Maharashtra CM : महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ ; नाव मात्र गुलदस्त्यात

CM Name Announcement : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ लागली आहे.
Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar
Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ लागली आहे. १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट असले तरी अद्याप पक्षांतर्गत निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावेदारी असली तरी अद्याप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन गटनेता निवडलेला नाही. सोमवारी (ता. २५) ही बैठक होऊन सायंकाळपर्यंत सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने अजित पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. या दोन्ही नेत्यांना चर्चेचे आणि निर्णयाचे सर्वाधिकार दिले आहेत.

Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar
Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

शिवसेनेची वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये तर राष्ट्रवादीची अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदावर सावध दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा दिल्लीत होणार असल्याने त्यावर कोणीही बोलू नका असा सल्ला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. मात्र, शिंदे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनाच संधी द्यावी, अशी मागणी करत पदावर दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे असे बोलून दाखवले.

२६ नोव्हेंबर रोजी १४ व्या विधानसभेचा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्याआधी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणे आवश्यक आहे. मात्र, त्या अवधीत सरकार अस्तित्वात आले नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असल्याने हालचालींना वेग आला आहे.

सर्वाधिक जागा जिंकून विधीमंडळातील सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपमध्ये सध्या प्रचंड गोपनीयता बाळगत चर्चा केली जात आहे. भाजपच्या बहुतांश आमदारांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर धाव घेतली. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनमुळे यांनी पक्षसंघटना वाढीसाठी बैठक घेतली. तसेच पक्षसदस्य नोंदणीची मोहीम हाती घेतल्याचे सांगितले. मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले नाही.

मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असली तरी निवडणुकीआधी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आश्चर्यकारक नाव समोर येऊ शकते, असे सांगितले होते. त्यामुळे संभाव्य नावांपेक्षा वेगळे नाव येऊ शकते का या बाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिपदांबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar
Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

मागील विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला केवळ नऊ मंत्रिपदावर अडीच वर्षे कारभार करावा लागला. तर देवेंद्र फडणवीस यांचा दावा असूनही त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे यावेळी सर्वाधिक संख्या असलेला भाजप समसमान मंत्रिपदावर समाधान मानण्याची शक्यता नाही. सध्या शिंदे गटातून समसमान मंत्रिपदाच्या वाटपाची माहिती देण्यात येत आहे. मात्र, ही चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या टप्प्यात भाजपचे विद्यमान मंत्री आणि नव्याने संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रशेखर बावनमुळे, किसन कथोरे यांच्यासह दोन ते तीन वेळा निवडून आलेल्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. तर शिंदे गटातून विद्यमान मंत्र्यांसह भरत गोगावले, संजय शिरसाठ, राजेश क्षीरसागर, प्रताप सरनाईक या नेत्यांची नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी देऊन सुनील शेळके, रुपाली चाकणकर आणि अन्य नेत्यांना संधी दिली जाऊ शकते.

विरोधी पक्षांचे विचारमंथन

महाराष्ट्रात सपाटून पराभव पत्करल्यानंतर विरोधी पक्षांनी विचारमंथन सुरू केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची मातोश्री निवासस्थानी बैठक सोमवारी बोलविली असून या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तर पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला जाणार आहेत.

हा निकाल चमत्कारिक असून त्यांची कारणे शोधत आहोत असे ते म्हणाले. मनसेने एकमेव जागा गमावल्यानंतर व अंगणात पराभव स्वीकारल्यानंतर सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक दोन दिवसांत बोलविण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्षांना बोलविण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com