Shrigonda Assembly Constituency : श्रीगोंद्यात बंडाळीची शक्यता

Maharashtra Assembly Election : श्रीगोंदा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना (उबाठा) गटाला सोडून तेथे नुकताच अजित पवार गटातून शिवसेनेत आलेल्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट व काँग्रेस मात्र नाराज आहे.
Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : श्रीगोंदा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना (उबाठा) गटाला सोडून तेथे नुकताच अजित पवार गटातून शिवसेनेत आलेल्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट व काँग्रेस मात्र नाराज आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप व काँग्रेसचे घनश्याम शेलार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. शिवाय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलारही लढण्याच्या तयारीत असल्याने श्रीगोंद्यात सर्वाधिक तगडे उमेदवार आणि बंडाळीही असेल असेच सध्या तरी चित्र आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदार संघ हा सातत्याने चर्चेत राहिला आहे. दीर्घकाळ राष्ट्रवादीत असलेले बबनराव पाचपुते सध्या येथे आमदार आहेत. मात्र प्रकृती बरी नसल्याने त्यांच्याऐवजी पत्नी प्रतिभा पाचपुते यांना यावेळी भाजपने उमेदवारी दिली आहे. या मतदार संघावर शरद पवार यांचा मोठा प्रभाव आहे. लोकसभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांना मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदार संघावर शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी दावा केला होता.

Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election 2024 : जागावाटपाचा घोळ कायम

मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना (उबाठा) गटाला ही जागा गेली असून दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटातून शिवसेनेत आलेल्या जिल्हा बॅंकेच्या संचालक व माजी आमदार स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक दिवसांपासून येथून लढण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे व शिवसेनेचे नेते साजन पाचपुते प्रयत्न करत होते.

मात्र राजकीय उलथापालथीत साजन पाचपुते यांनीच अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्याबाबत पुढाकार घेतला असल्याचे सांगितले जात आहे. नागवडे यांना शिवसेनेतर्फे एबी फॉर्म मिळाल्याने आघाडीकडून इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप व काँग्रेसचे घनश्याम शेलार यांच्या पदरी निराशा आली. दोघांनीही विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची भूमिका घेतल्याने सध्यातरी आघाडीत बंडखोरी अटळ दिसत आहे.

Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाविकास आघाडीचे प्रत्येकी ८५ जागांवर एकमत

उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (ता. २३) सकाळी जगताप समर्थकांची त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. शिवाय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व या भागातील प्रभावी नेते अण्णा शेलारही उमेदवारी मागत होते. मात्र मिळाली नसल्याने तेही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेत्या सुवर्णा पाचपुते यांनाही बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात सर्वाधिक बंडाळी होणार असून सर्वाधिक तगडे उमेदवार असतील, असे तरी सध्या चित्र आहे.

आघाडीत बिघाडीची शक्यता

श्रीगोंदा मतदार संघात माजी आमदार राहुल जगताप उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते. पण उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी शिवसेना नेत्यांवर उमेदवारी विकल्याचा आरोप केला आहे. कॉग्रेसचे नेते घनशाम शेलार मागील पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडून लढले होते व अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता. या वेळी ते कॉंग्रेस पक्षात आहेत. आता दोघांनीही येथून लढणार असा निर्धार केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com