Farmers Scheme : तेरा लाख शेतकऱ्यांना धान्य नाही अन पैसेही

Agriculture News : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सरकारने शेतकरी धान्य योजना सुरू केली होती.
Farmers Death
Farmers DeathAgrowon

Latur News : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सरकारने शेतकरी धान्य योजना सुरू केली होती. या योजनेत एक जानेवारी २०२३ पासून बदल करत कुटुंबांना धान्याच्या मोबदल्यात प्रत्येक सदस्याला दीडशे रुपये देण्याचा निर्णय घेतला.

मात्र, योजनेच्या प्रणालीतील त्रुटींसह शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील ज्येष्ठ महिलांचे खाते नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातात वर्ष झाले तरी ही रक्कम पडलेली नाही. मराठवाड्यातील २० लाख १८ हजार ८२६ पैकी केवळ सात लाख २६ हजार ९९४ शेतकऱ्यांना धान्याच्या बदल्यात पैसे मिळाले असून तब्बल १३ लाख शेतकऱ्यांना धान्य नाही अन् पैसेही अशी स्थिती आहे.

योजनेसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, मार्च २०२४ अखेर वाटप न झालेला निधी सरकारने परत घेतला व लागेल तसा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून बीपीएल, अंत्योदय व काही एपील कुटुंबांना प्रती सदस्य तीन किलो गहू दोन रुपये तर दोन किलो तांदूळ तीन रुपये किलो दराने देण्यात येतो.

Farmers Death
Farmers Insurance Scheme : मुंडे अपघात अनुदान योजनेतून दक्षिण सोलापुरातील पाच प्रस्तावांना मंजुरी

अन्न सुरक्षेच्या उद्दिष्टामुळे अनेक एपीएल कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. शेतकरी आत्महत्याग्रस्त मराठवाड्यासह अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा चौदा जिल्ह्यांसाठी सरकारने अन्न सुरक्षेच्या धर्तीवर शेतकरी धान्य योजना सुरू केली होती. सरकारने लाभार्थींच्या संख्येनुसार जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून व जून ते सप्टेंबर असा निधी उपलब्ध करून दिला. यात तीन महिन्यांची रक्कम एकाच वेळी लाभार्थीला देण्यात येते.

मात्र, पहिल्याच तीन महिन्यातील निधीचे वाटप अनेक जिल्ह्यांना करता आले नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ दहा टक्के तर धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ६४ टक्के निधीचे वाटप झाले. एकूण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ३६ टक्के निधी वाटप झाले. यामुळे खर्च न झालेला ६४ टक्के निधी सरकारने मार्चअखेर परत घेतला.

Farmers Death
Farmers Production Scheme : शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे प्रशिक्षण, आर्थीक उन्नतीसाठी नवीन योजना

शेतकरी धान्य योजना निधी वितरण स्थिती

जिल्हा...पात्र शेतकरी...रक्कम प्राप्त शेतकरी...रक्कम...वाटप टक्के...पर्यंत

छ. संभाजीनगर...२६५४८२...२८८८९...६,४७,९७,७५०...१०.८८...मार्च २०२४

जालना...१२०४७९...४७३७७...९,९४,९०,७७०...३९.३२...फेब्रुवारी २०२४

परभणी...२१३००२...१०८०१२...१९,४४,२१,३००...५०.७१...डिसेंबर २०२३

हिंगोली...१५९६३०...५६८११...२,५५,६५,२६२...३५.५९...मार्च २०२३

नांदेड...३३६०९६...९७४८६...४,३८,६८,३५०...३९.०१...मार्च २०२३

बीड...४६७६३२...१५६३०४...१०,११,६९,९५०...३२.४२...जुलै २०२३

लातूर...२४८६७०...९७५१५...४,३८,८१,७५०...३९.२१...जुलै २०२३

धाराशिव...२०७८३५...१३४४००...२४,१९,२१, ६५०...६४.६७...डिसेंबर २०२३

एकूण...२०१८८२६...७२६७९४...८१,५१,१६,७८२...३६ टक्के

या योजनेत शेतकरी कुटुंबांतील ज्येष्ठ महिला सदस्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येते. बहुतांश शेतकरी कुटुंबांतील ज्येष्ठ महिलांचे बँक खाते नाही. अनेक कुटुंबांकडून महिलांच्या खात्याचा तपशील दिला जात नाही. तुलनेने धाराशिव जिल्ह्यात चांगले काम झाले असून सात जिल्हे मागे आहेत. पात्र, शेतकऱ्यांना योजनेचा शंभर टक्के लाभ देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांनी ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्याचा तपशील स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यावा.
- डॉ. अनंत गव्हाणे, उपायुक्त, पुरवठा, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com