कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग (Women Contribution In Agriculture) वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर भरीव कार्य केले जात आहे. शेतीचे उत्पादन (Agriculture Production) वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून, त्यासाठी महिलांचाही प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी महिलांना (Women Farmer) आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology) देऊन शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिकाचे आयोजन, विविध कृषी निविष्ठांची खरेदी, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा, साठवणूक आणि पणन कार्यामध्ये, तसेच कृषिपूरक व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी महिलांसाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, तसेच इतर आधुनिक कृषी विस्तार माध्यमांचा वापर केला जात आहे.
या सर्व बाबींचा अवलंब करूनही आजही महिलांचा सहभाग पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. कारण महिलांसमोर सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा विचार करून महिलांसाठी विविध कार्यांमध्ये नियोजन करणे गरजेचे आहे.
ग्रामीण महिलांच्या अडचणी
ग्रामीण महिला पारंपरिक तंत्रज्ञानामध्ये अडकल्याने त्यांना नवीन तंत्रज्ञान तसेच नवीन उद्योगाचा अवलंब करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होत नाही. त्यांचा बाहेरच्या जगाबरोबर कमी संपर्क येत असल्यामुळे बाहेर होणारे बदल याबाबत त्वरित माहिती मिळत नाही. व्यवसाय करण्याबाबतच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे महिलांना उद्योजक बनण्यात अडथळे येतात. आहार आणि आरोग्याबाबतही ग्रामीण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या चालिरिती-अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत.
महिलांना एखादा उद्योग करावयाचा किंवा एखादे तंत्रज्ञान वापरावयाचे वाटले तरी त्यासाठी त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता कमी असते. त्यांना शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये आणि स्वयंरोजगाराबाबतच्या तंत्रज्ञानाचीही माहिती असते. तांत्रिक मार्गदर्शन घेण्यासाठी महिला लांब अंतरावर जाण्यास उत्सुक नसतात. जास्त कालावधीच्या प्रशिक्षणासाठीही उपस्थित राहू शकत नाहीत. शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्याने या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता महिलांनी संघटित होऊन अन्नप्रक्रिया, कृषिपूरक व्यवसायामध्ये सहभाग वाढविण्याची गरज आहे.
आहार आणि आरोग्यदायी जीवन
आहार आणि आरोग्याबाबत समाजामध्ये जागृती निर्माण होत आहे. चांगला आहार मिळाला तर आरोग्याचे अनेक प्रश्न सुटू शकतील. महिला आणि कुटुंबातील माणसांचा आहार यांचा जवळचा संबंध आहे. याचा विचार करून महिलांना आहार आणि आरोग्यावर विशेष भर देण्याची गरज आहे. आहाराच्या दृष्टीने भाजीपाला, फळझाडांची लागवड करून त्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले, तर चांगला आहार घरच्या घरी मिळू शकतो. याकरिता पारंपरिक ज्ञान, शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब मात्र करावा लागेल. यामुळे पैशाची बचत होईल तसेच आहार आणि आरोग्याचा प्रश्न सुटेल.
कुक्कुटपालन-शेळीपालन
ग्रामीण कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्याचे काम शेळ्या-कोंबड्यांच्या विक्रीतून होते. परंतु हा व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्यापासून जास्त फायदा होतो. स्थानिक कोंबड्या-शेळ्यांच्या प्रतीमध्ये सुधारणा करून त्यांचे पालनपोषण केल्यास महिलांना यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते.
कृषिमाल प्रक्रिया आणि विक्री
ग्रामीण महिलांचा भाजीपाला उत्पादनामध्ये मोलाचा वाटा आहे. काही ठरावीक भाजीपाल्याची/फुलांची फळझाडांची लागवड करून मिळालेले उत्पादन जसेच्या तसे किंवा त्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करून त्याची विक्री करणे, कडधान्याच्या डाळी तयार करणे, फळे-भाजीपाल्यावर प्रक्रिया, शेवया, कुरडया, पापड, लोणचे यांसारखे पदार्थ तयार करणे, मसाला तयार करणे आदी अनेक व्यवसायाद्वारे महिला चांगले अर्थार्जन करू शकतात. अर्थात, यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
दुग्ध व्यवसायामध्येही महिलांचा मोलाचा वाटा आहे. दुधाचे शितकरण करणे आणि पिशवीमध्ये पॅक करून विकणे किंवा दुग्धजन्य पदार्थ बनविणे यासारखे व्यवसायही महिला संघटित होऊन करू शकतात. गावातील गरजांचा विचार करून त्याचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्रीद्वारे महिलांना चांगले अर्थार्जन होऊ शकते. मालाच्या विक्री बाबतचे ऑनलाइन मार्केटिंग सारखे सुधारित तंत्रज्ञान अवगत करणे ही काळाची गरज आहे. याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती अत्यावश्यक आहे.
स्वयंरोजगार निर्मिती
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही राहणीमानामध्ये बराच बदल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजांही बदललेल्या आहेत. या गरजांचा विचार करून ग्रामीण भागातील तरुणी अनेक व्यवसाय करू शकतील. वेशभूषा, केशभूषा, फॅशन डिझायनिंग, ड्रेस डिझायनिंग, ब्युटी पार्लर, आरोमा थेरपी सेंटर, बेकरी युनिट, ग्रामीण हस्तकला, स्वेटर तयार करणे, सॉप्ट टॉइज तयार करणे यांसारखे अनेक व्यवसाय ग्रामीण युवती सुरू करू शकतात. त्यातून चांगले व्यवसाय गावातल्या गावात सुरू होऊ शकतात. काही वस्तू ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये विकू शकतात. यासाठी भांडवलाची गरज लागेल. हे भांडवल बचत गटाद्वारे तसेच वित्तीय संस्थांमार्फत मिळू शकते.
महिलांमध्ये नेतृत्व विकास
ग्रामीण महिलांमध्ये नेतृत्व विकास होणे गरज आहे. महिलांमध्ये हा विकास झाला तर कुटुंबाचे नेतृत्व, व्यवसायाचे नेतृत्व तसेच सामाजिक, आर्थिक कार्यातील नेतृत्व महिलांच्या सर्वांगीण विकासास साह्यभूत ठरेल. हे नेतृत्व तयार झाल्याशिवाय महिलांचा विकास आणि सक्षमीकरण अशक्य आहे. त्यासाठी महिलांनी पुढे येऊन प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तसेच इतर महिलांना त्याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे.
बचत गटाची कार्यपद्धती
महिलांचे बचत गट सुरळीत न चालणे किंवा बंद पडणे यामागील महत्त्वाची कारणे म्हणजे योजनेबद्दल जागरूकता किंवा योग्य प्रबोधनाचा अभाव ही आहेत. सर्व बाबींची उपलब्धता होवूनही कार्यक्रम योग्य प्रकारे राबविला जात नाही. परिणामतः बचत गट बंद पडतात किंवा गटाचे पाहिजे ते उद्देश साध्य होत नाहीत. म्हणून बचत गट स्थापन करताना तसेच सुरू असताना बचत गटाच्या कार्याबद्दल पूर्णपणे जागरूकता असणे गरजेचे आहे.
त्यासाठी मासिक बैठकांमध्ये नियमितता, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे, जाणीव जागृती, कार्यक्रमाची चर्चा, गटाच्या हिशोबाच्या बाबी व्यवस्थित ठेवणे, बँकेचे व्यवहार सुरळीत चालविणे, महिलांसाठी गटाचे विविध विकासात्मक कार्यक्रम राबविणे, उद्योजकता विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे. बचत गटाचे कार्य करत असताना विविध स्वभावाच्या, वेगवेगळे कौशल्यगुण असणाऱ्या महिला एकत्रित आलेल्या असतात.
त्यांच्यामधील कला गुणांचा अभ्यास करून त्या गुणांना चालना देण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या आवडीनुसार कामाची जबाबदारी द्यावी. तसेच त्यांच्या कला गुणांचा सर्वांसमोर गौरव करावा. याचा उपयोग त्यांच्याबरोबर गटालाही होतो. तसेच गटामध्ये कायम नवनवीन विषय चर्चेत येऊन गटाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मदत होते. या सर्व बाबींचा व्यवस्थित विचार करून चांगला कार्यक्रम तयार केला तर बचत गटांद्वारे महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि मानसिक विकास होऊन कुटुंब आणि गावाचा विकास होईल.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, रोहा-रायगड येथे विषय विशेषज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.