारास वडिलांनी विहिरीचं काम सुरु केलं. तेव्हा पुरुषांना सव्वा रुपया तर स्त्रियांना दहा आणे रोजगार होता. साधारण आठ महिने हे काम चालले.

पंचवीस फुटाची विहीर. तिचा घेरा वरच्या बाजूला मोठा, तो खाली कमी होत गेलेला होता. विहिरीत उतरता यावे म्हणून एका बाजूने तीन टप्पे ठेवण्यात आले. शेवटचा पाच फुटाचा भाग एकाच कोपर्‍यात गोलाकार खोल करण्यात आला होता.

त्याला आम्ही आडी म्हणायचो. मे-जूनमध्ये अनेकदा पाणी या आडीपर्यंतच राहायचे. खाली उतरून घागर भरून वर न्यावे लागायचे.

Well Scheme
Maharudra Manganale: जनावरं राखा; पंधरा दिवसांत वजन कमी होईल

उन्हाळ्यात जनावरांना पाणी पाजवताना मोठी दमछाक व्हायची. अशा काळातही वडिलांनी आंब्याची झाडे सांभाळली. या विहिरीवर सुरुवातीला मोट होती. त्या काळात शेतात ऊस होता. या उसाच्या व मोटीच्या आठवणी अस्पष्ट आहेत. एका वर्षी खूप जाडजूड ऊस आला होता हे आठवतं. ऊस गाळण्यासाठी गावातीलच पाटलाच्या मळ्यात नेला होता, ते मात्र ठळकपणे आठवतं.

त्यानंतर किर्लोस्कर कंपनीचे इंजिन आले. गहू व भाजीपाला लागवड सुरु झाली. हे इंजिन मी अनेक वेळा सुरु केल्याचं आठवतंय. इंजिनमधून निघणारा धूर व त्याचा आवाज आजही स्मरणात आहे. मी चौथी- पाचवीत असतानाच, वडिलांनी एकदा मला विहिरीत टाकलं होतं. गोच्या खात असताना त्यांनीच बाहेर काढले. मात्र त्यामुळे पाण्याची भीती गेली व लगेच पोहायला शिकलो. तेव्हापासून पोहणे हा स्वर्गीय आनंद अनुभवतो आहे.

पावसाळ्यात विहीर भरली की, ती वाहू लागे. पाणी वाहून जाण्यासाठी मोठी नाली काढली होती. या नालीलाही चार महिन्यापेक्षा अधिक काळ पाणी वहात राही. ती नाली गेल्या वर्षीपर्यंत होती.

१९७२ च्या दुष्काळात विहिरीचे पूर्ण पाणी आटले. मराठवाडा ग्रामीण बँकेकडून पाच हजाराचे कर्ज काढून त्यावर्षी विहिरीचं काम करण्यात आलं. विहिरीची खोली १० फुट वाढवली. पाणी साठवण वाढावी म्हणून आत उतरण्यासाठी ठेवलेले टप्पे काढण्यात आले. हा निर्णय गैरसोईचा ठरला. उन्हाळ्यात आत उतरून पाणी काढणं अवघड झालं.

Well Scheme
Maharudra Manganale: म्हणून माणसांपेक्षा फळझाडं मला प्रिय आहेत...

विहिरीचा घेर वाढल्याने माती आत घसरू लागली. त्यामुळे तीन बाजूंनी दगडी खिळपट (कठडा) रचून घेण्यात आले. या कामात माझा प्रत्यक्ष सहभाग होता. तेव्हा मी आठव्या वर्गात होतो. बँकेकडून घेतलेल्या ५ हजाराचे ३६ हजार रुपये भरूनही ते संपले नाही. २००६ साली मी १० हजार रुपये भरून विहीरीला कर्जमुक्त केले.

या विहिरीला जिवंत झरे नसले तरी थोडासा चांगला पाऊस झाला की, पाझर सुरु होतात. त्या काळात या परिसरातील लोकांना पाणी पिण्यासाठी ही एकमेव विहीर होती. २०१३ साली मी या विहिरीतील गाळ काढून १२ फुट खोली वाढवली. त्या वर्षी विहीरीचे पुनर्भरण केल्यामुळे दुष्काळातही पाणी मिळाले.

त्यानंतर २०१६ साली पुन्हा १४ फुट खोली वाढवली. दगडी खिळपट काढून सिमेंट कॉक्रेंटचा १० फुटी कठडा करून घेतला. त्यामुळे आज ही विहीर देखणी बनली आहे. निळ्याशार पाण्यामुळे छोट्या समुद्राचाच भास होतो.

पुढची किमान ५० वर्षे या विहिरीसाठी कोणाला काही करावं लागणार नाही. ती मात्र पाणी पुरवत राहील. ही विहीर रुद्रा हटचा अपरिहार्य भाग बनली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com